Vasudev Niwas | © 2023 All rights reserved | Developed by Digital Canvas
सगुण निर्गुण
संपत्ति आणि दारिद्र्य
‘लक्ष्मी’ या शब्दाचा अर्थ मार्कंडेय पुराणांतील ‘देवीमाहात्म्यांत’ आहे. ‘लक्षयति नीतिज्ञम्’ म्हणजे नीतिधर्माप्रमाणें वागणाऱ्यावर कृपा करते ती ‘लक्ष्मी’. तसेंच ‘लक्ष्मी’ म्हणजे ऐश्वर्य, संपत्ति असाही अर्थ आहे. पुण्यवंतांच्या घरातील ‘लक्ष्मी’ आणि अपुण्यवंतांच्या घरातील ‘अलक्ष्मी’ (दारिद्र्य) अशी ‘लक्ष्मीची’ दोन रुपे सांगितलेली आहेत.
सत्कर्म म्हणजे ‘पुण्य’. पुण्यवंतांना ‘लक्ष्मीरूपी’ संपन्नता प्राप्त होते. या उलट दुष्कर्म म्हणजे ‘अपुण्य’. अपुण्यवंतांच्या घरांत ‘अलक्ष्मीरूपी’ दारिद्र्य वास करतें. मनुष्याने दारिद्र्यातून मुक्त होऊन, समृद्ध व पुण्यवंत व्हावें यासाठीं लक्ष्मी ‘अलक्ष्मीचे’ रुप धारण करतें.
मानवाने प्राप्त झालेल्या संपत्ति अथवा दारिद्र्य अवस्थेंचा सदुपयोग करावा, अन्यथा दोन्हीं अवस्था दु:खाला कारणीभूत होतात ज्याला शास्त्रकार ‘नरकयातना’ म्हणतात. एका रुपकातून हें समजावून घेऊं. दोन गृहस्थांची नरकात गांठ पडतें. ते एकमेकांची विचारपूस करतात. गरीब विचारतो, “तुम्ही कुठून आलांत?” श्रीमंत म्हणतो, “आम्ही श्रीमंतीतून आलो. आपण कोठून आलांत?” गरीब म्हणतो, “दारिद्र्यातून आलो.” श्रीमंत म्हणतो, “कांहो, आमच्या डोळ्यावर श्रीमंतीचा मद, संपत्तिचा उपयोग चैनीकडे केला, कशाचा देवधर्म? आम्ही धर्मबाह्य वागलो, स्वच्छंद आहार विहार केला. तुम्हीं तर गरीब, तुम्हीं इकडे कुणीकडे आलां?” गरीब म्हणतो, “आमच्या डोळ्यावरही गरिबीची धुंदी. दारिद्र्याच्या त्रासाने त्रस्त झालो, ‘जें व्हायचे तें होईल म्हणून कांहींही प्रयत्न केलें नाहींत. गरीबी ही उद्धाराची संधी मिळाली असूनही विचार केला नाहीं. दारिद्र्याचे हें गांठोडे घेऊन नरकात आलो आणि येथील यातना सुरू झाल्या. तुम्हीं श्रीमंत असून व आम्हीं गरीब असून दोघांचे हाल सारखेंच.” असें दोघें स्वतःलाच दोष देतात.
वर वर्णन केलेल्या यातनांमधून सुटका होण्यासाठी श्रीमद्भागवतात भगवान वामनांनी राजा बलीला केलेला मोलाचा उपदेश असा- “धन आणि भोगांनी संतुष्ट न झाल्याने मनुष्य जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकतो. म्हणून समाधानाने जगणें हे यशस्वी जीवनाचे सूत्र आहे.”
तात्पर्य, संत सांगतात, “मानवांनो, जगन्नियंता नारायणाच्या पत्नी लक्ष्मीला जगन्माता समजून सन्मान करा, सेवेकऱ्यासारखें वागवू नका अन्यथा ती घर सोडून जाते.” म्हणून प्रत्येकाने लक्ष्मीची प्रार्थना करावी-
“हे लक्ष्मी, माझ्या घरांत स्थिर रहा, शांत रहा, प्रसन्न रहा, आमचे कल्याण कर. तुला त्रिवार नमस्कार असो.”
……………………..