Vasudev Niwas | © 2023 All rights reserved | Developed by Digital Canvas
सगुण निर्गुण
मौन
भगवद्गीतेमध्ये भगवंताने विविध विभूतिंचे वर्णन केलेले आहे. ‘विभूति’ म्हणजे भगवंताचे ‘विशेष सामर्थ्य’ होय. उदाहरणार्थ, मूळ सोन्यातून घडवलेले दागिने ही सोन्याची ‘विभूति’ आहे. त्याप्रमाणे भगवंताचे ‘विशेष सामर्थ्य’ ज्याज्या ‘प्राणी’, ‘वस्तु’, ‘भावांमध्ये’ आहे, ते सर्व त्याच्या ‘विभूति’ आहेत. ‘मौन’ म्हणजे वाणीचा संयम. ‘मौन’ धारण केल्याने गोपनीय गोष्टींचे रक्षण होते. म्हणून ‘मौन-भावाला’ भगवंतानी आपली विभूति मानली आहे.
अनेक वर्षे मौनव्रत धारण करणारे महर्षि रमण सांगतात, “मौन म्हणजे गप्प बसणे नव्हे. ती ध्यानावस्था आहे.” परमात्म्याच्या नामाचे मनाने केलेले चिंतन म्हणजे ‘मौन’ होय. महर्षिंनी प्रत्येक प्रसंगी बोलण्यापेक्षा क्रियाशीलतेला अधिक महत्त्व दिले. तसेच महात्मा गांधी आठवड्यातून एक दिवस मौनव्रत धारण करीत असत. त्या ‘मौनव्रताच्या’ सामर्थ्यावर त्यांनी ‘शांतता’ अंगीकृत केली. साबरमती आश्रमापासून दांडीपर्यंत ३८५ किलोमीटरच्या २४ दिवसाच्या यात्रेत हजारो भारतीय सहभागी झाले. या ‘मिठाच्या सत्याग्रहाद्वारे’ त्यांनी भारतीयांना जागृत करून ब्रिटिशांना नमवले. सद्यस्थितीत हा मोठा आदर्श आहे. या आदर्शाचे पालन सर्वांनी करणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्वत्र शांतता प्रस्थापित होईल.
योग्य वेळी ‘मौन’ धारण केल्याने पोपटाची सुटका झाली हे एका घडलेल्या प्रसंगातून पाहू. बोलके पोपट विकणारा विक्रेता बाजारात असतो. एका जोडप्याने त्याच्याकडून उत्तम बोलणारा पोपट खरेदी केला. त्याला घरी आणत असताना पिंजऱ्यातला पोपट विचार करतो, “दोन महीने झाले मी पिंजऱ्यात अडकलो. नवीन पिंजऱ्यात किती काळ अडकणार? बोलण्यामुळेच अडकलो.” म्हणून तो न बोलण्याचे ठरवतो. पत्नी पोपटाशी बोलू लागते पण पोपट बोलतच नाही. “नवी जागा म्हणून पोपट बोलत नसेल, उद्या बोलेल” असे म्हणून पती-पत्नी रोज त्याला विविध पदार्थ देतात. तरीही पोपट बोलत नाही. शेवटी “हा मुका आहे, सोडून देऊ” असे म्हणत तिने पिंजऱ्याचे दार उघडताच, पोपट आनंदाने आकाशात भरारी मारतो. मानवाने हे शिकण्यासारखे आहे.
एकूणच कमी शब्दात हितकारक बोलणे हे ‘मौन’च आहे. मौनामुळे’ वाद-विवाद होत नाही.” आजच्या व्यस्त जीवनात हा सर्वांसाठी संदेश आहे.
संत दयाळनाथ तात्पर्य सांगतात –
“बोलणे नकोच फक्त करणे हवे,
होईल काम त्याने अधिक चांगले.”
……………………………..