tembe-swami-round
swami-loknath-terth-round
श्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे

सगुण निर्गुण

सृष्टी

सृष्टि म्हणजे ‘विश्व,’ ‘जगत् उत्पत्ति.’ ‘सृष्टि निर्मितीपूर्वी एक परमात्म्याशिवाय अन्य काही नव्हते, ‘तस्माद्धान्यन्न पर: किं चनास|’ असे ऋग्वेदामध्ये वर्णन आहे. परमात्मा सृष्टिचा जनक आहे. श्रीसमर्थ रामदासांनी ‘पैस आणि पसारा’ या एका वचनातून परमेश्वराच्या सृष्टिरचनेचे (पसरा) कौशल्य वर्णन केले आहे. अफाट विश्वाची रचना करणाऱ्या परमेश्वराचे सामर्थ्यही विशाल असल्यामुळे त्याला सर्वज्ञ व सर्वसमर्थ म्हणतात. 

‘नियमबद्धता’ हे सृष्टीचे एक वैशिष्ठ्य आहे. उदाहरणार्थ सूर्य-चंद्राचे उदय-अस्त, ग्रह-नक्षत्रांची गति, ऋतु-चक्रे, शरद ऋतुतील फळ-फुलांचा बहर, हिवाळ्यात उबदार कपड्यांचा वापर. ही सर्व व्यवस्था करणारा कोणीतरी ‘नियामक’ असलाच पाहिजे. जसे एखाद्या कंपनीचा सीइओ कामे नियमितपणे करवून घेतो तसेच सृष्टीचा ‘नियामक’ ईश्वरच आहे. सृष्टितील ‘विविधता-वैशिष्ट्य’ सर्वत्र दिसते. मोर व विविध पक्षांचे रंग, कोकिळेचा मधुर कंठ, फुलांची वैविध्यपूर्ण घडण व सुगंध अशा अनेक गोष्टीं निर्माण करणारा कुशल भगवंतच आहे.

‘चराचरात भगवंत आहे ही भावना कायम ठेवावी’ याबाबत संत नामदेव व त्यांचे गुरु विसोबा खेचर यांचे उदाहरण प्रसिद्ध आहे. विसोबा खेचरांनी शिवपिंडीवर पाऊल ठेवले होते. हे पाहून नामदेवांना वाईट वाटले. त्यांनी विसोबांचे पाऊल उचलून दुसरीकडे ठेवले तो तिथेही पिंड निर्माण झाली. असे अनेक वेळा घडले. तेव्हा ‘पिंड नाही असे स्थलच नाही’ म्हणजेच ‘ईश्वर सर्वत्र आहे’ असा उपदेश विसोबांनी नामदेवांना केला. 

ईश्वर सर्वसमर्थ, सत्यसंकल्प आहे. जीवांचे कल्याण व धर्म-रक्षण यासाठी तो दिव्य अवतार धारण करतो. सृष्टिच्या इतिहासात आतापर्यंत त्याने धारण केलेल्या विविध अवतारांचे हेच रहस्य आहे. वस्तुत: त्याचे संकल्प सामर्थ्य अपरिमित आहे. प्रत्येक मनुष्याने चांगला संकल्प करणे आणि तो पूर्णतेस नेण्याबद्दल जगन्नाथाजवळ नित्य प्रार्थना करणे एवढेच कर्तव्य आहे. संकल्पपूर्ती करणे ही भगवंताची लीला आहे. शुद्ध संकल्प ईश्वराच्या संकल्पाशी समरस होऊन त्याच्या कृपेनेच पूर्णतेस जातो. 

वरील सर्वांचे तात्पर्य संत नामदेवांच्या अभंगामधून समजावून घेऊ –

‘देह जावो अथवा राहो| पांडुरंगी दृढ भावो|| चरण न सोडीं सर्वथा| आण तुझी पंढरीनाथा|| 

वदनीं तुझे मंगल नाम| हृदयी अखंडित प्रेम|| नामा म्हणे केशवराजा| केला नेम चालवी माझा||’

……………………..

सेवा >>

<< श्रद्धा