सुंदर ते ध्यान
अनुभवे पातले, तद्-रूपता
श्रीमद्भगवद्गीता ‘महायोग शास्त्राचा’ प्रमाण ग्रंथ आहे. यामध्ये श्रीभगवंत अर्जुनाला‘महायोग सर्वांसाठी’ असे सांगतात म्हणजे ‘महायोग हा सर्वसामान्यांसाठी आहे’. तसेच ‘महायोग’ सर्व विद्यांमध्ये श्रेष्ठ आहे. विशेष असे की ‘महायोग’ करण्यास अतिशय सोपा आहे. याचा अर्थ असा की आपण होऊन कोणतीही कृती, म्हणजे मुद्रा इत्यादि, करणे नाही. त्यामुळे चित्तशक्तीला स्वातंत्र्य मिळते. त्याचा परिणाम असा की चित्तशक्ती आपोआप क्रियाशील होऊन साधकाला त्याच्या संस्कारांप्रमाणे निरनिराळे अनुभव येतात. सगळ्यात महत्त्वाचे असे की ‘महायोग’ हा बोलण्याचा अथवा चर्चेचा विषय नाही. श्रीभगवंत म्हणतात ‘याचे फळ प्रत्यक्ष आहे’ म्हणजे
‘महायोग’ अनुभव देणारा अर्थात् परमानंद प्राप्ती करून देणारा आहे.
श्रीभगवंतांनी अर्जुनाला केलेल्या उपदेशाचा अर्थ प्रत्यक्ष घडलेल्या प्रसंगातून आपण समजावून घेऊ. नागपूर येथील सहदेव आणि महादेव हे दोघे तरुण गिरणी कामगार होते. दोघांचा भाव श्रेष्ठ होता. योगीराज श्रीगुळवणी महाराजांकडून त्यांना महायोगाची दीक्षा प्राप्त झाली. दोघांना खूप आनंद झाला. त्यांना अतिशय सुंदर अनुभव आले. ते अनुभव त्यांनी श्रीगुळवणी महाराजांना पत्रा द्वारे कळवले. त्यापैकी सहदेव सांगतात ते असे “गुरुदेवा, मी डोळे मिटताच लख्ख प्रकाश दिसला. त्यामुळे माझे शरीर सर्व प्रकाशमय आहे असे दिसले. हा प्रकाशमोत्यासारखा चमकू लागला. त्यामध्ये निळा बिंदू दिसला. त्यानंतर मी खूप वेळाने भानावर
आलो. मला परमानंद झाला.” तसेच साधक महादेव सांगतात “महाराज, मी डोळे मिटून बसलो. त्यावेळी एक दोन आसने झाली. बराच वेळ कुंभकही झाला. नंतर भ्रूकुटीच्या ठिकाणी एकदम कंप होऊ लागला. मी देहभान विसरलो. या नंतर मला ‘काय होते आहे काय नाही’ हे कळले नाही. मी अत्यंत आनंदित होतो.” या दोन गिरणी कामगारांचे अनुभव साधकांना प्रेरणादायी आहेत. आजही अनेक महायोग साधकांना असे अनुभव येतात हे वास्तव आहे. म्हणून शक्तिपात महायोग एक विज्ञान आहे हे रहस्य आहे.
तात्पर्य, साधकाला येणार्या अनुभवांचे वर्णन श्रीमद्भगवद्गीतेत श्रीभगवंतांनी एकाच शब्दात केले आहे. ते म्हणजे ‘आश्चर्यवत्’. शास्त्रकार याचा अर्थ सुंदर रीतीने स्पष्ट करतात. तो असा- मानवी कल्पनेच्याही पलीकडे जे असते ज्याचे वर्णन शब्दांमध्ये करता येत नाही ते ‘आश्चर्य’ होय. संतश्रेष्ठ माऊली म्हणतात
‘अनुभवे पातले, तद्-रूपता ।’
……………………..