Vasudev Niwas | © 2023 All rights reserved | Developed by Digital Canvas
सगुण निर्गुण
उत्साह
ऋग्वेदातील गौपायनबंधु ऋषि सांगतात, ‘अयं मे हस्तो भगवान्|’ परिश्रम करणारे माझे हात भगवंतच आहेत. कष्ट करून यश मिळविणे माझ्याच हातांमध्ये आहे असा विश्वास आहे. माझ्या हातांनी सर्वांचे कल्याण होवो हीच प्रार्थना आहे.’
‘उत्साह’ मानवी कर्तव्याला चालना देणारी ‘विलक्षण प्रेरकशक्ति’ आहे. कुठल्याही कामात ‘उत्साह’ आवश्यक आहे. ‘उत्साह’ नसेल तर सर्व काही शिथिल होते. जेवण मिळाले तरी हाताच्या खटपटीशिवाय अन्न पोटात जाणार नाही. एक सुभाषित आहे ‘उत्साही पुरुषाला जगात दुर्लभ असे काहीच नाही. दोन लाकडे एकमेकांवर बऱ्याच वेळ घासल्यावरच अग्नि उत्पन्न होतो. जमीन खोलवर खणल्यावरच पाणी लागते. तसेच मुंगी हळूहळू, उत्साहाने चालत राहिली तर अनेक मैल पार करते.’ प्रयत्न करण्यास कधीही माघार घेता कामा नये. ‘उत्साह’पूर्वक योग्य मार्गाने प्रयत्न करणाऱ्याला सफलता प्राप्त होते. सध्याच्या स्पर्धात्मक युगात तरुणांनी ‘उत्साहाने’ स्वबळावर (फ्री-लान्सिंग) उद्योगक्षेत्रात प्राविण्य मिळविणे आवश्यक आहे. हीच काळाची गरज आहे.
एक घडलेला प्रसंग पाहू. एकदा एका धनिकाने मोठ्या शामियानात सर्वांना जेवण दिले. मिष्टान्न खाऊन सर्वजण तृप्त झाले. धनिक रस्त्यावरील काम करणाऱ्या मजूराला “तूं जेवलास कां?” असे विचारतो. कामगार शांतपणे म्हणतो, “आयते जेवण घेतले तर मी आळशी होईन. माझ्या कष्टाची भाकरीच मला नेहमी ‘उत्साह’ देणारी आहे.” ते ऐकून धनिक खाली मान घालून निघून जातो. आळस हा मानवाचा मोठा शत्रू आहे. श्रीतुकाराममहाराज म्हणतात, ‘भिक्षापात्र अवलंबिणे| जळो जिणे लाजिरवाणे||’ कोणासमोर हात पसरू नये, ‘जेथे काम तेथे उभा श्याम||.’
मानवी कष्टांच्या फलप्राप्तीने त्या कष्टांना नवीनता प्राप्त होते. तसेच शारीरिक, मानसिक, बौद्धिक बळ प्राप्त होऊन वातावरण चैतन्यमय होते आणि ‘श्रमचि देव|’ हा अनुभव येतो. याचे तात्पर्य योगतपस्वी श्रीकाकामहाराजांच्या एका पद्यात पाहूया –
‘दिसू लागला जवळी मंगल, विश्वाचा वैभवकाल|
‘उत्साहाने चैतन्याच्या,’ मार्गावर करिता चाल||’
……………………..