सुंदर ते ध्यान
तितिक्षा
ऋषिकेश येथील सिद्ध योगाश्रमात सत्संग होता. तेथील महात्मा सांगतात “भगवंतांनी अर्जुनाला केलेला उपदेश असा- “हे अर्जुना ! एखादी गोष्ट आपल्या मनासारखी होणे किंवा मनाविरुद्ध होणे हा दोष नाही. पण त्यामुळे आपल्या अंतःकरणात जो राग-द्वेष, शोक निर्माण होतो हा दोष आहे. म्हणून सर्व प्रसंगी अशा दोषांना उत्पन्न होऊ न देता, शांत राहणे अर्थात् प्रतिकार न करता दुःख सहन करणे हीच तितिक्षा होय.”
महात्मा प्रत्यक्ष घडलेल्या प्रसंगातून तितिक्षेबाबत समजावून सांगतात. ते म्हणतात “वनवासात असतांना एकदा प्रभू श्रीरामचंद्र आणि लक्ष्मण वनात हिंडत होते. फिरता फिरता त्यांना एके ठिकाणी एक सुंदर सरोवर दिसले. त्या सरोवरात स्नान करावे या विचाराने कपडे ठेवण्यासाठी ते सोयीचे झाड शोधू लागले. परंतु तसे काही सापडले नाही. म्हणून प्रभू श्रीरामचंद्रांनी सरोवराच्या काठी चिखलात एक बाण मारला. तो खुंटासारखा सरळ राहिला. त्या बाणावर कपडे ठेवून दोघेही सरोवरात उतरले.
सरोवरातून बाहेर येऊन श्रीरामचंद्रांनी बाणावरील आपले कपडे घेतले. जमिनीत रोवलेला बाण उपसून काढताच त्यांनी बाणाच्या टोकाला रक्त पाहिले. हे कसे झाले? म्हणून ते बाण रोवलेल्या ठिकाणाचे निरक्षण करू लागले. तेथे श्रीरामचंद्रांना जखमी झालेले बेडूक दिसले. श्रीरामचंद्रांना वाईट वाटले. ‘बेडकाचे शरीर भेदूनच बाण उभा राहिला होता’ हे त्यांच्या लक्षात आले. कळवळून श्रीरामांनी विचारले “अरे, तुला बाण लागला तर तू का नाही ओरडलास? मी तत्काळ बाण बाहेर काढून तुझे दुःख कमी केले असते.” क्षीण आवाजात बेडूक म्हणाले “देवा, तुमच्या दर्शनाने मी आज धन्य झालो. माझ्याकडून आजवर झालेल्या रामनामाचेच हे फळ आहे.
बाण लागल्यावर मी ओरडलो नाही कारण माझ्या रामनामाच्या स्मरणात खंड पडला असता. यापेक्षा दुःख सहन करणे मी अधिक पसंत करतो.” प्रभू श्रीरामचंद्रांचे डोळे प्रेमाश्रूंनी भरून आले. त्यांनी नामस्मरणापुढे देहदुःखाची पर्वा न करणाऱ्या बेडकाच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवला. प्रभू श्रीरामचंद्रांनी त्याला मुक्ती प्राप्त करून दिली.”
महात्मा म्हणतात “वरील रामायणातील बोधप्रद प्रसंगातून साधकाने ‘तितिक्षेचे’ महत्त्व समजून घ्यावे. हे रहस्य आहे.”
तात्पर्य,
‘आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे ।’
……………………..