Vasudev Niwas | © 2023 All rights reserved | Developed by Digital Canvas
सगुण निर्गुण
ऋणमुक्त व्हा!
‘ऋण’ म्हणजे ‘कर्ज’. परतफेडीवर घेतलेले द्रव्य म्हणजे ‘ऋण’ अशी व्याख्या आहे. मानवाचे नैतिक कर्तव्य म्हणजे ‘ऋण’ परत करणें होय. “थोडेजरी ‘ऋण’ शिल्लक राहिलें तर तें काटेरी वृक्षाप्रमाणे वाढत जाऊन ‘ऋण’ घेणाऱ्याला त्रास देतें” असें सांगितले आहे.
मानवी जीवनामध्ये ‘देवऋण, ऋषि-गुरुऋण, पितृऋण व मनुष्यऋण’ हीं ऋणे सांगितली आहेत. ईश्वराचे भजन-पूजन करण्याने मनुष्य ‘देवऋणातून मुक्त होतो. उत्तम विद्या संपादन करून समाजप्रबोधन करण्याने ‘ऋषि-गुरुऋणातून मुक्तता होते. आपल्या मुलांना सुसंस्कृत व उत्तम विद्याविभूषित बनवणे, याने ‘पितृऋणातून’ मुक्तता होते. तसेंच समाजात प्रत्येक व्यवहारात देवाणघेवाण असतेंच. मनुष्य दुसऱ्यांकडून वस्तु घेतो. ज्याची त्याला वस्तु परत करण्यानें ‘मनुष्य ऋणातून’ मुक्त होतो. श्रीमद्भागवतात संपत्तीचे पांच भाग सांगितले आहेत– स्वतःच्या प्रपंचासाठी, कुटुंबियांच्या भविष्याच्या तरतुदीसाठी, धर्मकार्यासाठी, राष्टसेवेसाठी आणि समाज उपयोगी कार्यासाठी. अशा संपत्तिच्या विनियोगाने मनुष्य कर्जमुक्त राहतो.
एक घडलेला प्रसंग पाहू. एक मुलगा वडिलांकडे गाडी घेण्यासाठी हट्ट धरतो. वडील समजावतात, “चैनीसाठी कर्ज घेऊं नये असें शास्त्र सांगते. स्वबळावर कष्ट करून प्रपंच सुखाचा करावा याचा विचार कर.” मुलाला हें पटते. वडिलांच्या उपदेशाप्रमाणे, तो मेहनत करून ‘बचत हींच कमाई’ या सूत्राप्रमाणे आनंदी जीवन जगतो. तों विचार करतो “कर्ज घेऊन गाडी खरेदी केली असती तर मला मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास झाला असता. वडिलांनी योग्य वेळी उपदेश केल्याने मी समाधानी आहे.” श्रीमद्भागवतात कुटुंबप्रमुखाने कसें वागावे याची आदर्श तत्त्वें आहेत. त्यांपैकी प्रमुख तत्त्व असें – कुटुंबातील प्रमुख व्यक्तिने कोणाशीही उपकार बुद्धीने वागू नये, उदाहरणार्थ “मी कमावतो म्हणून सर्व चालले आहे.” घरांतील वाद टाळण्याकरिता सर्वांशी सलोख्याने व प्रेमाने वागावे. कुटुंबामध्ये सुसंवाद होणें हीं काळाची गरज आहे.
तात्पर्य, “मानवाने सर्व ऋणातून मुक्त होण्यासाठी भगवान श्रीदत्तात्रेयांची प्रार्थना करावी” असें श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामिमहाराज सांगतात. श्रीदत्तात्रेय ‘अन्-ऋणी’ (ऋण नसलेले) आहेत कारण त्यांनी अत्रिऋषींना सर्वस्व दान दिलें व मुक्त झालें. अशा ‘अन्-ऋणी’ भगवंताला केलेली प्रार्थना फलद्रूप होते. तीं अशी-
‘अत्रे:-आत्मप्रदानेन यो मुक्तो भगवान्-ऋणात्|
दत्तात्रेयं तमीशानं नमामि ऋणमुक्तये||’
……………………..