सगुण निर्गुण
एकच देव
“एको देव:| जगात ‘देव एकच’ आहे” असे श्रेष्ठकवी भर्तृहरि सांगतात. भाव तेथे देव. ‘एकच देव अनंत नावाने, अनंत रूपाने, अनंत ठिकाणी नटला आहे’ हे सर्व संतांच्या प्रेममय विचारातून क्रमश: पाहू.
श्रीज्ञानेश्वरमाऊली आपल्या भावंडांसह पंढरीत पांडुरंगाचे दर्शन घेऊन त्याला डोळे भरून पहात असत. श्रीनिवृत्तिनाथांचा उपदेश घेतल्यावर जेव्हा माऊलींनी पांडुरंगाला पाहीले, तेव्हा त्यांचे डोळे भरून आले. ते पाहून मुक्ताबाई म्हणाल्या, “ज्ञानोबा, डोळ्यात पाणी का आले?” तेव्हा माऊलींचा कंठ दाटून आला. ते म्हणाले, “मुक्ताबाई, श्रीसद्गुरू निवृत्तिनाथांच्या कृपेमुळे सर्व ठिकाणी व्यापक असलेले परमात्मस्वरूप मला माझ्या देहांतच दिसले. हाच परमात्मा जगदोद्धारासाठीं अवतीर्ण होऊन पुंडलीकासाठी विटेवर उभा आहे.
‘तो हा डोळेभरी पाहिला श्रीहरि|
पाहतां पाहणे दुरी सारोनिया||
ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योति|
ती ही उभी मूर्ति पंढरीसी||’
हा पांडुरंग परब्रह्मस्वरूप परमात्मा आहे. तो सर्वांसाठी उभा आहे. प्रसंग असा की ब्रह्मदेवांनी परब्रह्माची अवतार घेण्यासाठी स्तुति केली. त्या स्तुतिवर प्रसन्न होऊन परब्रह्माने देवकीच्यापोटी अवतार घेतला. त्या परब्रह्माचे मला जे दर्शन झाले तो हाच पांडुरंग आहे.” सारांश, परब्रह्माच्या दर्शनाने द्वैतदृष्टी जाऊन सर्वत्र समभाव निर्माण होतो हेच खरे. जो पंढरीत कटिवर हात ठेवून चंद्रभागेच्या काठी उभा आहे, तोच हातात धनुष्य घेऊन पंचवटीत गोदावरीकाठी ‘काळा राम’ हे नाव धारण करून उभा आहे. एकदा आद्यशंकराचार्य पंढरीस आले त्यावेळी त्यांना सगुण-साकार असलेले श्रीपांडुरंग निर्गुण-निराकार परब्रह्मस्वरूप दिसले. ते पांडुरंगाष्टकांत म्हणतात-
“महायोगपीठे तटे भीमरथ्यां | वरं पुंडरीकाय दातुं मुनींद्रै: |
समागत्य तिष्ठंतमानंदकंदं | परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम् ||”
श्रीसमर्थ रामदासस्वामींना श्रीपांडुरंग श्रीरामरूपात दिसले. ते म्हणतात-
‘येथें का रे उभा श्रीरामा, मनमोहना मेघश्यामा||’
वरील संतांचे विचार आणि माऊलींचा पुढील अभंग यांच्या वारंवार पठणाने पांडुरंगाचे स्वरूप समोर उभे राहते हा प्रत्येकाचा अनुभव आहे.
‘योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी|
पाहतां पाहतां मना न पुरे धनी||१||
देखिला देखिला गे माय देवाचाही देव|
फीटला संदेह निमाले दूजेपण||२||
अनंत रूपे अनंत वेषे देखिले म्या त्यासी|
बापरखुमादेवीवरु ही खूण बाणली कैसी||३||
……………………..