Vasudev Niwas | © 2023 All rights reserved | Developed by Digital Canvas
प. पू. योगश्री श्री शरदशास्त्री जोशी महाराज
प. पू योगश्री श्री शरदशास्त्री जोशी महाराजांचा जन्म बार्शी (जि. सोलापूर) येथे अत्यंत धार्मिक व पुण्यशील कुटुंबात झाला. त्यांचे वडील व आजोबा दोघेही संस्कृत विद्वान होते. त्यांच्या कुटुंबाला पाच पिढयांचा श्रीमद् भागवत कथनाचा वारसा लाभला आहे.
पुण्यपावन कुटुंबात जन्मलेल्या श्री.जोशी महाराजांना वयाच्या अकराव्या वर्षी प.पू योगीराज श्रीगुळवणी महाराजांकडून कुंडलिनी शक्तिपात महायोग दिक्षेचे कृपादान प्राप्त झाले. तद्नंतर प.पू श्री.ब्रह्मश्री दत्तमहाराज कविश्वर यांचेकडून मंत्र दीक्षा प्राप्त झाली. प.पू योगतपस्वी नारायणकाका ढेकणे महाराज यांच्याकडून शक्तिपात दीक्षेचा अधिकार प्राप्त झाला.
प.पू श्री.जोशी महाराज हे “वासुदेव निवास आश्रम,पुणे ” ह्या महायोग शक्तीपीठाचे प्रधान विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत. तसेच, श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज प्रबोधिनी, बडोदा ह्या संस्थेचे उपाध्यक्ष आहेत.
श्री. जोशी महाराज एम.ए -बी एड (संस्कृत), साहित्य विशारद (संस्कृत) व काव्य मध्यमा -संस्कृत (कोलकत्ता) असे उच्च विद्या विभूषित आहेत. ते महाराष्ट्र शासनाच्या सेवेतून अधिकारीपदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांनी संस्कृत विषयाचे प्राध्यापक आणि प्राचार्यपद भूषविले आहे.
प.पू ब्रह्मश्री दत्तमहाराज कविश्वर ह्यांच्या आज्ञेने व आशीर्वादाने प.पू श्री जोशी महाराजांनी आपल्या रसाळ व मधुर वाणीने श्रीमद् भागवत ग्रंथांचे निरुपण करून सर्व भक्तांना मंत्रमुग्ध करत आहेत.
संस्कृत वाग् वर्धिनी सभा, बार्शी व भारतीय दर्शन परिषद, बार्शी ह्या संस्थेचे ते संस्थापक सदस्य आहेत. तसेच ते महाराष्ट्र शासन संस्कृत पाठ्यक्रम कृती आराखडा समितीचे सदस्य होते. अखिल भारतीय कीर्तन प्रवचन कुलसंस्था, जगद्गुरू शंकराचार्य शृंगेरी पीठ, ज्ञानेश्वर महाराज समाधी संस्थान, आळंदी अशा विविध संस्थांनी त्यांना सन्मानित केले आहे.
२०१२ साली संपन्न झालेल्या ‘विश्व महायोगसंमेलन’ व पुणे विद्यापीठातर्फे २०१४ साली संपन्न झालेल्या ‘श्रीवासुदेवानंद सरस्वतीस्वामीमहाराजांचे वाङ्मय योगदान’ संबंधित राष्ट्रीय परिषदेचे प.पू श्री.जोशी महाराज मानद प्रवर्तक आहेत.
प.पू श्री. जोशी महाराज ह्यांनी ‘विश्व संस्कृत प्रतिष्ठान,वाराणसी’ व ‘महाराष्ट्र शासन संस्कृत पाठयक्रम कृती आराखडा’ साठी सक्रीय प्रतिनिधित्व केले आहे. वरील सर्व उपक्रमांनबरोबरच इतर विविध अध्यात्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये त्यांचा मोठा सक्रीय सहभाग असतो.
प.पू श्री.जोशी महाराजांची ‘पाथेय’, ‘संस्कृती स्वाध्याय’ व ‘योग तपस्वी’ अशी वाड्मयीन प्रकाशने असून, अनेक वृत्तपत्र व मासिके यातून ते सातत्याने स्फुट लेखन करत असतात. ‘श्री वासुदेव निवास -पंथराज’ ह्या त्रैमासिकातून साधकभक्तांना सातत्याने मार्गदर्शन करत असतात.
प.प श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराजांचे सर्व वाङ्मय ‘जसेच्या तसे’ पुनर्मुद्रित करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प त्यांनी श्रीवासुदेव निवास चे प्रधान विश्वस्त या नात्याने पूर्णत्वास नेला. महायोगचा, देशातच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात प्रचार करण्याचे निरंतर कार्य प.पू योगश्री श्री. शरदशास्त्री जोशी महाराज करीत आहेत.