सुंदर ते ध्यान
ही लीलाविश्वंभराची दया
बृहदारण्यक उपनिषदामध्ये याज्ञवल्क्य ऋषि “एकाकी न रमते” असे भगवंताचे सुंदर वर्णन करतात. “भगवंताला एकट्याला करमत नाही. म्हणून तो भक्ताचा शोध घेतो. भक्तामुळे भगवंताचा एकटेपणा दूर होऊन भगवंताला आनंद मिळतो. भक्त कसा असावा? तर तो अहंकाररहित, निःस्वार्थ प्रेम करणारा पाहिजे. असा भक्तच भगवंताला आवडतो. भक्त भगवंताशिवाय आणि भगवंतही भक्ताशिवाय राहू शकत नाही. भगवंत भक्ताबरोबर विविध लीला करतो.” या ऋषी याज्ञवल्क्यांच्या उद्गाराचे रहस्य प्रत्यक्ष प्रसंगातून पाहू.
अयोध्याचे महात्मा श्रीरूपकलाजी होऊन गेले. लहान वयापासूनच उत्तम साधक, निरहंकारी, नि:स्वार्थवृत्ती यामुळे ते भगवंताशी एकरूप होते. त्यांची प्रत्येक कृती देवाच्या साक्षीने होत असे. त्यामुळे भगवंताने त्यांच्यावर मित्राप्रमाणे प्रेम केले. श्रीरूपकलाजी स्वतःच्या किमान गरजा भागवून उरलेले सगळे धन गरजूंना दान करीत असत. प्रसंगी कर्ज काढून श्रीरूपकलाजी मदत करीत असत. एकदा कर्ज फेडण्याइतकी रक्कम श्रीरूपकलाजींकडे नव्हती. त्यावेळी त्यांच्याकडे अनोळखी व्यक्ती येऊन म्हणाली “मला सल्ला हवा आहे. मी जाऊन येतो. हे पाकीट ठेवा.” ती व्यक्ती पुन्हा आलीच नाही. श्रीरूपकलाजींनी वाट पहिली. त्यांनी तीन दिवसांनी पाकीट उघडले. आश्चर्य म्हणजे बरोबर कर्जाचीच रक्कम पाकिटात होती. “देव दयाळू आहे, ही त्याचीच लीला” याचा त्यांना आनंद झाला.
श्रीरूपकलांच्या चरित्रातील आणखी एक प्रसंग पाहू. श्रीरूपकलाजी बिहार प्रांताचे शिक्षणविभागाचे प्रमुख होते. वरिष्ठ अधिकारी त्यांच्याकडून सल्ला घेत असत. एकदा श्रीरूपकलाजी बिहटच्या शाळेत निरीक्षणासाठी गेले. त्यावेळी त्यांना भेटायला शिक्षाविभागाचे उच्च अधिकारी पाटणाला आले. अधिकाऱ्यांनी श्रीरूपकलाजींना निरोप पाठवला “बिहट-पाटणा अंतर फार आहे. थांबायला वेळ नसल्याने मला पाटणा स्टेशनवरच भेटा.” “भेट होणार नाही” या विचारानेच श्रीरूपकलाजी निघाले. परंतु पाटणाच्या गाडीला दोन तास उशीर झाला. त्यामुळे पाटणा स्टेशनवरच श्रीरूपकलाजी व अधिकाऱ्यांची भेट झाली. दोघांचे समाधान झाले. श्रीरूपकलाजी म्हणाले “न होणारी भेट आज भगवंतांनी घडवली, ही त्याचीच लीला.”
श्रीरूपकलाजींच्या जीवनात असे अनेक प्रसंग घडले. “लीलाविश्वंभराला आपल्यामुळे वारंवार त्रास होऊ नये” या विचाराने सेवानिवृत्त होऊन त्यांनी प्रभू रामचंद्रांना जीवन समर्पित केले. श्रीरूपकलाजी ‘महात्मा’ म्हणून प्रसिद्ध झाले.
सारांश, ‘प्रत्येक कृती भगवंताच्या आज्ञेनेच होते.’ अशी श्रद्धा असावी म्हणजे भगवंत प्रत्येकाचा मित्र होतो हे सत्य आहे. तात्पर्य,
‘ही लीलाविश्वंभराची दया ।।’
……………………..