tembe-swami-round
swami-loknath-terth-round
श्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे
  

सगुण निर्गुण

दास आम्हीं हें घरदार

भारतात एकत्र कुटुंबपद्धती आहे. श्रीस्वामिमहाराजांची “सहकुटुंब सहपरिवार दास आम्हीं हें घरदार” अशी प्रार्थना आहे. कुटुंबातील भगवद्भक्ती, प्रेम, जिव्हाळा हीच भगवंताची कृपा!

आजच्या काळात एकमेकांना कोणी विचारत नाहीं. मतभेद वाढत आहेत. कुटुंबामध्येच नव्हे, विविध क्षेत्रातही एकमेकांत सलोखा नाहीं. सर्वांच्या विकासासाठी परस्परांमध्ये सलोखा, प्रेम आवश्यक आहे. सुसंवाद होण्याकरिता शास्त्रकारांनी ‘संवाद अग्निदेवतामंत्र’ सांगितला आहे. त्याचा अर्थ: ‘एकमेकांवरती खूप प्रेम करणारे राजा नल व दमयंती यांना मी नमस्कार करतो. वाद नष्ट होऊन शांती मिळावी, माणसातील वैरभाव नष्ट होऊन एकमत होण्याकरिता हें संवादरूपी अग्निदेवते माझ्यावर प्रसन्न हो.’ मंत्र असा-

‘दमयन्तीनलाभ्यां च नमस्कारं करोम्यहम्|
अविवादो भवेत् अत्र कलिदोषप्रशान्तिद:||
ऐकमत्यं भवेत् एषां मनुष्याणां पृथग्धियाम्|
निर्वैरता च जायेत संवादाग्ने प्रसीद मे||’

कुटुंबातील सर्वांनी हा मंत्र दिवसातून एकदा अर्थासह वाचावा व शांतता मिळवावी हें याचें सूत्र आहे.

श्रीमद्भागवतात सुसंवादाचे महत्त्व भगवान् श्रीकृष्णांनीं सांगितले आहे. तो प्रसंग असा. कौरव पांडवांना विलक्षण छळत असत. हें श्रीकृष्णाला सहन झाले नाहीं. त्यानें अक्रूराला सांगितले, “मी कौरव पांडवांत समेट होण्याचे प्रयत्न केले. वाद विकोपाला गेला आहे. शेवटचा उपाय म्हणून धृतराष्ट्राला माझा निरोप सांगा “संसार स्वप्नासारखा, जादूसारखा आहे. मानवाचे शरीर-घर इत्यादि टिकणारे नाहीं. मनुष्य एकटाच जन्मतो, एकटाच जग सोडून जातो, एकटाच पापपुण्य उपभोगतो. तुझी पुत्रममता अयोग्य आहे. तू आतून शांत हो, नीट विचार कर आणि योग्य निर्णय घे. पांडवही तुझेच पुत्र आहेत. कुटुंबप्रमुखाच्या नात्याने पांडवांना न्याय दे. जे हक्काचे आहे ते दिलेच पाहिजे. तें नाहीं केलेस तर तुझी व कौरवांची अनंत काळापर्यंत अपकीर्ति राहील. असें होऊ नये याची चिंता मला आहे. तुला समजविण्याचा माझा अंतिम प्रयत्न आहे.” उपदेश ऐकून धृतराष्ट्र स्तब्ध राहिला. अक्रूरजींनी सर्व प्रसंग श्रीकृष्णाला सांगितला. यावर “विधाता ठरवेल तसें होईल” असें भगवंत म्हणतात. भगवंताचा उपदेश सर्वांनी लक्षात ठेवावा हेंच खरें.

तात्पर्य, भगवंताचा संदेश चिरकाल आहे. व्यक्ति, कुटुंब, समाज, राज्य, राष्ट्रातील प्रत्येकाने ‘सुसंवादाचे’ आचरण करणें काळाची गरज आहे.

……………………..

देव भक्ताचे भांडण >>

<< गजेंद्र