सगुण निर्गुण
मुंगी
ऋग्वेदात ‘मुंगी’ला ‘वम्री’ म्हटले आहे आणि ‘वम्रीकूट’ किंवा वल्मिक’ म्हणजे ‘वारूळ’. ‘मुंगी’ला निसर्गत: आश्चर्यकारक वारूळ निर्मितीचे सामर्थ्य प्राप्त झालेले आहे. तिने तपश्चर्या करणाऱ्या ‘वाल्या’कोळीच्या अंगाभोवती ‘वल्मिक’ निर्माण केले. तेच ‘वाल्मीकी’ ऋषि. हे भारताचे वैभव आहे.
संतांना ‘मुंगी’चा सूक्ष्मदेह व तिचे अलौकिक सामर्थ्य खूप भावले. म्हणून त्यांनी ‘मुंगी’चे रूपक घेऊन समाजाला मार्गदर्शन केले. उदाहरणार्थ, संत तुकाराममहाराज सांगतात, “‘लहानपण देगा देवा| मुंगी साखरेचा रवा||’ भगवंता मला लहानपणच दे. साखरेच्या एकाच कणात मुंगी समाधान मानते. मोठ्या कणांची ती अपेक्षा करीत नाही.” म्हणजे, मोठेपणापेक्षा लहानपण श्रेष्ठ आहे असा अर्थ यातून स्पष्ट होतो. तसेच निवृत्तिनाथ सांगतात ‘मुंगीने हे कण नेले वदनात | तिणे आपुल्या सदनात कुटुंब पोषिले ||’ “एका कणावर ‘मुंगी’ आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवते” आणि “हे मानवा, वाया गेलेल्या अन्नाने हजारो जीवांचे पोषण होईल” हा संदेश ती देते.
‘मुंगी’ला संतांनी गूढ तत्त्वज्ञानाचेही प्रतीक मानून अभंग रचनेतून त्याचे स्वरूप स्पष्ट केले आहे. परब्रह्म अखिल ब्रह्मांडात भरले आहे असे शास्त्रवचन आहे. नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त, सत्य परमात्मतत्त्व आहे. “या सूक्ष्म तत्त्वाचा अनुभव मला गुरुंनी दिला” असे संत नामदेव “‘मुंगी उमगली खेचरसंगें ||’ या अभंगाद्वारे स्पष्ट करतात. तसेच संत कबीरसुद्धा अतिशय सूक्ष्म विचार मांडतात, “मुंगी लहान, तिचे पाऊल त्याहून लहान, त्या पावलातील पैंजण त्यापेक्षाही लहान. त्या पैंजणाचा अतिशय सूक्ष्म नाद भगवंत आवडीने ऐकतो. मग भक्ताने केलेली प्रार्थना तो कां बरे ऐकणार नाही?” ‘नूपुरांचा सूक्ष्म आवाज ईश्वर ऐकतो’ हा जसा ‘मुंगी’चा विश्वास, तसा “माझी प्रार्थना भगवंत ऐकतो” असा भक्ताचा विश्वास असलाच पाहिजे. समर्पण भावनेने केलेली कोणतीही उपासना भगवंताला आवडते हाच अभिप्राय यातून व्यक्त होतो.
संत कबीरांचा सुंदर दोहा असा-
‘मस्जिद भीतर मुल्ला पुकारे | क्या साहब तेरा बेहरा है ||
चींटी के पग नूपुर बाजे | सो भी साहिब सुनता है ||
पंडित होय के आसन मारे | लंबी माला जपता है ||
कहत कबीर सुनो भाई साधो, हरि जैसे को तैसा है ||’
……………………..