श्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे

सुंदर ते ध्यान

तें हें अनुभवामृत

दक्षिण भारतातील कर्नाटक प्रांतात श्रीक्षेत्र शृंगेरी आहे. येथे जगद्गुरू श्रीआद्यशंकराचार्यांनी स्थापन केलेले श्रीशारदापीठ प्रसिद्ध आहे. या ठिकाणी ‘श्रीवासुदेव निवास’ पुणेच्या वतीने ‘महायोग सम्मेलना’चे आयोजन केले होते. त्या प्रसंगी श्रीशारदापीठाचे शंकराचार्य श्री श्री विधुशेखरभारती स्वामिमहाराजांचा सत्संग होता. त्यावेळी श्रीस्वामीजींनी उपस्थित साधकांना मार्गदर्शन केले. ते असे “आपण महान श्रीगुरुपरंपरेतून प्राप्त झालेली योगसाधना करण्यासाठी या श्रीजगदंबेच्या पवित्र स्थानात आला आहात. येथे आपण करीत असलेली योगसाधना अत्यंत उत्कृष्ट आहे. या पवित्र स्थानाचे वैशिष्ट्य असे की ही भगवान ऋष्यशृंग महर्षींची तपोभूमी आहे. जगद्गुरू श्रीआद्यशंकराचार्य दिग्विजय यात्रेच्या वेळी येथे आले होते. या स्थानाचे महत्त्व जाणून प्रसन्न होऊन त्यांनी दक्षिणान्माय शृंगेरी श्रीशारदापीठाची स्थापना केली.”

श्रीविधुशेखरभारतींनी श्रीआद्यशं‍कराचार्यांच्या प्रसन्नतेचे विशेष कारण स्पष्ट केले. ते असे “ज्यावेळी श्रीआद्यशंकराचार्य येथे आले त्यावेळी त्यांनी एक दृश्य पाहिले. ते असे- येथील प्रचंड उन्हामुळे त्रासलेल्या एका बेडकाचे एका सर्पाने आपला फणा पसरून रक्षण केले. हे दृश्य पाहून श्रीआद्यशंकराचार्य आनंदित झाले आणि त्यांनी येथेच भगवती श्रीशारदाम्बेची प्रतिष्ठापना आणि श्रीशारदापीठाची स्थापना केली. या स्थानाचा हा महिमा कोठून आला बरे? तर त्याचे कारण म्हणजे भगवान् ऋष्यशृंग महर्षींचे दीर्घ तप होय. योगसाधनेच्या तेजामुळे महर्षि ऋष्यशृंगांच्या ठिकाणी समभाव होता. अशा महान योग्याच्या सान्निध्यात प्राण्यांमधीलसुद्धा वैरभाव नष्ट होऊन
ते प्राणी प्रेमाने राहतात. हे श्रीआद्यशंकराचार्यांनी प्रत्यक्ष पाहिले.” श्रीविधुशेखरभारती पुढे म्हणाले “म्हणजे येथे महर्षि ऋष्यशृंगांची तीव्र योगसाधना पूर्ण झाली आणि हा सर्व परिसर तेजोमय झाला. तसेच श्रीआद्यशं‍कराचार्यांनीसुद्धा येथे तपश्चर्या केली होती. श्रीशारदापीठाच्या परंपरेतील सर्व आचार्यांनीसुद्धा येथेच तपश्चर्या केली आहे.” श्रीविधुशेखरभारतींनी स्पष्टीकरण केले “इतक्या सर्व महात्म्यांनी येथे साधना केली आहे. म्हणून येथे आपणा सर्व साधकांच्याकडून होणारी महायोग साधना पूर्ण होणार आहे यात शंका नाही. आपला सर्वांचा येथे येण्याचा संकल्प आम्हाला संतोषकारक आहे कारण प्रत्येक मनुष्याला योगसाधनेची अत्यंत आवश्यकता आहे. महायोग साधना अनुभव देणारी आहे. आपली साधना समृद्ध होवो” असा आशीर्वाद श्रीस्वामीजींनी दिला.”

सारांश, श्रीक्षेत्र शृंगेरी श्रीशारदापीठाचे माहात्म्य आणि श्रीगुरुपरंपरेतून मिळालेल्या महायोग साधनेचे हे वैशिष्ट्य आहे.

संत म्हणतात,

‘ज्ञानदेवो म्हणे श्रीमंत । तें हें अनुभवामृत ।।’

……………………..

आनंदघन सद्गुरू >>

<< ही लीलाविश्वंभराची दया