Vasudev Niwas | © 2023 All rights reserved | Developed by Digital Canvas
सगुण निर्गुण
विद्या
‘विद्या’ म्हणजे ‘ज्ञान.’ विद्येचे महत्व ‘न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते|’ या वचनाद्वारे सिद्ध होते. भारतीय ज्ञानसाधनेतील श्रुति-स्मृति ग्रंथांमध्ये ‘दहा धर्म-लक्षणे’ आहेत. यामध्ये ‘विद्या प्रमुख लक्षण आहे’. श्रीसमर्थ म्हणतात “जो विद्येचे महत्त्व जाणतो तो भाग्यवंत आहे.” कवी-भर्तृहरिने “विद्या मानवाचे श्रेष्ठ रुप, धन, श्रेष्ठदैवत आहे” असे म्हटले आहे. एक सुभाषित आहे “विद्यारूपी धनाची कधीच चोरी होत नाही. विद्येचे ओझे नसते, उलट विद्या-दान केल्याने विद्या वर्धिष्णु होते.”
योगवासिष्ठामधील संदर्भ पाहू-“मनुष्याला विद्या-प्राप्तीसाठी वारंवार अभ्यास आवश्यक आहे. त्यामुळे अज्ञ देखील तज्ञ होतो. धनुर्विद्येत जसा धनुर्धराच्या अभ्यासामुळेच अचेतन बाण सूक्ष्म लक्ष्याचा वेध करू शकतो तसेच विद्येने मानवाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. तो सूर्यासारखा तेजस्वी बनून निर्भयता प्राप्त करतो.”
भारतातील महापुरुषांनी-शास्त्रज्ञांनी विद्यारूपी तप:शक्तीने विश्वात श्रेष्ठत्व प्राप्त केले आहे उदा. योगी अरविन्द, योगिराज श्रीगुळवणीमहाराज. त्यांनी स्थापन केलेल्या ज्ञान-योगपीठांमुळे अनेक जिज्ञासू ज्ञानसंपादनेसाठी उत्सुक आहेत. हे भारतीय-ज्ञानपीठाचे वैशिष्ट्य आहे. भारताचे ‘चौदा-विद्या-चौसष्ट-कला’ हे वैभव मोठे विद्याधन आहे. ‘कला’ शब्दाचा अर्थ आनंद आहे, ‘कम्(=आनंद), लाति(=ददाति) इति कला’. तसेच विद्या-कला व्यावहारिक उपयुक्ततेचे साधनही आहेत. विद्यमान भारतीय शास्त्रज्ञ-संशोधकांनी भारतीय कला-विद्यांना आधुनिक तंत्रज्ञाने जागतिक स्तरावर आणणे ही काळाची गरज आहे. यायोगे विद्यावैभवाचे दालन नव्या पिढीला उपलब्ध होईल. सध्याच्या स्पर्धात्मक युगात विविध क्षेत्रात अनेक जण प्राविण्य मिळवून उच्च-विद्या-विभूषित होतील.
शास्त्रविद्या गुरूंकडून प्राप्त करणे आवश्यक आहे. एक घडलेला प्रसंग असा- ‘गांधारदेशातील’ एका विद्यार्थ्याला विद्यासंपादनाची जिज्ञासा होती. तो आचार्यांना प्रार्थना करतो. त्याच्या हस्तरेषा पाहून आचार्य म्हणतात, “तुझ्या हातावर विद्या-रेषा नाही, त्यामुळे विद्याप्राप्ती नाही.” तो खिन्न होतो. एका टोकदार यंत्राने आपल्याच हातावर रेष ओढतो व तो आचार्यांना सांगतो, “ही पहा माझ्या हातावरची रेषा. आता मला विद्येचा अधिकार आहे नां?” त्या विद्यार्थ्याने दृढनिश्चयावर विद्याप्राप्ती केली. हेच “विश्वविख्यात व्याकरण-शात्रज्ञ पाणिनी” होय. ते सर्वांसाठी आदर्श आहेत.
संतविनोबा भावेंचा सर्वांसाठी बोधसंदेश असा –
‘विद्याभ्यासासाठी कालाची मर्यादा नसते, विद्याभ्यासात सातत्त्य हवे आणि विद्याभ्यासावर श्रद्धा हवी.’
……………………..