सुंदर ते ध्यान
स्मरणमात्रे होय ज्ञानप्राप्ती
राष्ट्रपिता महात्मा गांधी विश्वंद्य रामकृष्ण परमहंसांच्याबाबत सांगतात “रामकृष्ण परमहंसांचे जीवनदर्शन म्हणजे परमात्म्याचे प्रत्यक्ष दर्शन होय.”
श्रीगुरुगीतेमध्ये सद्गुरूंच्या माहात्म्याचे सुंदर वर्णन आले आहे. ते असे – ‘सद्गुरूंच्या वारंवार स्मरणाने आपोआप ज्ञान प्राप्ती होते. हे ज्ञान म्हणजे गुरुतत्त्व हेच ईश्वरी तत्त्व आहे. हे ज्ञान प्राप्त करून देणाऱ्या श्रीसद्गुरूंना मी नमस्कार करतो.’ हा विषय आपण स्वामी विवेकानंदांच्या चरित्रातून समजावून घेऊ.
स्वामी विवेकानंद भारत भ्रमण करीत करीत एके दिवशी गाझीपूर गावामध्ये आले. तिथे पाव्हारी बाबांचा आश्रम होता. पाव्हारी बाबा हठयोगी होते. आश्रम पाहून स्वामी विवेकानंदांना तेथे रहावेसे वाटले. स्वामींनी आश्रमात मुक्काम केला. अचानक स्वामी विवेकानंदांच्या पोटात दुखू लागले. त्यांना त्या तीव्र वेदना असह्य होत होत्या. म्हणून एके दिवशी “यावर हठयोगाचा उपचार करावा का?” असा विचार स्वामी विवेकानंदांच्या मनात आला.
त्याच दिवशी रात्री स्वामी विवेकानंद ध्यानाला बसले. त्यावेळी रामकृष्ण परमहंसांनी स्वामी विवेकानंदांना दर्शन दिले. रामकृष्ण परमहंस प्रेमाने स्वामी विवेकानंदांकडे पाहत होते. दुसऱ्या दिवशी ध्यानामध्ये स्वामी विवेकानंदांना पुन्हा रामकृष्ण परमहंसांचे दर्शन झाले. असे एक नाही, दोन नाही, तब्बल एकवीस वेळा एकवीस दिवस स्वामी विवेकानंदांना रामकृष्ण परमहंसांचे दर्शन घडत होते. स्वामी विवेकानंदांची साधना दिवसेंदिवस वर्धिष्णू होत होती. एकविसाव्या दिवशी स्वामी विवेकानंदांना शांततापूर्वक आनंदाची अनुभूती आली. ते कृतकृत्य झाले. बऱ्याच वेळाने स्वामी विवेकानंद मूळ स्थितीत आले. विशेष म्हणजे स्वामी विवेकानंदांचे पोटाचे दुखणे कमी झाले होते. “व्याधी जाण्यासाठी हठयोगाचा विचार करीत होतो” हे स्वामी विवेकानंद विसरूनच गेले होते. “आजही आपले गुरुदेव आपली किती काळजी घेतात” या विचाराने स्वामी विवेकानंद अतिशय व्याकुळ झाले आणि ते तत्काळ दक्षिणेश्वरीकडे निघाले.
दक्षिणेश्वरीला पोहोचताच स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंसांच्या खोलीपाशी गेले. त्यात प्रवेश करता क्षणी स्वामी विवेकानंदांच्या डोळ्यांमधून घळघळ अश्रू वाहू लागले. त्यांनी रामकृष्ण परमहंसांच्या गादीसमोर लोळण घेतली. स्वामी विवेकानंद वारंवार रामकृष्ण परमहंसांच्या गादीला स्पर्श करीत डोके टेकवित होते. गहिवरून आलेल्या स्वामी विवेकानंदांच्या मुखातून आपोआप शब्द बाहेर पडतात. ते असे – “हे गुरुमाऊली ! या जगामधील सत्य, प्रकाश आणि आनंद आपणच आहात यात शंका नाही. श्रीगुरु: शरणम्।”
तात्पर्य,
‘स्मरणमात्रे होय ज्ञानप्राप्ती ।’
……………………..