tembe-swami-round
swami-loknath-terth-round
श्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे

प.प. श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराज चरित्र सारांश

shri-narasimha-saraswatiश्री दत्तात्रयाचे दुसरे अवतार आणि श्रीपाद श्रीवल्लभांचे उत्तरावतार म्हणून दत्त संप्रदायात प.प. श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराजांची ख्याती आहे. “श्रीगुरुचरित्र”या ग्रंथाचे चरित्र नायक तेच आहेत. कुरवपुर येथील ज्या अंबिका नावाच्या स्त्रीला श्रीपाद श्रीवल्लभांनी आशीर्वाद दिला होता तीच “अंबा भवानी” या नावाने करंज नगरातील वाजसनेय शाखेच्या ब्राम्हण कुळात जन्म पावली. तत्कालीन परिस्थितीनुसार योग्य वेळी तिचे लग्न त्याच गावातील शिवव्रती ब्राम्ह्णाशी झाले. पूर्वसंस्कारामुळे ती त्या वेळीही शनिप्रदोषी पतीसह शंकराची पूजा करीत असे. वयाच्या सोळाव्या वर्षी तिला एक पुत्ररत्न झाले. त्या पुत्राचे नाव नरहरी असे ठेवण्यात आले.हेच आपले “श्रीनृसिंहसरस्वतीस्वामी” होत.

जन्मताच हे तेजस्वी बालक ॐ कारचा उच्चार करू लागले. बालकाच्या अलौकिकत्वाची वार्ता सर्वत्र पसरली व त्या बालकाला पाहण्यासाठी अलोट गर्दी होऊ लागली. तो मुलगा सात वर्षाचा झाला तरी ॐकारा शिवाय एकही अक्षर बोलत नव्हता. आपल मुलगा मुका निघणार या भीतीने मातापित्यांना अत्यंत दुख: होऊ लागले. अखेर व्रत बंधनाचा उपाय करून पाहण्याचे ठरवले. सांगविधी विधाना नंतर नरहरीला गायत्री मंत्राची दीक्षा मिळाली आणि तो मातेकडे भिक्षा मागावयास गेला. ही भिक्षा मागताच त्याने मुखातून वेदवाणी प्रकटविली. त्यावेळी सर्वांनी ह्या दिव्य बटूला नमस्कार केला. जाणत्यांनी ओळखले कि हे आगळे स्वरूप म्हणजे देवाचा साक्षात् अवतारच होय!

हा सोहळा आटोपल्यावर बटूने आपले मातेस तीर्थयात्रेंला जाण्याची अनुज्ञा मागितली. परंतु आईने ती नाकारली. तत्क्षणीच बटूने साक्षात् श्रीपाद श्रीवल्लभांचे रूप आईला दाखवून पूर्व जन्मीच्या सर्व गोष्टींची आठवण करून दिली. त्यामुळे तिने बटूस अनुज्ञा दिली तथापि आपणास पुत्रसंतती प्राप्त होई पर्यंत आपल्यापाशी राहावे अशी इच्छा प्रकट केली. व ती बटूने मान्य केली. पुढे एका वर्षातच तिला दोन जुळे पुत्र झाले. या घटनेनंतर थोड्या कालावधीने सर्वांची अनुज्ञा घेऊन श्रीनरहरी बटू काशीयात्रेस निघाला. काशीला पोहचल्यावर नरहरी बटू वर्णाश्रम धर्मानुसार आचरण करू लागला. नरहरी बटूचे शास्त्रोक्त आचरण पाहून तेथील सर्व संन्याशांना आनद झाला व त्यांनी वयोवृद्ध व तपोवृद्ध अशा अधिकारी श्री कृष्णसरस्वतीस्वामीं मार्फत बटूने संन्यास घ्यावा असा आग्रह केला. त्यानुसार नरहरी बटूने श्री कृष्णसरस्वतींच्या कडून संन्यासदीक्षा ग्रहण केली व त्यांनी बटूचे नाव ‘नृसिंहसरस्वती’ असे ठेवले. श्रीनृसिंहसरस्वती महाराजांनी यानंतर काही काळ काशीत वास्तव्य केले. या ठिकाणी पुष्काळांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले. काही काळाने शिष्यासहित महाराज उत्तरेच्या यात्रेस निघाले. ह्या उत्तरेच्या यात्रेच्या निमित्ताने तीस वर्षे तीर्थाटन केल्यानंतर महाराज पूर्वाश्रमीच्या मातोश्रीस दिलेल्या शब्दांच्या पूर्ततेकरिता कारंजा येथे आले. आई-वडील बंधू-भगिनी यांच्या भेटी झाल्या. त्यावेळी तुम्हाला काशीक्षेत्री मृत्यू येऊन तुम्ही मुक्त व्हाल असे सांगितले. घरातील आणि गावातील सर्व प्रियजनांना आपला अल्प सहवास देऊन श्रीगुरुंनी
करंजनगर सोडले.

तिथून पुढे श्रीगुरुंनी अनेक ठिकाणी लीला केल्या. अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. अनेक जिज्ञासुंना व मुमुक्षांना परमार्थाची वाट दाखवली. परळी वैजनाथ (जिल्हा बीड) येथील एका वर्षाच्या अज्ञातवासा नंतर ते भिलवडी या गावी आले. श्री गुरूंच्या चातुर्मास-निवासामुळे भिलवडीचे पूर्वमहिमान शतगुणित झाले. पुढे ते कृष्णा-पंचगंगा या नद्यांच्या संगमावरील “अमरापूर” (जिल्हा कोल्हापूर) या गावी आले व तिथेच बारा वर्षे राहिले. त्यांच्या तपाएवढ्या सानिध्यामुळे हे स्थान पुढे “नरसोबाची वाडी” (श्रीक्षेत्र नृसिंहवाडी) म्हणून ओळखले जाऊ लागले. या एक तपाएवढ्या संगम-निवासात श्रीगुरुंनी अनेक लोकांना व्याधी मुक्त केले. एक तपानंतर श्रीगुरू भीमा- अमरजेच्या संगमावर असलेल्या गाणगापूर (जिल्हा गुलबर्गा, कर्नाटक) येथे आले. येथे त्यांनी दोन तपाएवढा काळ व्यतीत केला. गाणगापूर निवासात अनेक घटना घडल्या; अनेक आर्तांची दु:खे दूर झाली. अनेक जण त्यांच्या चरण सेवेत रुजू झाले.

या नंतर श्रीस्वामी महाराजांची बरीच प्रसिद्धी झाली व अधिक उपाधी वाढू नये म्हणून यात्रेच्या निमित्ताने श्रीपर्वतास जावे व दृश्य स्वरुपात गाणगापूर सोडावे असा विचार महाराजांनी केला व त्याप्रमाणे आपले मनोगत आपल्या शिष्यांस विदित केले. सर्व शिष्य व भक्त यांना अतिशय वाईट वाटले. “मी दृश्य स्वरुपात ह्या पार्थिव देहाने नसलो तरी गुप्त रितीने व अमूर्त स्वरुपात माझ्या प्रेमळ व अनन्य भक्तांकरिता मी गाणगापुरातच नित्य वास करणार आहे. मी माझ्या निर्गुण पादुका येथे ठेवितो व तेच माझे मूर्त स्वरूप आहे असे समजा व निश्चिंत राहा” असे आश्वासन देऊन महाराजांनी सर्वांचे समाधान केले. नंतर महाराज पुष्पासनावर बसून नदीतून कर्दळीवनाकडे जावयास निघाले. नावाड्या बरोबर महाराजांनी निरोप पाठविला की “आम्ही जातो कलि पाहोनी | सदा वसो गाणगाभुवनी” मठावर पोहोचल्यावर चार प्रसादपुष्पे येतील ती सायंदेव, नंदी, नरहरी व सिद्ध या चार शिष्यांनी घ्यावी. थोड्या वेळाने ते चिरपरिचित तेजोमय रूप हळूहळू धूसर दिसू लागले आणि प्रकाशाच्या असीम अर्णवात लुप्त झाले.

<< गुरुतत्व पृष्ठावर जा