Vasudev Niwas | © 2023 All rights reserved | Developed by Digital Canvas
सगुण निर्गुण
दान
‘दानं सात्विकम्|’ भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सात्विक दानाचे श्रेष्ठत्त्व सांगितले आहे.
‘दान’ म्हणजे निष्काम भावनेने अन्न, वस्त्र, विद्या, औषधे, इत्यादि ‘वस्तूंचे देणे’ होय. आपली वस्तु परतफेडीची अपेक्षा न ठेवता दुसर्याला देणे याला ‘दान’ म्हणतात. नारायणोपनिषदात ‘दानाचे’ महत्त्व सांगितले आहे, “‘दानाने’ सर्वांचे प्रेम प्राप्त होते व शत्रू देखील मित्र बनतात.”
सात्विक, राजस आणि तामस यातील ‘सात्विक दान’ हेच ‘खरे दान’ होय. एक घडलेला प्रसंग पाहू. भारतरत्न पंडित मदनमोहन मालवीय बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे संस्थापक होते. विद्यालयासाठी त्यांना जागेची आवश्यकता होती. हे ‘भूमीदान’ त्यांना काशीचे राजे प्रभू नारायणसिंह यांच्याकडून प्राप्त झाले. काशीच्या राजाने “तुम्ही दिवसभरात जितके चालत जाल, ती सर्व जमीन आपली” असे म्हणून उदारपणे हजारो एकर जागा दिली. हा जगातील श्रेष्ठ ‘सात्विक दानाचा’ आदर्श आहे.
प्रत्येक मानवाने गरजेप्रमाणे ‘दान’ देऊन सर्वांना सुख द्यावे हे सूत्र आहे. अन्नामुळे प्राणांचे संरक्षण होते याकरिता ‘अन्नदान श्रेष्ठ’ आणि जलाशिवाय अन्न नाही म्हणून ‘जलदान श्रेष्ठ’ आहे. म्हणून दुष्काळाच्या वेळी ‘अन्नदान’, ‘जलदान’ करावे. हे उदाहरणाने समजावून घेऊ. महाभारतातील अश्वमेधपर्वात श्रीधर्मदेव व राजा युधिष्ठिर यांचा संवाद आहे. धर्मदेव म्हणतात, “राजा, कुरुक्षेत्राजवळील एका गावातील गरीब कुटुंबाने, भीषण दुष्काळात भिक्षेत मिळालेले सातूचे पीठ स्वत: न खाता, सगळे पीठ देऊन गरजूंची तहान-भूक भागवली आणि त्या कुटुंबाला ब्रह्मलोकाची प्राप्ती झाली. हे वास्तव आहे. म्हणून तुझ्या अश्वमेध यज्ञातील ‘दानांपेक्षा’ त्या कुटुंबाचे ‘अन्नदानच’ श्रेष्ठ आहे. इतकेच नव्हे तर माझा अनुभव ऐक. त्या दांपत्याने केलेल्या ‘पीठाच्या दानातील’ काही कणांचे ‘दान’ मीही स्वीकारले आणि माझ्या जीवनात बदल झाला, मला तेज प्राप्त झाले. परंतु तुझ्या अश्वमेध यज्ञातील ‘दानाने’ मला तसा अनुभव आला नाही.” यामधून ‘गरजूंना दान’ द्यावे हाच संदेश मिळतो.
तात्पर्य, पद्मपुराणात सिद्धांत आहे, ‘केव्हातरी ‘पूर्वजन्मी’ दिल्याशिवाय आपल्याला ‘या जन्मी’ मिळत नाही’. उदाहरणार्थ व्यवहारातही आपण म्हणतोच “दुसर्याला दिल्याशिवाय मिळेल कसे?” आजच्या भाषेत सांगायचे तर ‘बँकेत पैसे’ ठेवले तरच ‘व्याजासह परत’ मिळतात. त्याप्रमाणे मनुष्याला ‘दानाने’ आनंद प्राप्त होतो. संतश्रेष्ठ तुकाराममहाराज
“जन हे दिल्या घेतल्याचे|” असे सांगतात हेच खरें.
……………………..