श्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे

सुंदर ते ध्यान

देव देखिला देखिला

‘महायोग’ साधन एक आध्यात्मिक विज्ञान आहे. यामुळे साधकाला अलौकिक आनंदाची आपोआप प्राप्ती होते. तसेच उपनिषदादि वेदान्त ग्रंथ, शास्त्रग्रंथ आणि संत वाङमयग्रंथातील गूढार्थ आपोआप समजतात.

यालाच भगवंतांनी भगवद्गीतेत ‘आश्चर्यवत्’ म्हटले आहे. एका प्रसंगातून हे समजावून घेऊ. एका पाठशाळेत शास्त्रचर्चेची सभा भरली होती. सभेचा विषय होता ‘सर्वव्यापक परमात्मा दिसणे व न दिसणे’. एका विद्वान आचार्यांनी ‘परमात्मा सर्वव्यापक कसा?’ हे सप्रमाण, वेद व शास्त्रातील प्रमाणे देऊन सांगितले. परंतु उपस्थित असलेल्या श्रोत्यांचे समाधान झाले नाही. म्हणून तेथच उपस्थित असलेला एक अनुभवी भक्त म्हणाला “मी जे शास्त्रांचे चिंतन केले ते असे: सकल ब्रह्मांडाच्या आत बाहेर भरलेला परमात्मा व्यापक असून दिसत नाही, म्हणजे तो नाही असे नाही. बरे, आहे म्हणावा तर अनुभव काय? सारांश, परमात्मा असून न दिसणे हा दोष भगवंताचा नाही. हे समजावून घेऊ. एखादी लांबवर असलेली वस्तु आपल्याला दिसत नाही. उदाहरण, इमारतीवर नाव आहे पण ते नाव दुरून दिसत नाही. तसेच अतिजवळ असलेली वस्तूही कुठे दिसते? उदाहरण, डोळ्यांतील काजळ डोळ्याच्या अगदी जवळ असूनही दिसत नाही. तसेच मनुष्याच्या शरीरांतील एखाद्या भागाला बधिरपणा आला. त्याजागी मेणबत्तीचा चटका दिला तरी कळत नाही, दु:ख होत नाही. पण मेणबत्तीचा चटकाच बसत नाही, असे थोडेच आहे? तसेच मन गहन विचारांत असते तेव्हा एखादी व्यक्ति बोलली तर ऐकूसुद्धा येत नाही. अतिलहान वस्तुही आपल्याला दिसत नाही. उदाहरण, पाण्यातले सूक्ष्म-जंतु सूक्ष्मदर्शक यंत्रावाचून कुठे दिसतात? तसेच, आपल्यासमोर एखादी इमारत असली तर त्याच्या पलीकडे असलेला वृक्ष कसा दिसेल? सूर्याच्या प्रकाशामुळे आकाशातील नक्षत्रे दिसत नाहीत. म्हणून नक्षत्रे नाहीत असे नाही. तसेच समुद्रात पाऊस पडला तर पावसाचे थेंब समुद्राच्या पाण्यात मिसळून जातात. थेंब वेगळे दिसले नाहीत म्हणून पाऊस पडला नाही असे नाही.”

“सारांश, परमेश्वर असून न दिसणारा असता, तर कुणालाच दिसला नसता. पण तो दिसतो थोर संतांना. तसेच तो सद्गुरुकृपा पात्र साधकांना, श्रेष्ठ भक्तांना दिसतो. यावरून परमात्मा दिसतो हे सत्य आहे.” हे ऐकून सर्वांचे समाधान झाले. शास्त्रचर्चा पूर्ण झाली. संत सांगतात,

देव देखिला देखिला | गुरुकृपे ओळखीला ||

……………………..

नित्यबोधं चिदानंदम् >>

<< सर्व होणे जाणे तुझे हाती