Vasudev Niwas | © 2023 All rights reserved | Developed by Digital Canvas
ब्रह्मश्री श्री दत्तात्रय कवीश्वर महाराज चरित्र सारांश
प. पू. श्रीदत्तमहाराज कवीश्वर यांचा जन्म २ मार्च १९१० रोजी श्रीक्षेत्रनृसिंहवाडी येथे झाला. त्यांचे आजोबा प.पू. श्रीवक्रतुंड महाराज आणि वडील प.पू. श्रीधुंडिराज महाराज दोघेही अधिकारी सत्पुरुष होते. प.प. श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजाचे कृपाछत्र कवीश्वर घराण्यावर होते. प.पू. श्रीदत्तमहाराज यांचा जन्म झाल्यावर त्यांना मांडीवर घेवून स्वामी महाराजांनी सांगितले की या ‘बालकाच्या रुपात आजोबांनीच म्हणजे प.पू. श्रीवक्रतुंड महाराजांनी पुन्हा जन्म घेतला आहे.’ प.प. श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांच्या शिष्य पंचायतानापैकी एक प.प. श्रीदिक्षित स्वामी महाराजांचा निकटचा दीर्घकाळ सहवास प.पू. श्रीदत्त महाराजांना लाभला. त्यांच्या देखरेखीतच महाराजांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले.
वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी प.प. श्री दिक्षित स्वामिमहाराजांच्या आज्ञेने त्यांनी पहिला भागवत सप्ताह औरवाड येथील श्रीअमरेश्वर मंदिरात केला. पं. नागेश्वरशास्त्री उप्पनबेट्टीगिरी यांच्या धारवाड येथील वेदपाठशाळेत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. ते वेदशास्त्र, धर्मशास्त्र, काव्यशास्त्र, न्यायशास्त्र, मीमांसाशास्त्र, व्याकरण या विषयांतील प्रकांड पंडित होते. पुण्यातील टिळक महाराष्ट्र विद्यापीठात प.पू. श्रीदत्तमहाराजांनी प्रदीर्घकाळ अध्यापनाचे कार्य केले.
याच दरम्यान ते प.पू. योगीराज श्रीगुळवणी महाराजांच्या संपर्कात आले. सज्जनगडावर प.प. श्री श्रीधरस्वामींच्या सानिध्यात प.पू. दत्त महाराज असताना प.पू. श्रीगुळवणी महाराजांनी त्यांना शक्तिपात दीक्षा दिली. प.पू. श्रीगुळवणी महाराजांच्या आज्ञेवरून त्यांनी प.प. श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या संपूर्ण वाड्मयाचे १२ खंडांत संपादन केले.
प.पू. श्री दत्तमहाराजांनी वयाच्या ८२ वर्षांपर्यंत भारतभर भागवत सप्ताह केले. हजारो मुमुक्षूंना शक्तिपात दीक्षा दिली, भारतच नव्हे तर परदेशांतील अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. भारत सरकारकडून त्यांना राष्ट्रीय पंडित या बहुमानाने चार राष्ट्रपतींकडून सन्मानित करण्यात आले आहे. तसेच राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन् यांनी त्यांना ‘विद्यावाचस्पती’ ही पदवी बहाल केली. त्याच बरोबर द्वारकेच्या शंकराचार्य महाराजांनी महामहोपाध्याय, प्रयागच्या विद्वत् सभेने ब्रह्मश्री, वेदशास्त्रोत्तेजक सभा पुणे यांनी न्यायचूडामणी या पदव्यांनी त्यांना सन्मानित केले आहे. कांची कामकोटी पीठाच्या शंकराचार्य महाराजांनी त्यांना सुवर्णकंकण देवून सन्मानित केले आहे.
श्री वासुदेव निवासचे संस्थापक प. पू. श्रीगुळवणी महाजारांनी त्यांना श्रीवासुदेव निवासचे प्रधान विश्वस्त म्हणून नियुक्त केले होते. देश-विदेशातील हजारो साधकांना त्यांनी शक्तिपात दीक्षा दिली. प.पू. श्रीगुळवणी महाराजांनी लावलेल्या वटवृक्षाची जोपासना व संवर्धन श्री दत्त महाराजांनी आजीवन केले.
वयाच्या ८९ व्या वर्षी १९९९ साली १ मार्च रोजी पुण्यात त्यांचे महानिर्वाण झाले.
प. पू. ब्रह्मश्री श्रीदत्तमहाराज कवीश्वर यांचे तसेच गुरुपरंपरेतील महापुरुषांची ध्वनिमुद्रित चरित्रे ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.