Vasudev Niwas | © 2023 All rights reserved | Developed by Digital Canvas
सगुण निर्गुण
स्वप्न
‘स्वप्न’ म्हणजे ‘झोपेच्या काळातील मनोव्यापार’ होय. ही जीवाची एक अवस्था आहे. आयुर्वेदशास्त्रात ‘स्वप्न्या’ नाडीचा उल्लेख आहे. ‘स्वप्न’ हे जागेपणी अनुभवलेल्या पदार्थांच्या संस्कारांवर अवलंबून असते. स्वप्नावस्थेतील विषय तात्पुरते असतात. ती अवस्था संपताच तेही नाहींसे होतात. संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात “ ‘स्वप्नींचें राज्य कां मरण | नोहे हर्षशोकांसि कारण |’ म्हणजे झोपेतून जागे झाल्यावर स्वप्नांत मिळालेले राज्यसुख अथवा दुःख हे आनंदास किंवा दुःखास कारणींभूत होत नाहीं”.
एक घडलेला प्रसंग असा. एक पराक्रमी राजा महालात झोपला असतांना, स्वप्न पाहतो. ‘त्याला दिसतें कीं त्याचा युद्धात पराभव झाला आहे. राज्य सोडून तो वणवण फिरत आहे. त्याच्यावर भिक्षा मागण्याची वेळ आली आहे. भिक्षा मागताना हातातील भिक्षापात्रावर घार झडप घालते आणि त्यातील अन्न खाली सांडले आहे.’ हे पाहून तो घाबरून झोपेतच ओरडतो. जागा होऊन तों ‘आपण महालात आहोत’ असें पाहतो व म्हणतो “हें खरें कीं तें स्वप्न खरें?” जों येईल त्याला तसेच महाराणीला, प्रधानाला राजा हाच प्रश्न विचारतो. सगळेजण घाबरून जातात. त्याचवेळी एक ज्ञानी महात्मे राजवाड्यात येतात. त्या ज्ञानी माहात्म्यास राजा “हें खरें का तें स्वप्न खरें?” असा प्रश्न करतो. ज्ञानी महात्मे स्वप्नाचे मर्म ओळखतात आणि उपदेश करतात. “राजा, शांतपणे ऐक. जे तू आता पहात आहेस ते शाश्वत नाहीं आणि तें स्वप्नही खरे नाहीं. फक्त तुझ्या हृदयातला भगवंतच खरा आहे. हें लक्षात ठेव.” राजाला स्वप्नाचे मर्म समजते. सद्गुरूंकृपेने त्याला अनुभूतीप्राप्ती होते व तो आनंदीत होतो.
संतश्रेष्ठ श्रीतुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे आपण प्रार्थना करुं. “अहो श्रीहरि, स्वप्नात प्राप्त झालेले धन कधी हातात येत नाहीं अथवा पदरात बांधता येत नाही. यासाठी तुम्हीं माझ्यासमोर प्रत्यक्ष प्रकट का होत नाहीं? देवा, मला स्वप्नातील स्वरूप नको आहे. मला सत्य स्वरूपाची भेट द्या. हे देवा, माझ्याशी प्रत्यक्ष बोला व मला आनंद द्या ज्यामुळे मी तुमची चरणकमले डोळे भरून पाहीन.”
तात्पर्य,
‘तुका म्हणे माझ्या जिवांचिया जीवा |
सारूनियां ठेवा पडदा आतां ||’
……………………..