tembe-swami-round
swami-loknath-terth-round
श्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे

शक्तिपात, साधना आणि साध्य

लेखक: प.प. स्वामी नित्यबोधानन्दतीर्थ स्वामी महाराज

या जगांत प्रत्येक मनुष्य जन्मापासून मृत्यूपर्यंत त्याला मिळालेले आयुष्य जगत असतो. त्याची इच्छा असो वा नसो आयुष्याचा काल निघून जात असतो. त्याने काही केले न केले तरी काल निघून जातच असतो व शेवटी आयुष्य संपते. जशा रानावनांत निर्माण झालेल्या वेली, छोटी-मोठी झाडे, कुठेतरी उगवतात, थोडीफार  वाढतात व कालांतराने कालवश होतात. त्यांचे अस्तित्व ते साक्षात् असतांनाही कुणाच्या लक्षांत येत नाही. अशीच स्थिती जगातील सर्वसामान्य मानवाची असते. तर काय मनुष्याचा इतका दुर्लभ देह प्राप्त होऊनही त्याने केवळ इतर पशू, पक्षी, प्राण्यांप्रमाणेच ‘आहार, निद्रा, भय आणि मैथून’ या क्रियांमध्येच सारे आयुष्य घालवावे? मनुष्याचा देह परम भाग्याने प्राप्त होतो. मनुष्याच्या देहांतच सर्वांत अधिक विवेक-बुद्धी आहे. या विवेक-बुद्धीनेच त्याने इतर प्राण्यांपेक्षा उन्नत, विकसित जीवन-पद्धती निर्माण करून अधिकाधिक सुख, समृद्धी नि आनंद देणार्‍या गोष्टी निर्माण केलेल्या आहेत. मानव-समाज-जीवनाला सुसूत्र, नियंत्रित, विकसनशील आणि उन्नत बनविण्यासाठीच धर्म, अर्थ, काम व मोक्ष या चार पुरुषार्थांची आवश्यकता मनीषींनी वाटली. अन्य प्राणी व मनुष्य यांच्या जीवनपद्धतीची हीच व्यवच्छेदक रेषा आहे. एकाचे जीवन सुनियंत्रीत तर दुसर्‍याचे जीवन स्वैर वा निर्नियंत्रित. धर्माच्या प्रवेशद्वारातून पुढे गेल्याशिवाय मनुष्याला अर्थ आणि काम यांचा भोग घेता येऊ नये असा दंडक शास्त्राने घालून दिला. धर्म म्हणजे मनाची, इंद्रियांची नियंत्रण शक्ती होय. आधि आणि व्याधि मधून सुटण्याचा, जन्म-मरणाच्या चक्रांतून सुटण्याचा शेवटचा दरवाजा आहे मोक्ष-मुक्ती हाच चवथा पुरुषार्थ! याचा तर अनेकांना विसरच पडलेला आहे. काहींचा यावर विश्‍वासच बसत नाही. मोक्षाबद्दलही अनेकांच्या अनेक विपर्यस्त कल्पना आणि समजुती आहेत.

मोक्ष म्हणजे आत्यंतिक दुःखनिवृत्ती म्हणजे शाश्‍वत, नित्यसुखाची प्राप्ती, दुःखाचे पाश तुटावेत आणि अखंड आनंद मिळावा ही प्रत्येकाचीच इच्छा नव्हे मागणी असते, परंतु त्या शाश्‍वत आनंदाचा स्रोत कुठे आहे याचे अज्ञान असते. बौद्धिक, ग्रांथिक, शाब्दिक ज्ञानाने हे अज्ञान जरी दूर झाले तरी प्रत्यक्ष अनुभवगम्य ज्ञान, म्हणजे अपरोक्षज्ञान होत नाही. जोपर्यंत असे अपरोक्षज्ञान होत नाही तोपर्यंत खर्‍या सुखाची प्राप्ती होत नाही. ह्या खर्‍या सुखाची प्राप्ती भगवद्कृपेने होते. जीवाला मोक्षाचे दान करणारा केवळ एक परमेश्‍वरच आहे. या परमेश्‍वरालाच अनंत नावांनी संबोधले जाते. कुणी त्याला परमात्मा, आत्मा म्हणतात तर कुणी त्याला परब्रह्म, ब्रह्म म्हणतात. ते परब्रह्मच परमशिव आहे, गुरुतत्त्व आहे. ‘एकं सद् विप्राः बहुधा वदन्ति’ या श्रुतिवचनाप्रमाणे त्या एकाच सत्-तत्त्वाला विशेष प्रज्ञावंतांनी अनेकविध नामांनी संबोधिलेले आहे. या अखिल ब्रह्मांडामध्ये ते एकच तत्त्व सर्वव्याप्त आहे. ते जसे ब्रह्मांडांत भरून राहिलेले आहे, तसेच ते या देहांत-पिंडांतही सर्वत्र भरून राहिलेले आहे. त्या एकाच तत्त्वाचा शोध घेण्याने तो शाश्‍वत आनंदाचा स्रोत प्राप्त होतो. अर्थात् या शोधासाठीच मार्गदर्शकाची, गुरूची, सद्गुरूची आवश्यकता आहे. जो गुरू या सत्-तत्त्वाची प्रत्यक्ष अनुभूती देऊ शकतो त्यालाच सद्गुरू म्हणतात. सद्गुरूंच्याच रूपाने परमेश्‍वराची कृपा अवतरित होत असल्यामुळे सद्गुरू आणि परमेश्‍वर यांच्यात द्वैत नाही. सद्गुरूच ब्रह्मज्ञान देणारे परमात्मा-तत्त्व आहे. श्रीसंत एकनाथमहाराज आपल्या ‘भागवत’ ग्रंथात म्हणतात,

सद्गुरू वीण ब्रह्मज्ञान । सर्वथा नव्हे नव्हे जाण ।
हें उपनिषदर्थे प्रमाण । परम निर्वाण साधिले ॥ अ-10
साधावया निज ज्ञान । करितां सद्गुरूचे सेवन ।
निवाले संत सज्जन । आनंद घन सद्गुरू ॥
एवं चिद्रूपाचे ज्यासी ज्ञान । तो चिद्रूपचि सत्य संपूर्ण ।
गुरू-ब्रह्म-अभिन्न जाण । ये अर्थी प्रमाण उपनिषदें ॥

वरील ओव्यांमधून श्रीएकनाथमहाराजांनी सद्गुरूंचे वर्णन केलेले स्वरूप वाचले असता गुरू आणि ब्रह्म कसे एक आहेत याचा बोध होतो. श्रीगुरू-गीतेतहि स्पष्टपणें दाखविले आहे –

गुरू ब्रह्मा गुरूर्विष्णु गुरूर्देवो महेश्‍वरः ।
गुरू साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः ॥

किंवा

गुरू वक्त्र स्थितं ब्रह्म, प्राप्यते तत्प्रसादतः ।

किंवा 
गुरूर्विश्‍वेश्‍वरः साक्षात् तारकं ब्रह्म निश्‍चितम् ।

अशा ब्रह्मस्वरूप गुरूच्या मुखातून त्यांच्या प्रसादाने ते ब्रह्म शिष्याला प्राप्त होते. सद्गुरूच साक्षात् विश्‍वेश्‍वर भगवान शिव असून तेच शिष्याचे तारक, उद्धारक ब्रह्म आहेत.

सद्गुरू आणि परमेश्‍वर असे एकच असताना, त्यांच्या प्रसादाने, कृपेने शिष्याचा उद्धार वा मोक्ष कसा होतो, हे समजून घेणे अत्यावश्यक आहे. सद्गुरूंची कृपा म्हणजे दीक्षातत्त्व होय. सद्गुरूंची शिष्याचा उद्धार करणारी शक्तीच सद्गुरूंचे लक्षण आहे. शक्तीसंपन्न गुरूंच्या कृपेने वा दिक्षेने काय घडते हे पुढील श्‍लोकावरून स्पष्ट होईल –

दींयते शिव सायुज्यं क्षीयते पाश बन्धनम् ।
अतो दीक्षेति कथिता, बुधैः सच्छास्त्रवेदेभिः ॥

ज्यामुळे शिव-सायुज्य म्हणजे शिवस्वरूप प्राप्त होते आणि पाश-बंधनांचा क्षय होतो तिलाच वेदादि सद्शास्त्रांच्या ज्ञानीजनांनी दीक्षा असे म्हटले आहे. ही दीक्षा योगवासिष्टांत सांगितल्याप्रमाणे चार प्रकारांनी घडून येते –

दर्शनात् स्पर्शनात् शब्दात् कृपया शिष्य देहके ।
जनयेत् यः समावेशं शाम्भवं स हि देशिकः ॥
(निर्वाण प्रकरण – 1/128/161)

अर्थात् सद्गुरूंच्या दर्शनाने (दृष्टिपाताने), स्पर्शाने, मंत्र वा नामाच्या माध्यमांतून अथवा केवळ संकल्पाने शिष्याच्या देहांत ‘शिवभावाचा’ ‘आवेश’ निर्माण करूं शकतात व तेच देशिक म्हणजे सद्गुरू होत. मूलधारांत सुप्त कुंडलिनीशक्तीला जागृत करून क्रियावती करणे यासच शास्त्रांत शक्तिपात असे म्हणतात. गुरू-शक्तीचे शिष्याच्या देहांत पात म्हणजे पतन होणे म्हणजेच शक्तिपात. अशा शक्तिपाताने योग्य शिष्यांचा उद्धार होतो व अयोग्य शिष्याला प्रथम योग्य बनवून त्याचाही उद्धार करणे हेच सद्गुरूंचे कार्य असते. या जागृत कुंडलिनीशक्तीलाच अनेकविध नावांनी संबोधिण्यात आलेले आहे. योगदर्शनात तिला ‘प्रत्यक् चेतना’, भक्तिमार्गात ‘आल्हादिनी शक्ति’ वेदान्तांत ‘प्रज्ञान’ वा ‘संवित्ति’, तंत्रात ‘श्रीजगदंबा, श्रीविद्या’, हीच अनेक देव-देवतांची देवात्मशक्ती आहे. सीता, राधा, गौरी हीच आहे. ‘कुंडलिनी’ हा हठयोगाचा शब्द आहे.

‘शक्तिपात’ या शब्दाऐवजी शास्त्रांत अनेक वैकल्पिक शब्दांचा वापर केलेला दिसून येतो. कुणी कुंडलिनीयोग, कुंडलिनी सिद्धमहायोग, सिद्धमहायोग, पंथराज, दत्तमार्ग, पाशुपतोयोग, क्रियायोग, सहजयोग, इत्यादि अनेक नावांनी शक्तिपाताचा उल्लेख केलेला आहे. शक्तिपाताचा सिद्ध वा सहजयोग म्हणण्याचे कारण आद्य सिद्धगुरू भगवान शंकरांनीच हा योग सिद्ध म्हणजे आयता तयार करून ठेवलेला आहे. यांत शिष्याला स्वतः काहीही करायचे नसते. केवळ तटस्थ वा साक्षीभावाने डोळे मिटून, आसनावर आपल्या अंतरगांत काय घडते आहे ते अनुभवायचे, पाहायचे असल्याने हा सिद्ध आणि सहजयोग होतो. अशा या शक्तिपात वा कुंडलिनी सिद्धमहायोगाने काय साधावयाचे आहे? शक्तिपाताचे साध्य कोणते? हा महत्त्वाचा प्रश्‍न उभा राहतो. त्याचे उत्तर देण्यापूर्वी या साधनेबद्दल जे काही भ्रम निर्माण झालेले असतात तेही दूर करणे आवश्यक आहे.

(1) दीक्षा झाल्यानंतर साधकाला असा भ्रम होण्याचा संभव असतो की आता आपले सर्व काम संपले. आता गुरू आणि त्यांची शक्ती जे काही करणार असेल ते करोत, आपल्याला काहीही करायचे नाही. काही करायचे नाही हे खरे, पण आसन घेऊन एकान्तात साधनेसाठी बसायला तर हवे ना? तास-दोन तासांचा वेळ तर साधनेसाठी देणार ना? काही साधक 15-20 मिनिटांची साधना करतात आणि आम्हाला काही उच्च अनुभूती येत नाहीत अशी तक्रार करतात. खरोखर साधना कशासाठी करायची, साधनेतून काय साध्य करायचे आहे, याची कल्पनाच अशा साधकांना नसल्याने त्यांचे गार्‍हाणे ते सांगत असतात. वास्तविक शक्तिपाताने शक्ती जागृत होते म्हणजे काय होते, हे समजून घेतले पाहिजे. सुप्त शक्ती (कुंडलिनी) जागृत होते. म्हणजे शक्ती झोपते व जागी होते हा औपचारिक शब्दप्रयोग आहे. शक्ती कधीही झोपत नाही व झोपलेली जागृत होत नाही. शक्ती सुप्त असते याचा अर्थ आत्म्याची शक्ती, आत्म्यातून निघून चित्त-मनांतून ती इंद्रियांत येते व इंद्रियांच्याद्वारे ती जगाकडे, जगांतील अनेक कर्मांकडे प्रवाहित होते. या शक्तीनेच जगातील सर्व कार्ये होत असतात. शक्तीशिवाय कोणतेही कार्य होऊ शकत नाही. आत्म्यातून इंद्रियांच्या द्वारे बहिर्मुख प्रवाहित होणार्‍या या क्रमास शक्तीचा प्रसवक्रम असे म्हणतात. यांत शक्ती प्रसवाचे, निर्मितीचे कार्य करते. शास्त्रांत शक्तीच्या या स्थितीला सुप्तावस्था म्हणतात. शक्ती जेव्हा उलट क्रमाने, म्हणजे इंद्रियांकडून चित्ताकडे-चित्ताकडून आत्म्याकडे अंतर्मुखी  प्रवाहित होते, तेव्हां तिच्या या क्रमास प्रतिप्रसवक्रम असे म्हणतात. शक्ती प्रतिप्रसवक्रमांत आपल्या कारण, आत्म्यास भेटावयास निघते. शक्ती प्रथम जेथून उद्भूत झाली होती, तेथेच परत ती विलीन होण्यासाठी येते. ही शक्तीची जागृत अवस्था. शक्ती मूलाधारातून वट्चक्रांचा वेध घेत सहस्रारपद्मांत शिवास भेटण्यास येते. हा तिचा प्रवास सुषुम्नानाडीतून सुरू होतो. सुषुम्ना ही एक अत्यंत सूक्ष्म नाडी असून तिच्यांतून शक्तीचा प्रवाह ऊर्ध्वगामी होऊन अधिकाधिक सूक्ष्मता प्राप्त करीत जातो. याच स्वरूपांत शक्तीला वज्रा आणि चित्रिणी या नाड्यांमधून भेद करीत शेवटी ब्रह्मनाडी अथवा आनंदमय कोषात गमन करावे लागते. हीच ऐश्‍वर्याची, परम साम्यावस्थेची, अखंड स्वानंदाची अवस्था आहे. केवळ कुंडलिनीच्या पूर्ण जागृतीनेच ही अद्वितीय, पूर्ण, आत्मस्थिती लाभते. सर्व जगतांतील प्राणी, पदार्थ, वस्तू ब्रह्मरूपांत परिणत होत जाऊन अत्यंत उच्च, शाश्‍वत, आनंदघन अशा ब्राह्मी स्थितीचा लाभ घडतो आणि हेच शक्तिपात साधनेचे अंतिम साध्य वा लक्ष्य आहे.

‘इये अभ्यासी जे दृढ होती । ते भरवसेनि ब्रह्मत्वा येति ॥

असे आश्‍वासन श्रीज्ञानेश्‍वरमहाराजांनी दिले आहे. या अंतिम ध्येयापर्यंत पोहचण्यापूर्वी साधकाला साधनेच्या मार्गाने बराच प्रवास करावयास हवा. साधनेची थोडीसुद्धा उपेक्षा करता कामा नये. साधनेचे महत्त्व सांगताना श्रीसमर्थ रामदासस्वामी म्हणतात –

जें महा वस्तूचे साधन । जे अद्वैत बोधाचे अंजन ।
जेणें पावती समाधान । महायोगी ॥
साधने वीण ब्रह्मज्ञान । तेणें बुडे समाधान ।
अंगी जडे देहाभिमान । वाचाळपणें ॥
साधने वीण बाष्कळता । तीच जाणावी बद्धता ।
तेणें अनर्गळता । आसक्त रुपें ॥
म्हणोनि साधनासी जो सिद्ध । तोचि ज्ञाता परमशुद्ध ।
येर ते जाणावे अबद्ध । अप्रमाण ॥

सद्गुरूंनी दिलेले कुंडलिनीमहायोगाचे साधन हे सिद्ध साधन आहे. येथे दिक्षेच्या वेळी व नंतरही शक्ती-जागृतीचा प्रत्यक्ष अनुभव येतो. शक्ती जागृत झाल्यानंतर तिची क्रियाशीलता साधक द्रष्ट्याभावाने प्रत्यक्ष अनुभवू शकतो. प्रथमतः देहशुद्धी, नाडीशुद्धी व नंतर चित्तशुद्धी, शक्तीच्या आपोआप घटित होणार्‍या क्रियांनी होत जाते. साधकाच्या चित्तांत या जन्मीचे व पूर्वजन्मांतील केलेल्या कर्मांचे संस्कार संचित झालेले असतात. जागृत शक्ती या संस्कारांना क्रियांमध्ये परिणत करून त्यांना बाहेर घालवत असते. चित्तांत जशा प्रकारच्या कर्मांचे संस्कार असतील तशाच प्रकारच्या क्रिया शरीरांत होत असतात. अर्थात् या क्रिया होत असतांनाही कष्ट वा क्लेश तर होतच नाहीत, उलट आनंदाचा आवेश वा स्ङ्गुरण होत असते. शरीर हलके व सतेज बनते. चित्तशुद्धी होत असल्याने मन प्रसन्न व सात्त्विक होऊन एकाग्र होऊ लागते. या क्रियांमुळे होणार्‍या आनंदाचे वर्णन करता येत नाही. या क्रिया चित्तांतील संस्कार व तत्त्वांच्या आधारावर होत असतात. मूलाधारांत पृथ्वीतत्त्व असल्याने, त्या चक्रावर शक्ती क्रियाशील झाली म्हणजे क्रिया वेगळ्या. जल, अग्नी, वायू व आकाश या तत्त्वांतील क्रियांचे स्वरूप वेगवेगळे असते. संस्कारांच्या आधारावरील क्रियाही अनेकानेक प्रकारच्या असतात. उदाहरणार्थ – भक्ती, जप, उपासना इत्यादिंचे संस्कार असतील तर विविध स्तोत्रे साधक साधनेत गात असतो. अनेक प्रकारचे मंत्र आपोआप उच्चारीत असतो, भक्तिभावाने डोलत असतो. हठयोगाचे संस्कार असतील तर साधकाला साधनेत अनेक प्रकारची आसने, बंध, मुद्रा, प्राणायाम आपोआपच सहज होत असतात. संगीताचे संस्कार असतील तर साधक अनेक राग-रागिण्या तालासुरावर गाऊ लागतो. प्रणवाचा दीर्घ सूर लागतो. श्रीमुकुंदराजांनी आपल्या परमामृत ग्रंथांत या क्रियांचे फार सुंदर वर्णन केलेले आहे.

निवांत भोगी स्वरूप । डुल्लत आपोआप ।
मग तया सुखाचे माप । कवण करी ॥
स्वेद कंपादि उठती । अष्टसात्त्विक भाव प्रगटती ।
पावे साम्राज्य संपत्ति । रंक जैसा ।
चित्त चैतन्यीं हारपे । उरिजे ज्ञप्ति स्वरूपें ।
अखंडित आप आपें । ब्रह्मानंद ॥
जैसे अमृत चाखें आपुली चवी । तैसे स्वसुख अनुभवी ।
तेथें कोण आठवी । संसारासी ॥
आनंद आनंदासी घोटी । बोलता परेसी पडे मिठी ।
मुक्याने सुखाच्या गोष्टी । केवि कीजे ॥

सद्गुरूंनी शक्तिपात केल्यानंतर साधक-शिष्याच्या अंतर्बाह्य देहात या क्रिया आपोआप होऊ लागतात. काही क्रिया सूक्ष्मस्तरावर होत असतात. उदाहरणार्थ ध्यान लागणे, दिव्यदर्शने वा दिव्य रंग-वर्णाच्या आकृती दिसणे, इष्ट देवदेवतांची दर्शने, सिद्ध, सत्पुरुषांची दर्शने, आपल्याच स्थूल, सूक्ष्म व कारणदेहांची दर्शने इत्यादि अलौकिक क्रियाही अनुभवास येतात.

सर्वच साधकांना समान क्रिया होत नाहीत. प्रत्येकाच्या क्रिया वेगवेगळ्या असल्यामुळे काही साधकांना असे वाटते की आपणांस यापेक्षा अधिक चांगल्या, अधिक जोराच्या क्रिया व्हाव्यात. असा विचार करणे, अशी इच्छा करणे म्हणजेच साधनेत प्रतिबंध वा अडथळा निर्माण करणे होय; कारण क्रिया साधक करीत नसून शक्ती करीत असते. शक्ती ज्ञानवती आहे. साधकाचे चित्तशुद्धीसाठी कोणत्या क्रियांनी कोणते संस्कार घालावावयाचे आहेत, हे तिला कळते. तुमची इच्छा तिच्या मार्गांत अडथळा निर्माण करते. अशा वेळी साधना बंदही होऊन जाते. म्हणून साधकाने सर्व काही शक्तीवरच सोपवावे. तिला जे योग्य वाटेल तसे ती करील.

कुणाकुणाला फार घाई झालेली असते. त्याला वाटते आपल्याला समाधी केव्हा व कशी लागेल; परंतु प्राप्त घडी आल्याशिवाय तातडीचा काही उपयोग नसतो. अध्यात्माच्या क्षेत्रात अशी घाई करणे चुकीचे असते. प्रत्येकाची चित्तभूमी, संस्कार, शरीराची क्षमता, धैर्य, शरणागती, समर्पण, गुरुभक्ती वेगवेगळ्या प्रकारची असल्याने सर्वांना समान अनुभव मिळणे कदापि संभवनीय नाही. प्रत्येकाचा उत्साह, साधनेतील सातत्य, साधनेवरील व सद्गुरूवरील श्रद्धा व निष्ठा यांत फरक असल्यामुळे, सद्गुरूंनी सर्वांवर समान कृपेचा वर्षाव करूनही, साधकांमध्ये विषमता दिसून येते. सूर्याची उष्णता, पर्जन्यमान, हवामान समान असूनही क्षेत्रभूमी अनुसारच कमीअधिक पीकांचे उत्पन्न येते. हीच गोष्ट लक्षात ठेवून साधकाने सदैव समाधानी असले पाहिजे.

वर सांगितल्याप्रमाणे काही साधक 10-15 मिनिटेच साधन करतात. अर्थात् काहीच न करण्यापेक्षा थोडेफार करणं ठीक आहे. परंतु थोडा वेळ साधन करून महान् उपलब्धिची अपेक्षा करणे म्हणजे केवळ मनोराज्य करण्यासारखे आहे. काही साधक नित्य, सतत, प्रतिदिन साधना करीत नाहीत. आठवड्यांतून एक-दोन वेळा, महिन्यातून दोन-तीन वेळा म्हणजे खंडित साधना करतात. साधनेत जो खंड पडतो त्या कालात आणखी नवे नवे संस्कार आम्ही जमवून घेतो व शक्तीला अधिक भार निर्माण करून ठेवतो. त्यामुळे जुने संस्काराचे मोठे ओझे तिला उचलावयाचे असतांना आपण त्यांत अधिक भर घालून तिची प्रगती, उन्नती रोखून ठेवतो. त्यामुळे साधना व साधनेतील क्रियांचा आवेश मंदावतो व साधक निरुत्साही होतो. काही वेळा धैर्य सोडून तो साधनाही सोडून बसतो. अशा वेळी तो एखाद्या अन्य गुरूकडे वा साधनमार्गाकडेही वळण्याचा संभव असतो. काही साधक आपले मुख्य साधन बाजूला सारून अन्य साधनेलाच प्राधान्य देत असतात. इतके प्रभावी, विलक्षण, प्रत्यक्ष अनुभवगम्य, स्वानंदाचा लाभ देणारे तीव्रतम गतीने ब्रह्मसाक्षात्काराकडे नेणारे साधन सोडून, काही साधक बहिर्मुखी, साधनांमध्ये अधिक रुची घेतात. त्यामुळे अशा साधकांची ‘इदंच नास्ति, परं च न लभ्यते ।’ अशी अवस्था होऊन बसते. श्रीगुरुकृपेने प्राप्त झालेले शक्तिपाताचे साधन आणि अन्य साधना यांच्यातील फरक सांगताना श्रीसंत एकनाथमहाराज ‘भागवतात’ म्हणतात –

कोटी कोटी साधने करिता । गुरुकृपेवीण सर्वथा ।
हें नये कोणाचे हातां । जाण तत्त्वतां उद्धवा ॥

गुरुकृपेशिवाय ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती, स्व-स्वरूपाची प्राप्ती होत नाही. हा उपाय (गुरू उपाय) सोडून अन्य उपाय करणार्‍या साधकाला अपाय मात्र होण्याचा संभव असतो. श्रीएकनाथमहाराज इशारा देतात –

‘गुरू कृपे वीण जे उपाय । ते अपाय साधका ।’

इतके स्पष्टपणे सांगूनही साधक अन्य उपाय, अन्य मार्गांनी जातच असेल, तर ते त्याचे प्रारब्ध समजायचे.
शक्तिपात साधनेचेही दोन स्तर आहेत. त्या दोन्ही स्तरांवर जेव्हा साधक साधना करू लागतो, तेव्हाच चित्तशुद्धी, अंतःकरणशुद्धी, शरीरशुद्धीची प्रक्रिया शीघ्रातिशीघ्र घटित होते. चित्तशुद्धीशिवाय अध्यात्मातील पुढील उच्च अशा समाधी, जीवन्मुक्ती, विदेहावस्था, कैवल्यावस्था, ब्राह्मीस्थिती इत्यादि अवस्था साधकाला कदापि प्राप्त होऊ शकणार नाहीत. साधनेचे हे दोन स्तर म्हणजे (1) साधनेची बैठक व (2) व्यवहारशुद्धी हे होत. साधनेच्या बैठकीत देहात होणार्‍या सर्व प्रकारच्या क्रिया शक्तीच करवीत असते. त्यात आमचा कोणताही पुरुषार्थ, कर्तृत्व, अहंकार, आसक्ती वा वासना नसते. जे होत आहे ते केवळ द्रष्टा, साक्षीभावाने पाहत असायचे. साधकाचा कोणताही प्रयत्न वा हस्तक्षेप त्यात नसतो. शक्ती चित्तातील संचित संस्कार क्रियांच्या माध्यमांतून बाहेर घालवून चित्ताची शुद्धी करते. साधनेच्या एका बैठकीत काही थोडे संस्कार क्षीण होतात. बाकी उरलेल्या वेळेत जगाच्या व्यवहारात, प्रपंचात, अहंकारयुक्त होऊन, कर्तृत्वाच्या भावनेने केलेल्या कर्मांचे अनेक संस्कार चित्तांत संचित करून घेतो. बैठकीत थोडे संस्कार घालविले व व्यवहारात अनेक संस्कार जमविले, असे जर दररोज होत राहिले, तर चित्त कधीही पूर्णतः शुद्ध होणारच नाही आणि चित्तच शुद्ध झाले नाही तर पुढील उच्च अवस्थांची अनुभूती येण्याची संभावनाच नाही. म्हणून साधनेच्या दुसर्‍या स्तरावर, व्यवहारातील सर्व कर्मे करताना मी कर्म करीत नसून ती गुरुशक्ती, भगवद्शक्तीच करीत आहे, असे समजावे. जे कर्म करायचे ते ईश्‍वराचे, गुरूचे कार्य आहे, मी कर्ता नसून तेच माझ्याकडून करवून घेत आहेत असा भाव ठेवावा. कर्तृत्व माझे नाही तर भोक्तृत्वही आपोआप ईश्‍वराकडे, गुरूंकडे जाईल. कर्म माझे नाही, मी करणारा नाही, तर मग कर्माचे फळ तरी कसे असणार? अर्थात् कर्म तर करावेच लागेल पण फल देणे, कमी-जास्त देणे, न देणे ईश्‍वराधीन आहे. फलही मिळणारच. पण अशा भावनेने केलेल्या कर्मालाच निष्कामकर्म म्हटले गेले आहे. निष्कामकर्माचे संस्कार चित्तांत संचित होत नसल्याने, नवीन कर्मसंस्कारांची भर चित्तांत पडणार नाही. साधनेच्या बैठकीने आहेत ते संस्कार घालविले जात आहेत. अशा तर्‍हेने चित्तशुद्धी शीघ्रतेने होत जाते. प्रगाढ ध्यानाची, एकाग्रतेची अनुभूती येत जाते आणि शक्तिपात साधनेने साध्याकडे जाताना अनेक अलौकिक आनंदाचे अनुभव येत जातात. हे उच्च पातळीवर येणारे अनुभव म्हणजेच अमृतानुभव होत. श्रीज्ञानेश्‍वरमाऊलींनी याच पंथराजाने अध्यात्माचा प्रवास केला. त्यांच्या अमृतानुभव ग्रंथात या अनुभवांचेच त्यांनी इतरांच्या कल्याणासाठी, पथप्रदर्शनासाठी, हे गुप्त, रहस्यमय अनुभव अभिव्यक्त केलेले आहेत. ते म्हणतात –

परि गा श्री निवृत्तिराया । हातातळी सुखविलें तुं या ।
तरि निवांतचि मिया । भोगावें कीं तें ॥ प्र.10-1
ज्ञानदेवो म्हणे श्रीमंत । तें हें अनुभवामृत ।
सेवोनि जीवन्मुक्त । हें चि होती ॥ प्र.10-19

स्थलाभावी या ओव्यांचे विवरण करणे उचित नसल्याने त्यांचा थोडक्यात मथितार्थ कळणे आवश्यकच आहे. श्रीज्ञानेश्‍वरमाऊली म्हणते, ‘‘हे परम शिवरूपी श्रीसद्गुरू निवृत्तिराया, आपला वरदहस्त कृपेने माझ्या मस्तकावर ठेवून मला तत्काळ सुखी केले. वास्तविक ते सुख मी एकट्याने निवांतपणे भोगावे असे होते, परंतु असे हे ऐश्‍वर्ययुक्त स्वरूपसुखाचे अनुभवामृत सेवन करूनच साधक जीवन्मुक्त होतात.’’
येया कारणें मिया । गोप्य दाविले बोलोनिया ॥ प्र.10-14
आणि म्हणूनच हे गुप्त रहस्य मी उघड बोलून दाखविलेले आहे.
॥ इति ॐ तत्सत् ॥