tembe-swami-round
swami-loknath-terth-round
श्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे
  

सगुण निर्गुण

अहंकाराचा वारा न लागो |

“अहंकाराचा वारा | न लागो राजसा | माझिया विष्णुदासा | भाविकांसी ||’ यामधून संतश्रेष्ठ नामदेवमहाराज मानवी जीवनाचे रहस्य सांगतात. ‘मानवाने नेमके कसें वागावे’ हें शास्त्रकारांनी सांगितले, “‘नम्रता’ विद्येचे भूषण आहे, ‘निगर्वता’ श्रीमंतीचे भूषण आहे आणि ‘क्षमा’ बलवंतांचे भूषण आहे.” परंतु ‘अहंकारी मनुष्य’ याकडे दुर्लक्ष करतो. हव्यासामुळे तो दुसऱ्यांच्या कार्यांत विघ्न आणतो, त्यांना तुच्छ समजतो, निंदा करतो, द्वेष करतो. त्याला वाटते “समाज मला घाबरतो.” परंतु समाजाला सर्व समजते. ‘करावें तसें भरावें’ हा नियम आहे.

महाभारतातील एक बोधप्रसंग असा. कर्णाला स्वबळाचा, श्रेष्ठत्त्वाचा, ‘अहंकार’ होता. ऐन युद्धात कर्णाच्या रथाचे चाक भूमीत अडकल्याने तो अर्जुनाला म्हणतो, “तू शूर, सदाचारी आहेस. तू युद्धाचा धर्म जाणतोस. माझे रथाचे चाक निघेपर्यंत थांब.” हें ऐकून भगवंत कर्णाला म्हणाले, “कर्णा! आज तुला धर्म आठवला कां? पूर्वी केलेल्या अधर्मांचे तुला विस्मरण झाले आहे. तुम्ही सगळ्यांनी मिळून अभिमन्यूचा अधर्माने वध केला. ‘अहंकारामुळे’ तू योग्यायोग्यतेचा विचार कधी केला नाहीस, आता वेळ गेली.” सरतेशेवटी कर्णाचा अंत होतो. ‘अहंकार अनर्थरूपी वृक्षाचे बीज असून जीवनातील मोठे विघ्न आहे’ हा बोध यामधून मिळतो. ‘अहंकारामुळे’ मनुष्याच्या जीवनाचे चाक, अपकीर्तिरूपी मातीत खोलवर रुतते. मग तें काढणें अशक्य होते’. सारांश, प. प. श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामिमहाराज सांगतात, “मोक्ष स्वर्गात, जमिनीवर किंवा पाताळात नाहीं. जो अहंकार नष्ट करतो त्याच्या ‘अंतरात’ मोक्ष आहे.”

मानवाने नीतिनेच वागले पाहिजे अन्यथा आयुष्य, विद्या, यश, बल यांचा नाश होतो. म्हणून श्रीसमर्थ रामदासस्वामीमहाराज म्हणतात, “प्राप्त झालेले ज्ञान ‘अहंकारामुळे’ नष्ट होते. सत्संगती धरून सद्गुणांची वृद्धी होऊन भगवद्कृपा प्राप्त होते.”

तात्पर्य, संत कबीरांचा दोहा असा-

‘बडें बडाई न करे, बडे न बोले बोल|
हिरा मुख से न कहे, लाख टका मम मोल||
“मैं मैं” बडी बलाई है, सके निकल तो निकले भाग|
कहे कबीर कब लग रहै, रुई लपेटी आग||’

……………………..

कृष्णं वन्दे जगद्गुरुम् >>

<< कृतज्ञ-कृतघ्न