सुंदर ते ध्यान
क्षण हा भाग्याचा, चैतन्याचा
मध्यप्रदेश येथील श्रीक्षेत्र देवास येथे नारायणकुटी आश्रम आहे. या आश्रमामध्ये योगीराज श्रीगुळवणी महाराजांचे सद्गुरू ‘बंगाली स्वामी’ श्रीलोकनाथतीर्थ स्वामिमहाराजांच्या जन्मशताब्दि महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या मंगल प्रसंगी सत्संग सुरू होता.
नारायणकुटी आश्रमाचे महात्मा श्रीशिवोम् तीर्थ स्वामिमहाराज उपदेश करतात “साधकांनो, मी आपल्या सर्वांना सांगतो की “आयुष्यातील प्रत्येक क्षण फार महत्त्वाचा आहे. भगवंताने दिलेला हा मानवी जन्म व्यर्थ घालवू नका. सुखदुःखाच्या चक्रातून सुटण्याची ही संधी पुन्हा कधी मिळेल माहीत नाही. जे काही आयुष्य उरलेले आहे, दहा-वीस वर्षे, चाळीस वर्षे, पन्नास वर्षे, हा अत्यंत मौलिक वेळ आपल्या हातात आहे. हा वेळ जास्तीत जास्त सत्कारणी लावणे प्रत्येकासाठी शुभकारक आहे. “प्रत्येक दिवस आनंदी आहे” याच विचाराने उत्साही असणे आवश्यक आहे. वेळ वाया घालवू नका !”
श्रीस्वामीजी एका उदाहरणातून स्पष्टीकरण करतात “साधकहो, लक्षात घ्या! जगातील प्रत्येक गोष्ट किंमत मोजून आपण खरेदी करतो. परंतु कितीही पैसे मोजले तरी गेलेली वेळ मात्र परत मिळणार नाही. म्हणून माझा तुम्हाला आग्रह आहे की प्रामाणिकपणे आपापले वय पहावे, मनःस्थितीचे परिक्षण करावे, व्यवहार पहावा, मन:शुद्धीसाठी किती प्रयत्न करीत आहोत हे पहावे. तसेच साधना, उपासना, सेवा यामध्ये किती समर्पित आहोत हेही पहावे. आपले कर्तव्य समजून घ्यावे. हे सर्व आपण करू शकतो. अजूनही वेळ हाती आहे. प्रत्येक क्षण परमानंदप्राप्तीसाठी आहे हेच मर्म आहे.”
हा विषय श्रीस्वामीजी मुंगीच्या रूपकातून समजावून सांगतात. ते असे- “मुंगीचा मार्ग ठरलेला असतो. मुंग्या सरळ रांगेत चालतात. कोणी आडवे आले तरी मुंगी नम्रतेने बाजूने वाट काढते. ती अहोरात्र आपल्याच कर्तव्यात मग्न असते, कधीही विश्रांती नाही. मुंगी एकेक अन्नाचा कण शोधते. तो कण वारंवार खाली पडतो. तरी ती उत्साहाने तो कण पुन्हापुन्हा उचलते आणि घरी जाते. त्या कणाने ती आनंदाने परिवाराला सांभाळते. एकेक अन्नाचा कण आणि एकेक क्षण किती महत्त्वाचा आहे हा संदेश ती देते. हे प्रेरणादायी आहे.”
तात्पर्य, साधकाने महायोग साधना उत्साहाने दैनंदिन, समर्पित भावनेने, सातत्याने होऊ द्यावी. प्रत्येक क्षण आपल्या कल्याणासाठी आणि लोकमंगलासाठी, लोककल्याणासाठीच आहे हे सत्य आहे.
संत सांगतात,
‘क्षण हा भाग्याचा, चैतन्याचा ।’
……………………..