Vasudev Niwas | © 2023 All rights reserved | Developed by Digital Canvas
सगुण निर्गुण
संत हेच देव
‘देव ते संत, देव ते संत’ असा संतश्रेष्ठ तुकाराममहाराजांचा अभंग आहे. त्यामध्ये ते म्हणतात, “वेगवेगळ्या मूर्ति सर्वत्र असल्या तरी देव व संत एकच आहेत.” याचा इतिहास असा. भगवान श्रीकृष्णाने निजधामाला जाण्यापूर्वी आपले सामर्थ्य संतांमध्ये ठेवले. उदाहरणार्थ, जसा सूर्य अस्ताला जाण्यापूर्वी आपलें तेज अग्निमध्ये ठेवतो तसे. स्वतः साकार असलेला परमात्मा निराकार झाला. सारांश, या कलियुगात ‘संत हेच देव’ आहेत. संतांचे शरीर देवाचे देऊळच आहे ज्यात देव सदैव राहतो. श्रीमद्भागवतामध्ये एक प्रमाण आहे ‘मानवाला परमात्मा संत रुपातच दिसतो.” संतांची प्रत्येक कृति उपदेशच असते. त्यांच्या सहवासात भक्तांचे कष्ट नष्ट होतात.
देव संतांच्या अधीन असतो. या संदर्भात भगवती रुक्मिणी व देवीसत्यभामा यांचा संवाद पाहण्यासारखा आहे. रुक्मिणीमाता म्हणते, “सत्यभामे, देवाला तुझ्या-माझ्यापेक्षा व स्वत:च्या प्राणापेक्षा भगवद्भक्त आवडतात. म्हणून, त्याला वैकुंठात राहणे अथवा शेषावर शयनही नको असते. तो राहतो वैष्णवांच्या घरी.”
‘संत हेच देव’ याचे प्रत्यक्ष दर्शन म्हणजे श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामिमहाराज आहेत. त्यांचे जीवन ‘मानवतेची गाथाच’ आहे. त्यांनी ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा|’ हा विश्वशांति मंत्र दिला. प्रत्यक्ष श्रीदत्तात्रेय त्यांच्याशी बोलत व मार्गदर्शन करीत असत. श्रीस्वामिमहाराजांनी तीन वेळा अनवाणी पायी भारतभ्रमण करून ‘लोक कल्याणकारी’ महान कार्य केले. ते ज्याज्या ठिकाणी जात असत तेथील क्षेत्रदेवता त्यांच्या भेटीला येत असत. म्हणून ‘‘संतरूपाने प्रभूच’ प्रत्यक्ष आहेत” याची प्रचिती येते.
आपल्या भक्ताच्या लीला पाहण्यासाठी भगवंतसुद्धा उत्सुक असतो. तो घडलेला प्रसंग असा. संत एकनाथमहाराजांचे शिष्य, श्रीलिंबराज, यांचे कीर्तन सुरू झाले की पांडुरंग गोड लहान रुपात त्यांच्या खांद्यावर बसायचे. कीर्तनामुळे लिंबराजांच्या मुखावर येणार्या घामावर भगवंत आपल्या कोमल हाताने मोरपिसारा फिरवून त्यांना सुखवीत असत. ‘जो विभक्त नाही तो भक्त’ याचे हे मोठे उदाहरण आहे.
तात्पर्य, देव आणि संत यांच्यात फरक नाही. याबाबत एका भजनातील मनोहर वर्णन असे –
‘संत कसे रामकृष्ण हरि जसे, कलींमधें अवतरले|
जें न होय देवाच्यान, ते करिती सज्जन||
एवढा भगवान् सगुण, तो संत आधीन|
कली मधे अवतरले| संत कसे रामकृष्ण हरि जसे||’
……………………..