श्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे

सगुण निर्गुण

सेवा

‘सेवा परमो धर्मः|’ असे सुप्रसिद्ध वचन आहे. समर्पण-भावनेने केलेली क्रिया म्हणजे ‘सेवाभाव.’ वस्तूंची देवाण-घेवाण हा व्यवहार झाला. खरी ‘सेवा’ भावनेने घडते वस्तूंमुळे नाही. मानवी जीवनातील ‘साधना-सत्संग-सेवा’ या त्रिसूत्रीमध्ये साधना/उपासनेचा-सत्संगाचा अहंकार दूर होण्याकरता संतांनी ‘सेवा’ सर्वश्रेष्ठ मानली आहे. स्मृतिकार म्हणतात “नम्रतेने केलेल्या आई-वडिलांच्या सेवेने आयुष्य-विद्या-यश-बळ मिळते.” “‘महत्सेवाम् द्वारम्’ श्रेष्ठांची सेवा हे मुक्तिधाम आहे” असे ऋषभदेव म्हणतात. म्हणून मानवसेवा हीच ईश्वर-सेवा आहे आणि ती प्रत्येकाकडून समरसतेने कशी घडली पाहिजे याचे उत्तम उदाहरण असे… राजा कुबेराचे दोन पुत्र नलकुबर-मणिग्रीव भगवंताजवळ सेवेची मागणी करतात, “‘हातांनी’ सत्कर्म घडो, ‘कानांनी’ चांगल्या गोष्टी ऐकू येवोत, ‘वाणीने’ गुणवर्णन होवो, ‘मनाने’ चांगले चिंतन होवो, ‘मस्तक’ सदैव नम्र राहो आणि ‘डोळ्यांना’ सदैव संतदर्शन घडो.” अशी सेवा सर्वांसाठी आदर्श आहे.

कोणत्याही सेवेप्रती तरतम-भाव कधीच नसतो. ‘सेवा ही सेवा’च असते. ‘सेवा’ करणे म्हणजे ‘सुख पोहचवणे.’ “कोणालाही दुखवू नये” या भावनेने केलेल्या ‘सेवे’ने परमतत्त्व-प्राप्ती होते हे एका रामायणातील प्रसंगातून पाहूया. प्रभुरामचंद्रांच्या सेतुबंधनाच्या वेळी एक खार आपले अंग भिजवून, वाळूत लोळून, धावत जाऊन दोन दगडांच्या सापटित आपले अंग झटकायची. त्यामुळे पाठीवर चिकटलेले वाळूचे कण तेथे पडत. ती पुनः अंग भिजवून ही कृति करीत होती. छोटीशी असूनही “प्रभूंच्या कार्यात मीही सेवा करते” हीच तिची भावना. वानर तिचा उपहास करतात. ती रडते. प्रभुरामचंद्र तिला प्रेमाने जवळ घेऊन रडण्याचे कारण विचारतात. ती वानराचा प्रसंग सांगते. प्रभु तिच्या पाठीवरून तीन बोटे फिरवत म्हणतात, “माझे लक्ष होते तुझ्याकडे. तू करीत रहा तुझी सेवा. तू ज्या पाठीवरून वाळूचे कण टाकलेस, त्याच्यावर माझ्या आशीर्वादाची खूण सदैव राहील.” आपण प्रत्येक खारीच्या पाठीवर तीन रेषा पाहतो. विश्वात लहान-मोठ्या ‘सेवे’ला महत्त्व नाही. प्रत्येकाने आपापल्या क्षमतेप्रमाणे ‘निष्काम सेवा’ करणे हेच महत्त्वाचे. जी ‘सेवा’ आहे ती प्रेमाने करावी. त्या ‘सेवे’चे भगवंत आणि संत साक्षीदार आहेत. निष्काम ‘सेवा’ देवाला प्रिय आहे.

तात्पर्य, संतश्रेष्ठ तुकाराममहाराज म्हणतात “आमच्या शक्तिप्रमाणे जशी आमच्याकडून होईल तशी ‘सेवा’ करू, ती तुम्ही गोड मानून घ्या” 

।।तुका म्हणे जैसी तैसी करूं सेवा| सामर्थ्यानें देवा पायांपाशीं।।

……………………..

बुद्धी >>

<< सृष्टी