Vasudev Niwas | © 2023 All rights reserved | Developed by Digital Canvas
सगुण निर्गुण
आईची शिकवण
मानवी जीवन सत्याचाच शोध घेण्यासाठी आहे. शास्त्रांच्या मुळाशी जाऊन सत्यान्वेषण करता करता ईश्वर सर्वत्र आहे हे ज्ञान होते. ‘मग सकळ शास्त्रें स्वयंभे’ या श्रीज्ञानेश्वरमाऊलींच्या वचनानुसार सर्व शास्त्रांचा अभ्यास आपोआप होतो व संस्कारयुक्त शिक्षणाने त्याची प्रगती होऊन तो निष्णात होतो. संस्कार या शब्दाचा अर्थ असा “दोषांचे निर्मूलन व गुणांचे संवर्धन” होय. हा विषय खालील दोन उदाहरणांतून समजावून घेऊ.
महाभागवत् भक्तप्रल्हाद मित्रांशी हितगुज करतात, “मित्रहो, भगवंताची दृष्टी गर्भावस्थेतील प्रत्येक जीवावर असते. भगवत्कृपा आणि आईचे संस्कार यामुळे ‘तो देव मीच आहे’ हे ज्ञान आजही माझ्या स्मृतीत स्थिर आहे. भगवत्-प्रसन्नतेसाठी प्रेमच पुरेसे आहे.” भक्तप्रल्हादांनी स्वस्वरूपाकडे नेणारा संदेश दैत्य-मुलांच्या हृदयी वसवला. त्यांना ‘भक्तिपंथेचि जावे’ असा उपदेश केरून त्यांच्यात परिवर्तन घडविले. हा आपल्यासाठी आदर्श आहे.
वैज्ञानिक प्रयोग-शास्त्रांच्या सखोल अभ्यासात सत्याचाच शोध असतो. शास्त्रांचे नि:स्वार्थ व प्रामाणिक आचरण करणारा ईश्वर-दर्शनाचा अधिकारी बनतो. आजच्या युगातील एक घटना पाहण्यासारखी आहे. एक लहान मुलगा एकदा शाळेतून घरी येऊन आईच्या हातात चिठ्ठी देऊन म्हणतो, “आई, टीचरने ही चिठ्ठी तुला द्यायला सांगितली.” आई चिठ्ठी वाचते. तिचे डोळे पाणावतात. तो विचारतो, “आई तू का रडतेस? काय लिहिले आहे त्यात?” आई म्हणते, “अरें, यात असे लिहिले आहे की तुमचा मुलगा जिनियस आहे. त्याच्या अलौकिक बुद्धिमत्तेला आव्हानात्मक असे शिक्षण शाळा पुरवू शकत नाही म्हणून तुम्हीच त्याला शिकवा.” आईच्या शिक्षणाने हा मुलगा विश्वविख्यात संशोधक होतो.
कालांतराने तो घरी येतो तेव्हा ती जीर्ण चिठ्ठी त्याला सापडते. त्यातील मूळ
मजकूर वाचून त्याला धक्का बसतो. त्यात असे लिहिले असते की “तुमचा मुलगा मंद-बुद्धीचा आहे. आम्ही त्याला शिकवू शकत नाही. इथून पुढे तुम्हीच त्याला शिकवा!’ हे वाचून तो रडतो आणि आईच्या प्रतिमेसमोर उभे राहून म्हणतो, “आई, ‘हार मानणे मानवाची मोठी दुर्बलता आहे. प्रयत्नानेच यशप्राप्ती होते’ ही तुझी शिकवण मी कायम आचरणांत आणली व म्हणून मी विख्यात संशोधक झालो आहे. हे तुझेच यश आहे.”
सध्याचे युग हे स्पर्धात्मक आहे. मुलांमध्ये सकारात्मक परिवर्तन व प्रगती होणे आवश्यक आहे. त्याकरिता पालकांचे संस्कार अत्यंत महत्त्वाचे आहेत. हे दोन्ही उदाहरणांवरून लक्षात येते.
……………………..