tembe-swami-round
swami-loknath-terth-round
श्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे

महायोगाची महत्ता

लेखक: प.प. श्री विष्णूतीर्थ स्वामी महाराज

ईश्वरप्राप्तीचे सर्वसाधारणतः दोन मार्ग आहेत. सर्वसामान्य, अगदी साध्या भाविकाला वाटते की सर्वशक्तिमान देव सगुणरूपात स्वर्गात राहून सर्व विश्वाचा कारभार बघतो. म्हणून साधा भाविक माणूस कल्पनेच्या सहाय्याने त्याचेच चिंतन, दर्शन व प्रार्थना करून त्या देवाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो. हा प्रयत्न थोडा, आध्यात्मिक लाभाचा असला तरी अशी परमेश्वराची एकरूपता (सायुज्य) वाटते तेवढे सोपे नाही. ज्याची विचारशक्ती थोडी प्रगल्भ झाली आहे, त्याला जाणवते की जे जे साकार-सगुण आहे ते ते नाशवंत आहे. प्रतिक्षणी नामरूप धरणार्या या सर्व विश्वाच्या बुडाशी एक सूक्ष्म रूपरहित चैतन्य आहे. तोच खरा परमात्मा आहे व त्या निर्गुण निराकार परमशक्तीशी आपले नाते जोडता कसे येईल, याचा प्रयत्न तो करतो. या रूप, रंग, वास, चव काहीही पदार्थत्व नसलेल्या शून्यालाच त्याने वासुदेव असे कल्पिले. भागवतामध्ये शून्यत्व (अभाव) नसलेल्या पण शून्यरूप असणाऱ्या  परमतत्त्वाला ‘वासुदेव’ असे म्हटले आहे. (ज्याला जाडी-रुंदी काहीच नाही त्याला बिंदू म्हणतात व तो दर्शविण्यासाठी एक ठिपका शून्य काढले जाते.)

म्हणूनच बौद्ध व जैन या दर्शनशास्त्रांनी ईश्वराचे अस्तित्वच अमान्य केले. वेदान्तशास्त्राने मात्र ब्रह्म हे अस्तित्वरहित शून्य मानले नाही. (पदार्थाला गुणधर्म असतात तसे ब्रह्माला गुणधर्म नसले तरी) तरी सत् चित् आनंद हे ज्याचे रूप आहे ते ज्ञान, करुणा असणारे अस्तित्व आहे. (अभाव रूप असणारे ते भावरूप आहे.) वस्तुजातातील सर्व नामरूपात्मक पदार्थांचे अस्तित्व ज्या तत्त्वावर असे ते तत्त्व (ब्रह्म), नाशवंत पदार्थाना गती देते. या अव्यक्त अमूर्त (शून्यरूप) परमतत्त्वाचे संकल्पन किंवा आकलन हेसुद्धा अशक्यतेच्या कोटीतील ठरते. म्हटले आहे की, डोळ्यांना पाहण्याचे सामर्थ्य (ज्या तत्त्वाने) प्राप्त होते, त्याला डोळे कसे पाहणार? कानांना ऐकण्याची शक्ती ज्या शक्तीने येते, त्यांचा आवाज कानांनी कसा ऐकणार? मनाला (बुद्धीला) जाणण्याची पात्रता ज्याच्या अस्तित्वाने प्राप्त होते त्यांचे अस्तित्व मन कसे जाणणार? मग मन ‘त्याच्या’वर स्थिर करणार कसे? म्हणून या विश्वगत अमूर्त ब्रह्माचे ध्यान करण्यापेक्षा असा एक मार्ग निर्माण झाला. मन, बुद्धी (प्राण, इंद्रिय इ.) हे ज्याच्या अस्तित्वावर आहेत अशा (अमूर्त, शून्यरूप) ‘मी’ला जाणून त्याच्याशी (तन्मय-स्वरूप) बनायचे, कारण तो ‘मी’ही अव्यक्त विराट ‘अमूर्ताचा’ भाग आहे. तेव्हा या अव्यक्त-शून्यरूपाचे चिंतन करणार कसे? मग असा एक मार्ग काढला गेला की तनुमनप्राण हे ज्या अमूर्ततत्त्वावर अधिष्ठित आहे त्याने शून्यरूप तत्त्व आहे त्याचेच ध्यान करून तेथपर्यंत पोहोचायचे (स्व-रूपाला प्राप्त व्हायचे). हे मूळ स्व-रूप हेच (निरुपाधिक) परमतत्त्व! हा अखेरचा मार्ग हा त्या आधीच्या भागांपेक्षा निश्चितच लाभप्रद वाटला तरी तसा अत्यंत खडतर आहे. या स्वरूपचिंतनध्यानाव्यतिरिक्त त्याआधी वर्णिलेल्या मार्गांना अ-भावयोग असे म्हणतात. ‘अदृश्य अगोचर अशा शून्यावर ज्या पद्धतीने लक्ष केंद्रित केले जाते त्याला अभावयोग असे म्हटले जाते.’

पण जेव्हा (एकाएकी) प्रसन्न दैवी शांतीने मन भरले जाते, आणि अंतःकरणाचा कोपरा न कोपरा आनंदाच्या (भरतीने) उधाणाने भरून जातो आणि तेथे एका दैवी अविनाशी मस्तीचे अस्तित्व जाणवते, तेव्हा त्या साधकाचा साक्षात परमेश्वराशीच एकरूपतेचा अनुभव येत असतो. असा जो साधक प्रत्यक्ष कृपेचे रूप बनतो. तेव्हा त्याचा अनुभव भावपूर्ण, प्रेरक व उद्बोधक होतो.

जेव्हा कुंडलिनी जागृत होते. तेव्हा मन आणि शरीर चैतन्याने इतके भारून जाते की जणू साक्षात् भगवतीच (त्या साधकात) अवतरली आहे. या अनुभवाची उत्कटता व्यक्तिगणिक वेगवेगळी असते किंवा एकाच व्यक्तीत वेगवेगळ्या वेळी कमीअधिक असते. बंगालप्रांतातील भगवान गौरांगप्रभू (चैतन्य महाप्रभू) यांच्याबाबत सांगतात की कधी ते अशा उच्च दिव्य अवस्थेत असत की, त्यांच्या शरीरातून प्रकाशकिरणांचे कारंजेच निर्माण होई. अगदी अलिकडे एका साधकाचा अनुभव असाच आहे. (स्वामींच्या) संपर्कात आल्यानंतर तो जेव्हा ब्रह्मचैतन्याचे ध्यान करी, तेव्हा विजेच्या ठिणग्यांप्रमाणे चमकणारे काही उर्जाप्रवाह शरीरभर प्रवाहित होतात. या अनुभवांनी अर्थातच संतोष व उन्नयन मिळत असे.

कुंडलिनीजागृतीमुळे साधकाचा पार्थिवतेचा भाग हासुद्धा चैतन्यमय होतो. शरीर, मन व बुद्धी यांच्यावर दैवीशक्तीचे होणारे संस्कार चोवीस तास जाणवू लागतात. दैवीशक्तीचा प्रभाव सतत जाणवू लागतो. अशा साधकाला येणारा ईश्वरी अनुभव अभावात्मक नकारात्मक किंवा काल्पनिक न राहता तो प्रत्यक्ष सत्य अनुभव जाणवू लागतो. दैवी आनंदाचे इतके खोल (पोटभर) अनुभवरूपी पेय घेतल्यामुळे त्याच्या मस्तीत तो चोवीस तास राहतो. अशा तर्हेचे ईश्वरीसायुज्य हे इतर सर्व मार्गातून लाभू शकणार्या सायुज्यतेच्या आनंदापेक्षा ङ्गारच वरच्या दर्जासारखे (सोलीव सुख देणारे) असते.

‘‘ज्या मार्गात ‘माझ्यामध्ये’ (ईश्वरामध्ये) असणार्या नित्य निष्कलंक (विमल) आनंदात (साधक) स्वतःलाच विलीन (एकरूप) होतो, त्या मार्गाला ‘महायोग’ म्हणतात. योगाचे दोन प्रकार (जे) आहेत त्यापैकी अभावयोग हा एक व दुसरा श्रेष्ठ असणारा महायोग हा सर्व योगांमध्ये श्रेष्ठ असतो.

जागृत कुंडलिनीशक्ती स्वतःच आत्मकल्याणाच्या मार्गाने वरचा प्रवास सुरू करते. कोळी (किडा) जसा आपल्याच शरीरातून निघणाऱ्या द्रवाच्या धाग्यापासून जाळे विणून स्वतःच त्यात आत अडकल्यासारखा असून स्वतःला संरक्षित समजत असतो. किंवा स्वतःच्या पिलाला अळी वरचेवर मातीचे लेप चढवून एक घर करते. पण या जाळ्याचा व घराचा त्या त्या किड्याशी आत्मीय संबंध तसा काहीच नसतो. जागी झालेली शक्ती हे बाहेरचे सर्व वेढे किंवा स्तर उलगडू लागते. नित्यमुक्तच असणारे परमतत्त्व जणू काही मायामुक्त होते. मायामुक्त असणारा तो जीव हा जागृतशक्तीमुळे निरुपाधिक परमात्मा बनतो. त्या परम ईश्वराच्या स्वाधीन, स्वाश्रया असणारी शक्ती, जीवाचे ही मूळ रूप प्रगट करण्यास सहाय्यक शक्ती बनते.

परमात्म्याच्या प्रेरणेनेच शक्ती (ऊर्ध्वगामी कुंडलिनी) कार्यरत होते, त्यामुळे परमेश्वराच्या चरणकमलाशी सर्वभावे शरण आलेल्या साधकावर त्याची कृपा होऊन त्याचे सतत वास्तव्य त्याच्यासमवेत राहते.

एखाद्या ठिणगीने गवताचा ढिगाराच्या ढिगारा पेटून उठावा व तो संपताच (अग्नीही नष्ट व्हावा व) पेटलेल्या अग्निज्वाला शून्यात विलीन व्हाव्यात, त्याप्रमाणे परमात्म्याचे स्वरूप असणारी शक्ती (कुंडलिनी) नंतर अंतर्धान पावते. प्रसवरूपाने अवतारित होऊन सुप्तरूपाने गवतामध्ये जो अग्नी असतो, तोच जळणार्या गवतात अवतीर्ण (प्रगट) होतो. किंवा असे म्हणता येईल की अग्नीनेच काही काळ गवताचे रूप धारण केले होते (व ठिणगी पडताच) ते व्यक्त झाले. ठिणगीचा स्पर्श होताच गवताचे गुंडाळलेले धागे उलगडले जाऊन धाग्यासह त्या गवताची सर्व पेंढी जळून नष्ट होेते, त्याप्रमाणे परमेश्वराची कृपारूप दीक्षा होताच कुंडलिनीचा दिव्य प्रवास हाच जणू भडका होऊन त्यात (कर्म-अज्ञानरूप) पाप जळून जाते. योगी प्रथम परमेश्वर हा पुरुषोत्तम आहे असे समजतो. पण कुंडलिनीशक्तीने जेव्हा मनबुद्धी अहंकारासह सर्व जाणीवाच भस्मसात होऊन शक्तीही अंतर्धान पावते, तेव्हा उरते ते अव्यक्त परब्रह्म! जीवाचे कर्तव्य असते ते फक्त स्वतःला दीक्षा-पात्र बनवून अनुग्रहित होण्याचे! सर्व धार्मिक कृत्ये, सत्कृत्ये, देवाला केलेल्या प्रार्थना, त्याची कृपा होण्यासाठी केलेली व्रते या सर्वांचा एकच लाभ म्हणजे गुरुकृपा. त्या कृपेचा हलकासा स्पर्श झाला तरी सुप्त शरीरगत चैन्य प्रज्वलित व कार्यरत होते. अमूर्त अव्यक्त परब्रह्माचे केवळ चिंतन वा ध्यान हे मूर्त सीमित अशा मनशक्तीला कष्टाचे व दुर्घट आहे. अशा प्रयत्नांना अभावयोग म्हणतात. याउलट दैवीशक्तच्या अनुभवाने आत्मरत होण्याचा या मार्गाला महायोग म्हणतात. (अतींद्रियही अनुभवीन इंद्रियाकरवी?)
पूर्णब्रह्मात शक्ती विलीन झाली की उरते ते पार्थिव शरीर, की ज्यातील अणुरेणूसह इंद्रियेही पावन असतात. जळून गेलेल्या सर्व पार्थिवाचे भस्म भगवान शंकर परिधान करतात. जणू त्यातून हे सांगायचे आहे की हे उरलेले शरीर हे जीवनमुक्ताचे, मायायुक्त आत्म्याचे वसतिस्थान आहे.