सगुण निर्गुण
चित्त
संतश्रेष्ठ तुकाराममहाराज म्हणतात “चित्ती असू द्यावे समाधान”. तसेच पतंजलि मुनि सांगतात “ ‘चित्त प्रसन्नता’ मानवाच्या यशस्वी जीवनाचे सूत्र आहे”. ‘चिंतन करणे’ हा जीवाचा स्वभावधर्म आहे. त्याचेच नाव ‘चित्त’. म्हणून ‘चित्त, चिंतन, चैतन्य’ त्रिपुटी शास्त्रकार सांगतात. हा विषय समजावून घेऊ.
‘चित्ताचे’ स्थान मस्तकातील मेंदूत आहे. मेंदू दुधाच्या खरवसाप्रमाणे मृदु व ‘कणमय’ आहे. ते ‘कण’ अनेक प्रकारचे आहेत. काही ज्ञानोत्पादक , काही कल्पना ग्रहण व स्फुरण करणारे आहेत. मेंदूच्या ‘कणांचे’ सामर्थ्य सात्विक आहार व मन:शांतिने शाबूत राहते. परंतु वृद्धावस्थेमुळे, तामस आहाराने, डोक्यावरील आघाताने ते ‘कण’ क्षीण होतात.
ज्ञानतंतूंनी डोळ्याला दिसणार्या वस्तूंचे ज्ञान ‘कणांना’ होते. हे ‘कण’ मन, बुद्धी, अंत:करण यांना प्रेरणा देऊन ‘चित्तात’ ते ज्ञान स्थिर करतात. ही प्रक्रिया इतर सर्व ज्ञानेंद्रियांच्या बाबतीतही आहे. एक उदाहरण पाहू. एक विद्यार्थी अभ्यास करूनही उत्तीर्ण होईना. गुरूंच्या लक्षात आले की तो केवळ नेत्रांनी व जिव्हेने पाठांतर करीत आहे. त्याचे ‘चित्त’ अभ्यासात नाही. गुरुंनी ‘चित्त’ ठेवून अभ्यास करण्यास सांगितल्यानंतर तो उत्तीर्ण झाला. ‘एकाग्र चित्ताने’ अभ्यास/चिंतन झाले पाहिजे. केवल नेत्र, कर्ण, जिव्हेने केलेले श्रम निरर्थक आहेत.
मेंदूतील ‘कणांच्या’ योगाने अनेक प्रकारचे ज्ञान मस्तकात असते. म्हणून मस्तकाला ‘ज्ञानभांडार’ म्हणतात. ज्ञानीलोकांच्या शरीराच्या मानाने ‘मस्तके व मेंदूची क्षमता मोठी’ असते. तसेच ‘धाडसाचे काळीज मोठे’ असते. हे घडलेल्या प्रसंगातून पाहू. नेपोलियनचे ‘डोके व काळीज मोठे’ होते. एकाच वेळी तो पन्नास कारकुनांना बिनचूकपणे ज्याचा त्याला मजकूर सांगत असे. तसेच युद्धाचे विचार, जगाचे नकाशे पाहणे व ग्रंथ लेखनही त्याचे चालू असे. तो ‘बुद्धीच्या बळाने’, ‘शुद्धचित्त’ व ‘स्थिरमनाने’ एकाच वेळी अनेक कामे उत्साहाने करीत असे.
आजच्या जीवनात सर्वांना वरील मेंदूतील ‘कणांचे सामर्थ्य’ प्राप्त होऊ शकते. यासाठी भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलेला अभ्यास आहे. त्याला ‘पंथराज’ म्हणतात. तो असा-
“शांतपणे डोळे मिटून, शरीर ढिले सोडले की मणक्यातून खालून वर मेंदूकडे जाणाऱ्या लहरीमुळे सुखद अनुभूति येते. शरीर, मन प्राणशक्तीबरोबर संतुलित झाल्यामुळे प्रत्येक कृति चैतन्यशक्तीच्याच इच्छेप्रमाणे चालते व ‘अमृतानुभव’ प्राप्त होतो.” तात्पर्य,
‘मी चैतन्य आहे’
……………………..