Vasudev Niwas | © 2023 All rights reserved | Developed by Digital Canvas
सगुण निर्गुण
सुख-दुःख
योगवासिष्ठातील ‘सुखदु:खाबाबत’ विचार असा- “दु:खी माणसाला रात्र न संपणारी वाटते, तर सुखी माणसाला तीच रात्र एका क्षणाइतकी थोडी वाटते.” शास्त्रकार “आत्मसुखाची प्राप्ती हें मानवी जीवनाचे मुख्य सूत्र आहे, म्हणून सामान्य सुख दु:खाचा विचार करू नका” असें सांगतात.
मनुष्य मुळातच सुखी असतो परंतु पूर्वी अनुभवलेल्या दु:खाचा वारंवार विचार करतो. “मला किती दु:ख आहे” याचें तो चिंतन करतो परंतु प्राप्त सुखाचा विचारच तों करत नाहीं. दु:खानंतरचे सुख अंधारात चमकणाऱ्या दिव्यासारखे विशेष वाटते. परंतु ‘सुख-दु:ख’ चाकाप्रमाणे खालीवर होतात म्हणजे सुखानंतर दुःख व दुःखानंतर सुख येते.
महाभारतातील एक प्रसंग असा. सर्वार्थाने पराभूत झालेला युधिष्ठिर दुःखी झाला होता. त्यावेळीं महर्षि व्यास उपदेश करतात, “हे बघ, पौर्णिमेला चंद्र पूर्ण असतो, सुखी असतो. तों उरलेल्या चौदा दिवस लहान होण्याच्या दु:खाचा शोक करीत नाहीं. ‘मला सुख मिळणार आहे’ याचाच विचार करतों हें लक्षात ठेव. तूही हें दुःख तुझें तप म्हणून उपभोग. यातूनच पुढें आत्मसुखाची प्राप्ती आहे.” हें महत्त्वाचे सूत्र समजल्याने युधिष्ठिराने महर्षि व्यासांचा उपदेश शिरोधार्य मानला. त्यानें या कठीण काळात योगसाधना तपश्चर्या करून आत्मसुखाची प्राप्ती केली. पुढें त्याला भारताचे सम्राटपद व सुख-ऐश्वर्याची प्राप्ती झाली. उत्साहाने अनुकूल-प्रतिकूल प्रसंगांना सामोरे जावें हा संदेश तरुणांना प्रेरक आहे.
मानवी जीवनात सुखदुःखाचे कोणीही वाटेकरी नसतात. एक घडलेला प्रसंग असा. एके दिवशी चार मित्र भेटतात. प्रत्येकजण आपल्या दु:खाचे वर्णन करतो. प्रत्येकाला स्वत:चेच दु:ख फार मोठे आहे असें वाटते. म्हणून तें एकमेकांची दुःखे वाटून घ्यायचे ठरवतात. सर्वजण आपली दु:खे कागदावर लिहून समोर ठेवतात. कागदांचा मोठा ढीग होतो. त्यातून प्रत्येकजण कागद उचलतो. परंतु कागदावरील दु:खाचा मजकूर वाचून सर्वजण “नको बाबा! माझेंच दुःख बरें” असें म्हणत आपापल्या मार्गाने निघून जातात. सारांश “परदु:ख शीतल हेंच खरें.”
तात्पर्य, ‘मानवी जीवनाचे रहस्य म्हणजे आत्मसुखाची प्राप्ती.’ या ‘माऊलींच्या पंथराजाचा’ प्रत्येकाने अनुभव घ्यावा हेंच माऊलींना खालील ओवीतून अभिप्रेत आहे-
‘प्रत्यक्ज्योतीची वोवाळणीं|
करिसी मनपवनाचीं खेळणीं|
आत्मसुखाचीं बाळलेणीं|
लेवविसी||’
……………………..