श्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे

सुंदर ते ध्यान

सर्व होणे जाणे तुझे हाती

मागील भागात ‘सकल ब्रह्मांडाच्या आत-बाहेर भरलेला परमात्मा सर्वव्यापक आहे’ हे पाहिले. हा विषय संत निरंजनसाधूंच्या सत्संगातून समजावून घेऊ. एकदा सत्संगात त्यांनी विचारले “कुठून आलो? कुठे जायचे आहे? काय शिकायचे आहे?” त्यांनीच उत्तर दिले, “आनंदातून आलो, आनंदाकडेच जायचे आहे, एकच शिकायचे आहे मीच चैतन्य आहे’ अर्थात् मी परमानंदी आहे.” यामधून श्रीनिरंजनांनी सोप्या भाषेत हा विषय सर्वांना समजावून सांगितला.

आनंद, आध्यात्मिक आनंद, परमानंद हे क्रमश: समजावून घेऊ. एक आनंद बाहेरील वस्तूंवर आधारित आहे. उदाहरणार्थ नोकरीत उच्चपद मिळणे, भरपूर संपत्ति मिळणे. ही सर्व सुखे बाहेरील वस्तु प्राप्तीमुळे झालेली सुखे होत. परंतु ते सुख तेवढ्या काळापुरतेच असते. या सुखातून प्राप्त होणारा ‘आनंद’ अल्पकाळाचा आहे.

दूसरा भाग म्हणजे आध्यात्मिक आनंद होय. महायोग साधना करणाऱ्या साधकाला आध्यात्मिक आनंद कसा प्राप्त होतो ते पाहू. साधनेच्या वेळी मधुर आवाज करणारी कोणतीही वस्तु नसताना कर्णमधुर शब्द ऐकू येणे, कोणत्याही देवतेची प्रतिमा नसताना आनंदकारक रूपदर्शन होणे, जवळ कुठलाही सुवासिक पदार्थ नसताना सुगंध येणे असा ‘आध्यात्मिक आनंद’ साधकाला प्राप्त होतो व तो साधक आश्चर्यचकित होतो.

आता आपण परमानंद कसा प्राप्त होतो हे समजावून घेऊ. पतंजलींच्या सूत्राप्रमाणे, साधनेची वेळ ही ब्राह्ममुहूर्ताची असणे आवश्यक आहे. श्रद्धायुक्त समर्पित भावनेने साधनेस बसावे. तसेच दैनंदिन साधना जास्तीत जास्त वेळ होऊ द्यावी. या सूत्राप्रमाणे साधकाने साधनेला बसलेच पाहिजे. यापुढे शरीर ढिले सोडून स्वस्थ बसताच मन आपोआप श्वासावर जाते. या वेळी चेतनाशक्ति क्रियाशील होते. प्राण बाहेर राहिला (आपोआप बहिर्कुंभक झाला), किंवा देहात राहिला (आपोआप अंतर्कुंभक झाला), अथवा प्राण संचार होत आहे की नाही कळत नाही (म्हणजे आपोआप केवलकुंभक झाला) या अवस्था आपोआप होतात. यावेळी आनंददायी लहरींमुळे डोळे उघडले जात नाहीत, शरीराची जाणीव रहात नाही. साधक हा क्षणभरच आनंदघन परमानंद स्थितीमध्ये असतो. ही अवस्था सर्व योगांना व्यापून राहणाऱ्या ‘सिद्धयोग-महायोगा’मुळेच प्राप्त होते. थोड्या कालावधी नंतर साधक हळूहळू मूळ स्थितीत येतो. डोळे आपोआप उघडल्यावर त्याला आश्चर्य वाटते. तात्पर्य,
‘सर्व होणे जाणे तुझे हाती |’

……………………..

देव देखिला देखिला >>

<< जय जय स्वसंवेद्या