श्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे

सुंदर ते ध्यान

संत हेच देव

श्रीगोदावरी काठावरील आनंद आश्रमात सत्संग होता. महात्मा श्रीस्वामिमहाराज सांगतात “श्रीमद्भागवतामध्ये नवयोगी आणि जनक राजा यांचा संवाद आहे. हे ‘नवयोगी’ पुढे नवनाथ म्हणून प्रसिद्ध झाले. जनक राजा विचारतो “ईश्वर दर्शन कसे होईल?” नवयोगींपैकी एकजण सुंदर रीतीने सांगतात “हे राजा, प्रत्येक मानवाच्या बुद्धीमध्ये ‘प्रकाशरूप परमात्म्याचे’ दर्शन होते. परंतु ज्याप्रमाणे आरशावर धूळ साठल्यामुळे प्रतिबिंब दिसत नाही. मळ दूर केल्यावरच प्रतिबिंब स्वच्छ दिसते. त्याचप्रमाणे बुद्धीरुपी आरशावर संशयाचा मळ साठला आहे. संतांचा सहवास आणि साधना यांद्वारे सर्व दोष दूर होतात. अशा स्वच्छ बुद्धीत ‘प्रकाश पडणे’ म्हणजेच
‘प्रकाशरूप ईश्वराचे दर्शन’ होय.”

शास्त्रकार सांगतात की महापुरुषांचा अर्थात् संतांचा आश्रय असणे मानवासाठी अत्यंत आवश्यक आहे. याचे कारण असे- या युगामध्ये ‘संत हेच ईश्वर’ आहेत. म्हणजे ईश्वराचे दर्शन हे संत रूपातच होते हे सत्य आहे. हा विषय श्रीस्वामिमहाराज एका प्रसंगातून समजावून सांगतात. तो प्रसंग असा- “नलकूबर आणि मणिग्रीव हे दोघे कुबेरपुत्र होते. त्यांना श्रीमंतीचा अतिशय अभिमान झाला. त्यामुळे त्यांच्याकडून प्रमाद घडला. तो म्हणजे त्यांनी ऋषींचा अपमान केला. देवर्षी नारदांना हे सहन झाले नाही. ते नलकूबर आणि मणिग्रीव यांना म्हणतात “तुम्हाला श्रीमंतीचा गर्व झाला आहे. ऋषींचा अपमान केल्यामुळे तुम्हाला वृक्षाचा जन्म घ्यावा लागेल.” त्याप्रमाणे नलकूबर आणि मणिग्रीव यांना वृक्षजन्म प्राप्त झाला. ते वृक्ष म्हणजे गोकुळामधील ‘दोन अर्जुनवृक्ष’ होत.

कालांतराने गोकुळामध्ये बाल श्रीकृष्णांना माता यशोदेने उखळाला बांधले होते. ते उखळ काढण्याच्या प्रयत्नात बाल श्रीकृष्णाने जोरदार धक्का दिला. त्या धक्क्याने दोन्ही अर्जुनवृक्ष उन्मळून पडले. त्यामधून दोन दिव्य पुरुष म्हणजे नलकूबर आणि मणिग्रीव प्रकट झाले. पूर्वीचे शरीर प्राप्त झाल्याने त्यांनी श्रीभगवंतांची प्रार्थना केली. ती अशी- “हे देवाधिदेवा, आज आपले दिव्य दर्शन आम्हाला झाले. आम्ही धन्य झालो. भविष्यात आपले दर्शन कसे होणार?” त्यावर श्रीभगवंत आश्वासन देतात “संत हे माझेच स्वरूप आहेत. म्हणून संतांचे दर्शन म्हणजेच माझे दर्शन आहे. हे सत्य आहे.” श्रीभगवंतांचा आशीर्वाद प्राप्त होऊन दोघांचे कल्याण झाले.”
म्हणून साधकाने संतांच्या कृपादृष्टीने आपले जीवन यशस्वी करावे.

‘संत हेच देव ।’

……………………..

सेवाभाव >>

<< संत हेच देव