सगुण निर्गुण
नमो आदिरूपा
‘नमो आदिरूपा ओंकारस्वरूपा, विश्वाचिया रूपा पांडुरंगा|
तुझिया सत्तेंने तुझे गुण गावू, तेणें सुखी राहूं सर्वकाळ||
तूंचि श्रोता वक्ता ज्ञानासि अंजन, सर्व होणें जाणें तुझे हातीं|
तुका म्हणे जेथें नाहीं मी तूं पण, स्तवावें तें कवण कवणालागीं||’
संतश्रेष्ठ श्रीतुकाराममहाराजांना भगवंतांनी स्वप्नात दर्शन देऊन “सुंदर अभंगांची रचना करा” असा आदेश दिला. “आपल्यावर सरस्वतीची कृपा आहे. आपली अभंग गाथा लोकमान्य होईल” असे भगवंताकडून वरदान प्राप्त झाले. “भगवंताने आशीर्वाद दिले आहेतच तर आज्ञापालन करू. सर्व उत्तमच होणार आहे कारण तोच माझा रक्षक आहे” असा विचार करीत श्रीतुकाराममहाराजांनी अभंग लिहायला घेतले. “पहिला अभंग देवाच्या वंदनाचा असावा” आणि त्याच क्षणी श्रीगणेशाचे व पांडुरंगाचे एकत्रित मंगल ज्यात सहज होणार होते, अशा ‘ओंकाराचे’ त्यांना स्मरण झाले. श्रीतुकाराममहाराजांना विलक्षण आनंद झाला. पांडुरंगाच्या कृपाशीर्वादानेच मंगलाचा अभंग रचला गेला तो वरीलप्रमाणे.
या अभंगाचा अर्थ असा- ‘एक ओंकार, त्या ओंकारापासून ब्रह्मा, विष्णु, महेश व पुढे सर्व विश्व आणि वेद यांची निर्मिती झाली. विश्वरूप धारण करणारा तू पांडुरंग आहेस’ असे वर्णन करून श्रीतुकाराममहाराज पुढे म्हणतात, “तूच विश्वाचा आदि असून हे विश्व तुझेच रूप आहे. तुझ्याच कृपेने तुझेच गुण सदैव गात राहून आम्ही सुखी राहणार असा विश्वास आहे. तू श्रोता व वक्ता आहेस. सर्वकाही तुझ्याच हातात आहे. तुझ्या ठिकाणी आम्ही एकरूप झालो आहोत. आमची स्तुति गोड मानून घे आणि कृपा कर.” या सुंदर अभंगात संपूर्ण तत्त्वज्ञान सामावलेले आहे.
श्रीमद्भागवतामध्ये महाभागवत भक्तप्रल्हादांचा त्यांच्या गुरूंबरोबर झालेला संवादही प्रेरक आहे. पाठशालेत शिकत असताना गुरु म्हणतात, “प्रल्हादा, तुझे सतत नामस्मरण चालू असते याचे आश्चर्य वाटते.” भक्तप्रल्हाद सांगतात, “ही बुद्धी मला निसर्गत:च प्राप्त झाली आहे. बोलविता धनी श्रीनारायणच आहेत. तो सत्ताधीश आहे हेच खरे.” सारांश, जगन्नियंता परमात्मा नियामक व नियंता आहे हेच सत्य आहे.
तात्पर्य, वरील अभंगाचे गुणगान करीत,
‘नाचत जावूं हरिगुण गावूं, विठ्ठला डोळा पाहूं रे|
पंढरपुरीं राज्य करितो, विश्वरूपा तुझे नाव रे||’
……………………..