श्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे

सुंदर ते ध्यान

मी तुझ्या जवळच आहे

आद्य शं‍कराचार्यांचे ‘हरिस्तुति’ नावाचे प्रासादिक स्तोत्र आहे. यामध्ये सर्वव्यापक परमात्म्याची स्तुति केलेली आहे. सर्वव्यापक परमात्मा दयाळू व सर्वांवर समान प्रेम करणारा आहे असे वर्णन करून आचार्य पुढे क्रमश: समजावून सांगतात “परमात्म्याने त्याच्या एका अंशातून संपूर्ण विश्व निर्माण केलेले आहे. विश्वाची उत्तम व्यवस्था त्याने केलेली आहे. त्याने पृथ्वी, जल, सूर्य, वायु, आकाश, नक्षत्र, तारे इत्यादींची शिस्तबद्ध रचना केली आहे. इतकेच नव्हे तर हा परमात्मा संपूर्ण जगात आतून बाहेरून व्यापलेला आहे. या परमात्म्याने आपल्या तेजाने सर्व जगाला तेज दिलेले आहे. यालाच ‘चैतन्य’ म्हणतात. अशा परमात्म्याची मी स्तुति करतो.”

तसेच ‘परमात्मा सामर्थ्यशाली आहे’ हे आचार्य उदाहरणातून समजावून सांगतात. परमात्म्याने निर्माण केलेला सूर्याचा प्रकाश इतका महान आहे की संपूर्ण ब्रह्मांड त्याच्याद्वारा प्रकाशित होते. हे सूर्याचे तेज भगवंताचेच आहे. सूर्याची उष्णता अतिशय प्रखर आहे. यावर शास्त्रज्ञ सांगतात की संपूर्ण पृथ्वीच्या एवढे इंधन एकत्र करावे. ते चोहोबाजूने एकदम पेटवावे की उष्णता निर्माण होईल. ती उष्णता सूर्याच्या उष्णतेसमोर फक्त पंधरा मिनिटे टिकू शकेल. एवढी प्रचंड उष्णता परमात्मा निर्मित सूर्याजवळ आहे हे सिद्ध झाले. जर सूर्य इतका सामर्थ्यशाली आहे तर स्वतः भगवंत किती सामर्थ्यशाली आहेत याची आपण कल्पना करू शकत नाही.

पुढे आचार्य आणखी एक उदाहरण देतात. परमात्मा निर्मित चंद्र आपल्या अमृतमय किरणांनी विश्वाला शांति देणारा आहे. चंद्राच्या मधुर किरणांनी औषधी वनस्पति व वृक्ष सुपुष्पित व सुफलित होतात. म्हणजे चंद्रामुळे मानवाला रसमय व सकस अन्न प्राप्त होते. चंद्राची ही पोषक शक्ती भगवंताचीच आहे. सारांश, परमेश्वर सामर्थ्यशाली आहे हे सत्य आहे.

परमात्म्याची अशी स्तुति करून आचार्य म्हणतात “हे मानवांनो ! हा सर्वव्यापी परमात्मा सूर्याप्रमाणे तेजस्वी आणि चंद्राप्रमाणे रसमय जीवन देणारा आहे. तो आत्मबळ वाढवणारा आहे त्याचे स्मरण करा.”

तात्पर्य, महायोग साधकाला साधनेमध्ये अर्थात् ध्यानामध्ये परमात्मा लख्ख प्रकाशाची आणि मी तुझ्याजवळच आहे ही अनुभूती देतो. असे स्वयंप्रकाश परमात्म्याचे सामर्थ्य आहे.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सांगतात

‘सुवर्णाचे मणी केले । ते सोनियाचे सुतीं वोविले ।
तैसें म्यां जग धरिलें । सबाह्याभ्यंतरीं।।’

……………………..

<< स्मरण तुझे मज नित्य असावे