Vasudev Niwas | © 2023 All rights reserved | Developed by Digital Canvas
सगुण निर्गुण
माणसातील देवत्व
ईशावास्योपनिषद सांगते “मानवातील ईश्वर ओळखणे हेंच खरें ज्ञान.” उदाहरणार्थ सोन्याच्या विविध अलंकारात आपण भेदभाव करतो. परंतु दागिना मोडल्यावर सोनेच उरते. म्हणून ‘सोने सत्य’ आहे. लहान, मोठा, काळा, गोरा ही शब्दांचीच किमया आहे. श्रीतुकाराममहाराज सांगतात, “‘गोडी ठायी निवडिता ||’ साखरेचे कितीही प्रकार असले तरी त्यांतील ‘गोडी’ हेच सत्य आहे.” तसेंच ‘माणसातील देवत्व’ हेच ‘सत्य’ आहे. श्रीएकनाथमहाराजांनी “भक्तातच देवाचे अस्तित्व आहे” असे सांगितले. स्वामी विवेकानंदांनीही “मानव सेवा हीच ईश्वर सेवा” असा संदेश दिला. त्यांनी समाजातील गरजूंची प्रत्यक्ष सेवा केली. ते म्हणतात, “माणसाला ईश्वर समजून त्याची सेवा केली तर अहंकार नष्ट होतो. यामुळें ईश्वरी प्रेम उत्पन्न होऊन ईश्वराचीच सेवा होते.” असें देव-भक्ताचे परस्परांवरील प्रेम सर्व संतांच्या अभंगवाणीतून दिसते.
घडलेला प्रसंग असा. कंपनीत जाताना एका तरुणाने भुकेलेल्या दोन मुलांना पाहून विचार केला “आपण त्यांना खाण्यासाठी पैसे द्यावेत.” त्याने पैसे दिले. तों मनाशी विचार करतो, “आपण पैसे देऊन चूक केली. त्यांना आपल्याबरोबर घेऊन जाऊं आणि खायला घालू.” असें ठरवून, तो त्यांना स्वत:च्या घरी घेऊन जातो व म्हणतो, “बाळांनो, तुम्हाला काय खायची इच्छा आहे ते पोटभर खा.” पदार्थ खाऊन मुले प्रसन्न होतात आणि तृप्तीची ढेकरही देतात. तिघेंजण आनंदाने आपापल्या मार्गाने निघून जातात.
नेहमीप्रमाणें सायंकाळी तो तरुण मंदिरात जातो. तेथें एक साधु असतात. तो त्यांना विचारतो, “भक्ति व ज्ञान कसे दृढ करावें?” ते साधु म्हणतात “सत्कर्मातच खरी भक्ति व ज्ञान आहे. तू सत्कर्म केले आहेस कां?” तरुण सांगतो, “मी लहान मुलांची भूक शमवली. त्यामुळें माझीच भूक शमल्याचा अनुभव आला.” साधु म्हणतात, “त्या दोन मुलांना तूं वेगळे समजले नाहींस. ‘त्यांच्यातील देवत्व’ पाहून तूं त्या मुलांची सेवा केलीस. तुझ्या हृदयातील कारुण्यभावानेच हें सत्कर्म घडले. हीच खरी भक्ति व ज्ञान आहे.” त्या तरुणाचे समाधान झालें.
याचे तात्पर्य श्रीसमर्थांच्या ओवीतून पाहू-
‘नारायण असे विश्वी |
त्याची पूजा करीत जावी |
याकरणे तोषवावी |
कोणीतरी काया ||’
……………………..