Vasudev Niwas | © 2023 All rights reserved | Developed by Digital Canvas
सगुण निर्गुण
ऐकु गोविंद रे
श्रीज्ञानेश्वरमाउली म्हणतात, “हे गोविंदा, तुला सगुण म्हणावें की निर्गुण म्हणावें, स्थूल कां सूक्ष्म, साकार कां निराकार, दृश्य कां अदृश्य, म्हणावें तरी काय? कळतच नाही. अंदाजसुद्धा करतां येत नाही, तुझे स्वरूप वेदांनाही सांगता येत नाही.’ हे वास्तव आहे.
उदाहरण, मीठ आणि समुद्र हे एकच. पण मीठाला “समुद्राची खोली पाहावी” असे वाटले. किती खोली आहे हे पाहण्यासाठी मीठ गेले ते परतच आले नाही, समुद्रच झाले. विशिष्ट प्रक्रियेने समुद्राचे मीठ होते. मीठ हे मूळचे समुद्र, तसा जीव हा मूळचा ब्रह्म “जीवो ब्रह्मैव नापर:|” मीठ जसा समुद्राचा अंश तसा जीव हा ब्रह्माचा अंश आहे. मीठ जसे समुद्राच्या सहवासाने समुद्र बनते, तसा जीव ब्रह्मोपासनेने ब्रह्म बनतो. दुसरे उदाहरण, गर्दीत एक मुल हरवते. त्या मुलाने रडू नये म्हणून सुरक्षारक्षक त्याच्याशी खेळतात. पण जेव्हा आई दृष्टीला पडते तेव्हा सर्व खेळ टाकून मूल आईकडेच जाते कारण ते तीचेच आहे. जे जिथून येते ते तेथेच जाते. त्याचप्रमाणे जीव ब्रह्मरुप होतो. असे झाल्यावर जीवांना ‘ब्रह्म कसे आहे’ ते सांगण्याला जीव जीवपणाने उरतच नाही.
वेदांची स्थितीही अशीच झाली. गुणांचे प्रतिपादन करीतकरीत निर्गुणाचे प्रतिपादनाकडे वळतांच वेद ‘मौनावले’. उदाहरण, बाणासुराची मुलगी राजकुमारी उषा स्वप्नात राजकुमार अनिरुद्धला पाहते. उषाची मैत्रीण चित्रलेखा वेगवेगळ्या राजपुत्रांची चित्रे काढते. प्रत्येक चित्राचा उषा ‘हा नाही हा नाही’ असे म्हणत निषेध करते. शेवटी अनिरुद्धाचे चित्र पाहताच ती ‘एकदम स्तब्ध’ होते. सारांश, हे उषाचे ‘मौन’ हीच अनिरुद्धप्राप्तीची खूण.
तसेच “हे गोविंदा, तुझ्यापासून आम्हाला वेगळेपण ‘नको आहे, नको आहे’ असे म्हणत वेद तुझ्या ठिकाणीच एकरूप झाले.” संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ तात्पर्य सांगतात, “खुंटले वेदान्त| हरपले सिद्धांत|”
एका भक्तीगीताचा आनंद घेऊ-
‘कानडा राजा पंढरीचा,
वेदांनाही नाही कळला अंतपार याचा|’
……………………..