tembe-swami-round
swami-loknath-terth-round
श्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे
  

सगुण निर्गुण

कृष्णं वन्दे जगद्गुरुम्

जगद्गुरु शं‍कराचार्यांनी आसेतूहिमाचल पायी भ्रमण करून दाखवून दिले की विच्छिन्न झालेला समाज एकात्म करण्याचे सामर्थ्य अद्वैत वेदान्तात आहे. अशा आचार्यांचा जन्म केरळमधील पूर्णा नदीच्या काठी कालटी गावामध्ये झाला. त्यांचे वडील शिवगुरू आणि आई आर्यांबा श्रीकृष्णभक्त होते. संन्यासी महात्मे जगद्वंदनीय असतात. ते फक्त आईला नमस्कार करतात.

आचार्यांचे विशेष मातृप्रेम घडलेल्या प्रसंगातून पाहू. एकदा आईला आचार्यांची आठवण झाली. हें समजताच आचार्य मातेजवळ आले. आई म्हणाली, “तुझी कीर्ति महान आहे. जग तुला नमस्कार करते.” आचार्य म्हणाले, “आई, हा तुझा आशीर्वाद आहे.” आई म्हणाली, “देव तुझ्याशी बोलतात.” आचार्य म्हणाले, “तुझी इच्छा काय आहे?” आई म्हणाली, “मला श्रीकृष्णाचे दर्शन घडव.” आचार्यांनी अत्यंत प्रासादिक व गेय अशा ‘कृष्णाष्टकम्’ स्तोत्राद्वारे श्रीकृष्णाची प्रार्थना केली. ती अशी- “विश्वाचे मूळ कारण असणाऱ्या श्रीकृष्णा, मला प्रत्यक्ष दर्शन दे. माझा जीव आतुर झाला आहे. जो जगाचा आत्मा आहे, निर्मल आहे, वेदांनी ज्यांच्या गुणांचे वर्णन केले आहे, जो गोकुळाचा, वृंदावनाचा अधिपति आहे, असा तो श्रीकृष्ण मला प्रत्यक्ष दिसावा. मी तुझ्या दर्शनासाठी तळमळत आहे.”

या स्तुतिने प्रसन्न होऊन श्रीकृष्ण आचार्यांसमोर प्रत्यक्ष प्रकट झाला. आचार्यांनी आईला अलगद उठवून बसवले व म्हणले, “आई, बघ, श्रीकृष्ण तुझ्यासमोर उभा आहे.” थरथरत्या हातांनी आईने श्रीकृष्णाला नमस्कार केला. तिला श्रीकृष्ण ‘आनंदकंद, चतुर्भुज, शंखचक्रगदापद्म’ धारण केलेला दिसला. सद्गदित होऊन साश्रु नयनांनी ती “कृष्णं वन्दे जगद्गुरुम् |” असें वारंवार म्हणू लागली. तिने आचार्यांना “विजयी भव!” असा आशीर्वाद दिला आणि ती श्रीकृष्णाशी एकरूप झाली. अशा आपल्या जगद्गुरु शं‍कराचार्यांना त्रिवार अभिवादन करूं या!

तात्पर्य, संतांच्या अभंग वाणीतून पाहूं-

‘बळीचिया द्वारी द्वारपाळ हरि |
अर्जुनाचे घरीं, घोडे धुतो ||
नाथाचिये घरीं उगाळीतो गंध |
भक्ताचा तो छंद जया सदा ||
विदुराचे घरीं खाय शिळ्या कण्या |
भक्तीचा लाहाणा देव झाला ||’

……………………..

<< अहंकाराचा वारा न लागो