Vasudev Niwas | © 2023 All rights reserved | Developed by Shree Vasudev Niwas
सगुण निर्गुण
पंथराज हा ऐक्याचा
‘भारताचा वैभव काल कधी पहायला मिळेल’ असें तरुण पिढीला वाटत आहे. सर्व सभोवताली दिसत असलेले दैन्य, मत्सर, विघटना हें शल्य आहे. सर्वत्र स्वतःपुरताच विचार करण्याची प्रवृत्ति असल्यामुळें आज नैराश्य, अनुत्साह, दुर्बलता दिसत आहे. कोणत्याही स्तरावरून राष्ट्र प्रेमाचा, राष्ट्र धर्माचा विचार होताना दिसत नाहीं. परस्परांमध्ये प्रेम निर्माण होणे आणि ते वर्धिष्णू होणें काळाची गरज आहे. याकरिता सर्व भारतीय ऋषि, मुनि, संतांनी ज्या मार्गाचा गौरव केला आहे तो म्हणजे ‘चैतन्याचा मार्ग’ होय. याला ‘पंथराज’, ‘महायोग’ असेंही म्हणतात. श्रीभगवद्गीतेत ‘हा सर्वश्रेष्ठ आहे’ असें म्हटले आहे. तसेंच संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराजांनी या मार्गाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे आणि त्याचे सुंदर वर्णन केले आहे. विशेष म्हणजे तरुणांसाठी हा एकात्मतेचा मार्ग अत्यंत सोपा, तत्काल अनुभूति देणारा आणि हृदयांत मानवता जागवणारा आहे. म्हणून हा मार्ग भारताला वैभव प्रदान करणारा आहे.
चैतन्याच्या साधनेने सद्गुणांची वृद्धी होऊन प्रत्येकाला शांतता आणि आत्मबल याची प्राप्ती होते. चंदन सहाणेवर घासले की अधिकाधिक सुगंध दरवळतो. तसें सातत्याने, नियमितपणे, उत्साहाने या मार्गाचे अनुसरण करणारी प्रत्येक व्यक्ती समृद्ध होते. हृदय विशाल बनते. त्यामुळें व्यक्ति व्यक्तीत चैतन्यरूपाने असलेल्या एकत्वाची प्रचिती येऊन कुटुंब, समाज, राज्य आणि राष्ट्र बलशाली बनते. यातच देशाचा खरा उत्कर्ष आहे. हा महत्त्वाचा संदेश यातून मिळतो. हा संदेश सर्वत्र नेण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील असणे गरजेचे आहे. हेंच भारतीय संस्कृतीचे खरें वैभव आहे.
प. पू. योगतपस्वी श्रीकाका महाराजांच्या ‘चैतन्य गीतातून’ तात्पर्य जाणून घेऊं –
‘सहज साध्य हा मार्ग असे जरी,
पंथराज हा ऐक्याचा |
श्रीस्वामिंचा आशिष लाभे,
संतत प्रत्यय ये त्याचा ||
दिसू लागला जवळी मंगल
विश्वाचा वैभव काल |
उत्साहाने चैतन्याच्या,
मार्गावर करिता चाल ||’
……………………..