Vasudev Niwas | © 2023 All rights reserved | Developed by Digital Canvas
प.प. श्रीनारायणदेव तीर्थ स्वामी महाराज चरित्र सारांश
प.प.श्रीनारायणदेवतीर्थ स्वामीमहाराज म्हणजे शक्तिपातयोगाचे आधुनिक प्रवर्तक. प.प. श्रीगंगाधरतीर्थ स्वामी महाराजांचे प.प. श्री नारायणदेव तीर्थ स्वामी महाराज हे एकमेव शिष्य आहेत. त्यांच्या द्वारा हा मार्ग समाजाला सहज उपलब्ध झाला. याचे श्रेय प.प. श्रीनारायणदेवतीर्थ स्वामी महाराजांना आहे.
प.प. श्रीनारायणदेवतीर्थ यांचे पूर्वाश्रमीचे घराणे गंगोपाध्याय आडनावाचे होते. तारिणीचरण हे त्यांचे वडील, अत्यंत धर्मनिष्ठ परंतु शांत वृत्तीचे होते. त्यांची आई नवदुर्गादेवी यासुद्धा धार्मिक वृत्तीच्या आणि सात्विक गुणाच्या होत्या. हे गंगोपाध्याय कुटुंब पूर्व बंगाल मध्ये फरीदपूर जिल्ह्यात मांद्रसार गावी राहात होते.
आतिथ्यव्रताचे कटाक्षाने पालन करणारे मातापिता रोजच्या अन्नाला महाग असत. पण साधू संन्याशी या घरासमोरून कधी विन्मुख जात नसत. अशा या नित्याच्या अग्नीदिव्याने तीर्थरूप तारिणीचरण आणि मातृदेवता दुर्गादेवी यांच्या तपश्चर्येला तेज चढत होते. या वाढत्या तेजाने साकार व्हायचे ठरवले. एका संन्याशाच्या मुखातून तशी अमृतवाणी पण बाहेर आली. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी इ.स.१८७० मध्ये तारिणीचरण पिताजी झाले. नवदुर्गादेवी माता झाली. तेजस्वी पुत्राचा जन्म झाला. बालकाचे नाव विप्रदेवशर्मा ठेवले. पण कालीकिशोर हे लाडके नाव पुढे रूढ झाले.
घरची गरिबी असल्याने कोडकौतुक बेताचेच होई. सर्व उणीवा भावनेच्या श्रीमंतीने भरून निघत. मुलाचे तेज काही वेगळे होते. पण परिस्थिती वारंवार त्याला झाकून टाकत होती. इतक्या चुणचुणीत, कुशाग्र बुद्धीच्या मुलाला गरिबीमुळे शिक्षण घेता आले नाही. जेमतेम इयत्ता सहावी पर्यंत शिक्षणाची मर्यादा गाठली. त्या लौकिक शिक्षणाला रामराम ठोकून कालीकिशोरला नोकरीचा मार्ग धरावा लागला.
कालीकिशोरची विरक्त प्रवृत्ती होती. अक्षर ओळख होऊन वाचता येऊ लागल्यापासून धार्मिक ग्रंथांचे वाचन तो मनापासून करी. याहीपेक्षा भगवद् भजनात तो लवकर तल्लीन होत असे. त्याला साधे राहणे आवडत असे. वयाच्या ८ व्या वर्षी मुंज झाली आणि गायत्रीच्या उपासनेचा अधिकार प्राप्त झाला. या अधिकाराचा काली किशोरने पुरेपूर वापर केला. अत्यंत निष्ठेने आणि श्रद्धेने गायत्रीची खूप उपासना केली. मुळचे तेज उपासनेने अधिक तेजाळले.
त्या काळात लग्न लवकर करण्याची पद्धत होती. घरात त्यासंबंधी विचार विनिमय सुरु झाला. ही कुणकुण कालीच्या कानावर पडताच त्याच्या मनात विरुद्ध विचारांचे बंड सुरु झाले. याचा परिणाम होऊन कालीकिशोर एके दिवशी अचानक बाहेर पडला. केवळ परमेश्वरावर भार टाकून त्याच्याच प्राप्ती साठी घर सोडले. या काळात कालीकिशोर ने खूप पायपीट केली. उपाशीपोटी वणवण भटकत राहिला. पूर्व बंगाल मधील बारेसाल पासून बरद्वान पर्यंत शेकडो मैल पायी प्रवास केला. वय तर अवघे १२-१३ वर्षाचे. हेतू पाहाल तर महान् तपस्व्याचा! पुरी ३ वर्षे अशा स्थितीत गेली. ना गुरूची भेट, ना देवाचे दर्शन! विचार करून कालीकिशोर थकला. शारीरिक कष्टांची मर्यादा ओलांडली. प्रतिकूल काळात स्वस्थ राहणे उत्तम असा विचार करून त्याने ३ वर्षाने परत घरात पाऊल टाकले. सर्वाना हायसे वाटले.
परत कालीकिशोरच्या लग्नाचा विषय सुरु झाला. आईवडिलांच्या इच्छेखातर नाईलाजाने वयाच्या अठराव्या वर्षी कालीकिशोर विवाहबद्ध झाला. सरोजीनीदेवींचा पत्नी म्हणून स्वीकार केला. पारमार्थिक मार्गामध्ये संसाराच्या जबाबदारीची भर पडली. ही जबाबदारी निभावण्यासाठी नोकरी सुरु केली. त्यातही मन लागेना म्हणून पुन्हा तो घराबाहेर पडला, वैद्यनाथधाम गाठले. चार दोन दिवस राहून पण त्याचे समाधन झाले नाही. तिथून त्याने पुरषोत्तम क्षेत्र म्हणजे जगन्नाथपुरी गाठले. इथे अनेक लोकांच्या गाठीभेटीत कराली ब्रम्हचारी या तरुणाची गाठ पडली. त्याने कालीकिशोरची तळमळ पहिली आणि एका झोपडीचा पत्ता दिला. त्याच तरुणाबरोबर कालीकिशोर त्या साध्या पर्णकुटी जवळ आला. आत प्रवेश करताच समोर भगवी वस्त्रे परिधान केलेली शांत, प्रसन्न आसनस्थ मूर्ती दिसली. तिथेच त्याला खऱ्या सद्गुरूंची प्रचीती आली. हे श्रीगुरुमहाराज म्हणजे प.पू.श्रीगंगाधरतीर्थस्वामीमहाराज होत.
इथेच इ.स.१८८६, वैशाख मासातील अक्षयतृतीयेच्या पर्वकाली श्रीगुरुमहाराजांनी कालीकिशोरला शक्तिपात दीक्षा दिली. यापुढे काही काळ कालीकिशोर श्रीगुरुदेव स्वामी महाराजांची सेवा आणि साधन यामध्ये पूर्ण रमून गेला. त्याला इतर कशाचेही स्मरण राहिले नाही. पण नंतर श्रीगुरुदेव स्वामी महाराजांनी त्याला उपदेश करून घरी जाण्याची आज्ञा दिली. गुरु आज्ञेचे पालन सर्वश्रेष्ठ मानले आणि त्याने आश्रम सोडला.
इ.स. १८९७ मध्ये यांच्यावर पितृवियोगाची आपत्ती वयाच्या २७ व्या वर्षीच कोसळली. कालीकिशोर थोरले म्हणून संसाराची जबादारी त्यांच्यावर येऊन पडली. पुढे ते पूर्व बंगालमधील ढाका जिल्ह्यातील विनिटिया या गावी आले व एका जमीनदाराकडे नोकरी सुरु केली. इथे अकरा वर्षे नोकरी सांभाळून त्यांनी अनेक अनुष्ठाने यथासांग पूर्ण केली. कालीकिशोरांच्या या दिनक्रमात यशस्वी होण्यात खरे सहाय्य झाले ते त्यांच्या धर्मपत्नीचे. पतिदेवांच्या अनुष्ठानामध्ये त्यांनी आपली जबादारी स्वत: सांभाळली.
श्रीनारायणदेवतीर्थ स्वामी महाराजांनी १९१३ मध्ये काली मातेच्या मंदिराचे नामकरण ‘ज्ञानसाधनामठ’ असे केले. १९१३-१९२० पर्यंतच्या काळात श्रीनारायणतीर्थ स्वामी महाराजांचा शिष्यवर्ग बराच वाढला. आश्रमाची जागा अपुरी पडू लागली म्हणून मदारीपूर येथे ज्ञानसाधनामठाचे स्थानांतर केले.
प.प. श्रीनारायणदेवतीर्थ स्वामी महाराज हे एक समर्थ गुरु होते. तसेच ते अत्यंत दयाळू होते. अनेक शिष्यांचे प्रारब्धभोग त्यांनी स्वतः भोगले व शिष्यांचा उद्धार केला. श्रीगुरुदेवांनी आता आपला प्रारब्धक्षय होत आला हे जाणले. आंत्रव्रणाने आजारी झाले. प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालली.
इ.स. १९३५ मध्ये सर्व शिष्यांच्या समोर बसून स्वामींनी सर्वांचा कायमचा निरोप घेतला.