Vasudev Niwas | © 2023 All rights reserved | Developed by Digital Canvas
सगुण निर्गुण
तीच भारती...
‘भारती’ म्हणजे ‘सरस्वती’, ‘भाषण’, ‘व्याख्यान’ अशी व्याख्या आहे. ‘स+रसवती’ ‘जिच्यात रस आहे’ अशी ‘रसवती जिव्हा’ म्हणजेच ‘वाग्देवता सरस्वती.’ तिचे वास्तव्य मानवाच्या जिव्हेमध्यें असून तीं ‘वाणी’ प्रकट करतें.
‘रसयुक्त वाणीने’ व्याख्यानाद्वारे, कीर्तनाद्वारे प्रवचनाद्वारे समाज प्रबोधनाचे कार्य होते. व्याख्यानाद्वारे ऐकणाऱ्याचे अंत:करण प्रसन्न होते, डोळ्यांतून प्रेमाश्रु येतात, “फारच चांगलें! धन्य आहे!” असें शब्द उत्पन्न होतात. “हें ‘व्याख्यान’ नसून अमृतधाराच आहे” असा अनुभव येतो. परंतु हें ‘व्याख्यान’ भक्तिने परिपूर्ण व लोकांना आनंद देणारे हवे. उदाहरणार्थ, जसें प्राणावांचून शरीर व्यर्थ, त्याचप्रमाणें भक्तीवाचून ‘व्याख्यान’ व्यर्थ आहे.
भक्तियुक्त ‘वाणीचे प्रभुत्व व प्रासादिकतेसाठी’ ‘देवीसरस्वतीची’ कृपा आवश्यक आहे. त्यासंदर्भात श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामिमहाराजविरचित श्रीदत्तमाहात्म्यातील एक प्रसंग असा. सोमवंशातील राजा ऋतध्वज व गंधर्वकन्या मदालसा यांची ताटातूट होते. ऋतध्वज आपल्या नागवंशातील दोन मित्रांना व्यथा सांगतो. हे नागमित्र आपल्या वडिलांना अश्वतराला “ऋतध्वजाला मदत करण्यास” विनंती करतात. अश्वतराला “हिमालयातील सिद्धी प्राप्तीचे स्थानाकडे जाण्याची” अंत:प्रेरणा होतें. त्याप्रमाणें अश्वतर व बंधु कंबल दक्षिण हिमालयात सरस्वतीचे स्थान असलेल्या प्लक्षावरणतीर्थ स्थळी जातात. तेथें तें ‘देवीसरस्वतीची’ स्तुति करून तिची कृपा संपादन करतात. त्यांना ती आशीर्वाद देते, “तुम्हाला वाणीचे प्रभुत्व आणि प्रासादिकता प्राप्त होवो.” त्यामुळे त्यांना भगवान शंकरांचीही कृपा प्राप्त होते व अनेक विद्या अवगत होतात. प्राप्त झालेल्या सामर्थ्यानुसार अश्वतराने राजा ऋतध्वज व मदालसा यांची भेट घडवली व ते आनंदी झाले.
या प्रसंगातील रहस्य असे. श्रींस्वामिमहाराजांनी भावी पिढीला व विद्यार्थ्यांना सोपे स्तोत्र उपलब्ध करून दिले आहे. या स्तोत्राच्या पठणाने भारतातील अनेक शास्त्रज्ञांनी व विद्वानांनी बुद्धीच्या बळावर नावलौकिक प्राप्त केला आहे. ही केवळ ‘श्रींस्वामिमहाराजांचीच’ कृपा आहे.
तात्पर्य, आजच्या स्पर्धात्मक युगात विविध क्षेत्रात यश मिळविण्यासाठी स्तोत्र असे-
“देवो मति जी सद्गती ती सरस्वती|
श्रुती गाती जीची कीर्ति तीच भारती||
चिन्मय तूं वाङ्मय तूं अससी भारती||
करविसिं तूं वदविसि तूं तूं जगद्गती||
ये धावूनी स्तुति परिसूनी भो सरस्वती|
मति देवुनि जाड्य हरुनि तारि भारती||”
……………………..