tembe-swami-round
swami-loknath-terth-round
श्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे

सगुण निर्गुण

ईश्वर

‘ईश्वर: पर्जन्यवत् द्रष्टव्य:|’ “ईश्वर पावसाप्रमाणे आहे असे समजावे” असे जगदगुरू श्रीशंकराचार्य सांगतात. पाऊस सर्वत्र एकसारखाच पडतो. पाऊस पडल्यानंतर तांदूळ, गहूही उगवतो, विषारी वनस्पतीसुद्धा उगवते. हा दोष पावसाचा नसून, जमिनीचा किंवा बीजाचा असतो. तसा परमेश्वर सर्वत्र समानच आहे. मनुष्याला भावानुरूप कमी अधिक फळ मिळत असते. एका उदाहरणातून समजावून घेऊ. दोन मित्र प्रवासाला निघाले. एका कल्पवृक्षाखाली बसून विचार करू लागले, “छान सावली आहे. पाणी मिळाले तर बरे होईल!” लगेच पाणी उत्पन्न झाले. एकाने विचार केला, “येथे सर्प तर नाहीत नां?” लगेच समोर साप आला. दुसर्‍याने विचार केला “जे मागावे ते मिळत आहे. ही ईश्वरी लीलाच असली पाहिजे.” तत्काल त्याला सुंदर नाद ऐकू आला. ईश्वर असा कल्पवृक्षाप्रमाणे आहे. म्हणून मानवाला प्राप्त होणार्‍या फळाचा दोष ईश्वराकडे देता येत नाही.

सामान्यांची शंका अशी, “ईश्वर सर्व जगाचा पिता आहे, सर्वांविषयी समान आहे, त्याला कोणाचाही द्वेष किंवा कोणी प्रिय-अप्रिय नाही अशी त्याची प्रतिज्ञा आहे, तर तो ‘साधूंचे रक्षण व दुष्टांचा नाश करतो’ असा विषमभाव कां?” असा विषमभाव नाही कारण भगवंत दैत्यांना दुष्ट जन्मातून मुक्त करतो, त्यांचा उद्धार करतो. हे दैत्यांच्या विरोधभक्तिचेच फळ आहे. उदाहरण, हिरण्यकश्यपुकडून विरोधभक्तितून भगवंताचेच अखंड चिंतन घडले आणि भगवंताने त्याचा उद्धार केला. याप्रमाणे ईश्वराचे सर्वांवर आईसारखे प्रेम असते.

सृष्टीचा नियामक व नियंता असणार्‍या ईश्वराचे चराचरावर समान प्रेम आहे. याचे उपनिषदात सुंदर वर्णन आले आहे. मनुष्याच्या हृदयामधून निघणाऱ्या हजारो नाड्या सर्व शरीराला व्यापून असतात, तसेच पिंपळाच्या झाडाच्या पानातील हजारो बारीक रेषा पानात व्यापून असतात. याप्रमाणे ‘पिंडी ते ब्रम्हांडी’ व्यापणाऱ्या चैतन्याचे सामर्थ्य आश्चर्यकारक आहे याचा अनुभव येतो.

संतश्रेष्ठ तुकाराममहाराज तात्पर्य सांगतात –
धरा बळकट भाव, तुम्हापाशी आहे देव|
कारें हिंडता रानोरानी, पुसा संतासी जाऊनी|

……………………..

मुंगी >>

<< एकु गोविंद रे