tembe-swami-round
swami-loknath-terth-round
श्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे

सगुण निर्गुण

धैर्याने सुखप्राप्ती

भारतीय ज्ञान-साधना म्हणजे ज्ञान-विज्ञान यांचे एकत्रीकरण, विचारांचे व अनुभूतींचे मंथन, व गुरु-शिष्य संवाद यांचा समन्वय होय! हजारो वर्षांचा हा भारताचा आध्यात्मिक इतिहास आहे. ऋषि, मुनि व संतांचे कर्तृत्त्व, संशोधन यातून साकारलेले हे भारताचे वैभव आहे. ही ज्ञान-साधना प्रत्येकाला प्रेरणा देणारी आहे. यातून मानवी जीवनाची मार्गदर्शक तत्त्वे सोप्या पद्धतीने पाहायला मिळतात. संवाद एकमेकांमध्ये भाव जागृती व प्रेम निर्माण करतो आणि जीवन सुसह्य होते. सर्वसामान्यांचा प्रश्न व त्याचे उत्तर गुरु-शिष्य संवादातून पाहायला मिळते.

प्रत्येकाला वाटते, “आपण सर्वांसाठी कष्ट करतो, झटतो, कोणीच चांगले म्हणत नाही. मग कष्ट का सोसावेत? अशावेळी सर्व सोडून जावेसे वाटते.” 

गुरुदेव म्हणतात, “कष्टाचे फळ मिळतेच. त्यासाठी काही काळ थांबावे लागते. बी पेरले तर लगेच झाड होऊन फळ मिळत नाही. मग मानवी-कष्ट याला अपवाद कसा असेल?”

शिष्य म्हणतो, “चांगले फळ मिळणार नसेल तर कष्ट फुकटच गेले ना?”

श्रीगुरुदेव उदाहरणाने पट‍वून देतात. “शेतकरी पावसाळ्यात धान्य पेरतो. पीक येण्यासाठी हिवाळ्यापर्यंत थांबतो. तो मधल्या काळात शेतीची इतर कामे करतो…पाणी देणे, तण काढणे, पिकांचे रक्षण करणे, अन्यथा पेरलेले बी वाया जाण्याचा संभव असतो. तसेच आपलेही आहे.” 

शिष्य म्हणतो, “ते कसे गुरुदेव?”

गुरुदेव म्हणतात, “प्रयत्न वाया जाऊ नये म्हणून आपण सतर्क राहून अडथळे आणणाऱ्या गोष्टी दूर साऱाव्यात.  उतावीळपणा नको. धैर्याने सुख-प्राप्ती होते.”  

शिष्य म्हणतो, “म्हणजे नेमकं काय?”

गुरुदेव म्हणतात, ”एक घडलेला प्रसंग सांगतो. एक ऋषि शिष्यांची परीक्षा घेतात. शिष्यांना एका टोपलीत पाणी भरून आणण्यास सांगतात. सर्व शिष्यांना ही गोष्ट अवघड वाटते. प्रत्येकाने पाणी आणण्याचा प्रयत्न केला परंतु कोणीही यशस्वी झाले नाही. सर्व शिष्य उतावीळपणे ‘हे काम अशक्य आहे’ असे गुरुदेवांना सांगतात. एवढ्यात एक शिष्य तेथे येऊन टोपलीत भरलेले पाणी दाखवतो. सर्व आश्चर्यचकित होतात. त्यावर गुरुदेव म्हणतात ‘तुला कसे शक्य झाले?’ शिष्य म्हणतो ‘मी टोपली पाण्यात भिजवली, बऱाच वेळ ठेवली, तिच्या काड्या फुगल्या, फटी बुजल्या आणि त्यात पाणी भरले गेले’. हे धीर धरल्याचे फळ आहे हे लक्षात ठेव.” 

तात्पर्य, मन-बुद्धीवर संस्कारांची मशागत करून कर्मरूपी बीजावर विवेकरूपी जलाच्या सिंचनाने फलस्वरूप पिकाची प्राप्ती होते. वेळेचा सदुपयोग, कष्ट व धैर्य ही यशस्वी जीवनाची त्रिसूत्री आहे.

……………………..

<< आनंद

आईची शिकवण >>