श्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे

सुंदर ते ध्यान

स्मरण तुझे मज नित्य असावे।

बिहार प्रांतातील दरभंगा या पवित्र क्षेत्रातील योगाश्रमात सत्संग सुरू होता. गुरुदेव सांगत होते “दरभंगा शहरात श्रीमस्तरामदेव उत्तराखंडी नावाचे महात्मा होऊन गेले. त्यांचे पिताश्री दरभंगाच्या राजाचे राजगुरू व प्रधान मंत्री होते. श्रीमस्तरामदेव उत्तराखंडींनी लहान वयातच वेद, वेदांत, शास्त्रग्रंथांचा व राजनीतीचा सखोल अभ्यास केला. पिताश्रींच्या निधनानंतर त्यांच्या पदावर राजाने श्रीमस्तरामदेव उत्तराखंडींची नियुक्ती केली. कालांतराने राजाचे निधन झाले.” शिष्याने विचारले “पुढे काय झाले?” गुरुदेव म्हणाले “नंतर मात्र श्रीमस्तरामदेव उत्तराखंडींना संसाराप्रती वैराग्य उत्पन्न झाले. ते गुरूंच्या शोधात निघाले. त्यांनी अनेक वर्षे गढवाल प्रांतात कठोर तपश्चर्या केली. येथेच शुभदिनी एका योगी महात्म्यांनी त्यांना दर्शन देऊन योगदीक्षेचे कृपादान दिले. सद्गुरूंच्या आदेशाने अनेक वर्षे साधना करून श्रीमस्तरामदेव उत्तराखंडी सिद्ध महात्मा झाले. लोक त्यांना स्वामीराम म्हणू लागले व ते याच नावाने प्रसिद्ध झाले. त्यांना अनेक सिद्धी प्राप्त होत्या. परंतु त्यांचा उपयोग त्यांनी मानवाच्या कल्याणाकरिता केला.”

शिष्य म्हणाला “पुढे काय झाले?” गुरुदेव म्हणाले “एकदा पंजाबमध्ये असतांना सज्जनकुमार नावाचे एक साधक स्वामीराम यांच्या दर्शनासाठी आले. सज्जनकुमारांच्या कपाळावर जखम होती. स्वामीराम यांनी त्यांच्याकडे पाहताच त्यांना बरे वाटले. स्वामीराम म्हणाले “मला तू काशीमध्ये भेटशील, त्यावेळी मी तुला व्याधीवर उपाय सांगेन.” कालांतराने हरिद्वारमध्ये स्वामीराम ब्रह्मलीन झाले. सज्जनकुमारांना अत्यंत दुःख झाले. संयोगाने सज्जनकुमार काशीमध्ये आले. त्यांना जखमेचा पुन्हा त्रास होऊ लागला. त्यांनी स्वामीराम यांचे स्मरण केले. मध्यरात्री सज्जनकुमारांना झोपेतून जाग आली. कपाळावरील जखमेची वेदना थांबली होती. ते आश्चर्यचकित झाले.” शिष्य म्हणाला “हे मला समजले नाही.” गुरुदेव म्हणाले “गुरुतत्त्व हेच ईश्वरीतत्त्व आहे. स्वामीराम योगी महात्मा होते. असे महात्मे सूक्ष्मरूपात अर्थात् चैतन्यरूपात सदैव असतात. श्रीक्षेत्र काशीमध्ये सज्जनकुमारांनी स्वामीराम यांचे स्मरण केले. त्याच क्षणी सज्जनकुमारांची जखम बरी करून स्वामीराम यांनी पूर्वी स्वतः केलेल्या संकल्पाची पूर्तता केली.”

गुरुदेवांनी अधिक मार्गदर्शन केले “सज्जनकुमारांच्या श्रद्धापूर्वक साधनेचे हे रहस्य आहे. हे तू लक्षात ठेव.” शिष्याने विचारले “ही साधना कोणती?” गुरुदेव म्हणाले “ही चैतन्याची अर्थात् शक्तिपात महायोगाची साधना होय.”

तात्पर्य, संत सांगतात

‘स्मरण तुझे मज नित्य असावे | तव गुण भावे गावे।’

……………………..

मी तुझ्या जवळच आहे >>

<< विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म