Vasudev Niwas | © 2023 All rights reserved | Developed by Digital Canvas
सगुण निर्गुण
गृहस्थाश्रम
‘आश्रम’ हा शब्द ‘श्रम’ म्हणजे ‘कष्ट करणे’ यावरून आला आहे. अर्थ असा “ज्याच्या योगे माणसाला कर्तव्यपालनाचे सर्व परिश्रम करावे लागतात तो आश्रम होय. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम या चार आश्रमांपैकी “गृहस्थाश्रम सर्वश्रेष्ठ आश्रम आहे” असे स्मृतिग्रंथात सांगितले आहे कारण “जसे सर्व जीव वायुवर अवलंबून आहेत, तसेच सर्व आश्रम गृहस्थाश्रमावर अवलंबून आहेत.”
प्रत्येक व्यक्तीचा संसाराशी असलेला संबंध कितीही प्रयत्न केला तरी सुटत नाही. याचे मूळ कर्म आहे. भगवंत सांगतात की “मनुष्य पराधीन असल्याने कर्म करावेच लागते.” म्हणून संसार कायम असतो. देवापासून मानवापर्यंत सर्वांनी गृहस्थाश्रमातच जन्म घेतला. सर्व संतांनी प्रपंचच परमार्थमय करून मोक्षप्राप्ती करून घेतली. त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारून समाजाला ‘कर्तव्य करीत राहणे हीच ईश्वरसेवा’ अशी शिकवण दिली. माऊली म्हणतात, “अवघाची संसार सुखाचा करीन| आनंदे भरीन तिन्ही लोक||” तसेच संतश्रेष्ठ तुकाराममहाराजांनी, “घालूं तयावरी भार| वाहूं हा संसार देवापायी||” या उक्तितून मानवाला संदेश दिला. संत एकनाथमहाराज प्रापंचिक असूनही त्यांचे परमार्थात लक्ष होते हा आदर्श आहे.
संसार व परमार्थ एकमेकांना पूरक आहेत. एक सुभाषित आहे. ज्या घरात आनंद, मुले बुद्धिमान, गोड बोलणारी पत्नी, चांगला मित्र, सुसंपन्नता, कौटुंबिक जिव्हाळा, आज्ञाधारक सेवक, अतिथींचे स्वागत, रोज पूजाअर्चा, सात्विक अन्न, सज्जनसंगती आहे असा ‘गृहस्थाश्रम धन्य’ होय. असा गृहस्थ संसारात कितीही दुःखाचे प्रसंग आले तरी डळमळत नाही.
अलीकडच्या काळातील एक प्रसंग पाहू. गोमती नदीच्या काठी एक गृहस्थ रामभक्त आहेत. त्यांनी प्रपंच व्यवस्थित केला. ते नोकरीतून प्राप्त झालेले द्रव्य व लोकसहभागातून विनियोग मोठ्या प्रमाणात ग्रंथदानासाठी आजही करीत आहेत. ‘राम मंत्र’ हा तेरा अक्षरी आहे म्हणून तेरा कोटी ग्रंथदानाचा त्यांचा संकल्प आजच्या काळाला प्रेरणादायी आहे.
सारांश, गृहस्थाश्रमात ईश्वरसेवेने ‘देवऋणातून’ मुक्तता, आईवडीलांच्या सेवेने व उत्तम संततीप्राप्तीने ‘पितृऋणातून’ मुक्तता, तसेच उत्तम ज्ञानप्राप्तीने ‘ऋषिऋणातून’ मुक्तता हे तीन लाभ होतात म्हणून तो श्रेष्ठ आहे.
भगवंत ‘गृहस्थाश्रमाचे’ तात्पर्य सांगतात,
“मजमध्ये रंगली चित्तवृत्ति|
यालागी विसरला गृहासक्ती|
त्याशी गृहस्थाश्रमीच माझी प्राप्ती|
निश्चय जाण तू उद्धवा||”
……………………..