Vasudev Niwas | © 2023 All rights reserved | Developed by Digital Canvas
सगुण निर्गुण
देव भक्ताचे भांडण
महर्षि व्यासांनी १८ पुराणांची रचना केली. १९वे पुराण ‘श्रीदत्तपुराण’ श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामिमहाराजांची रचना होय.
श्रीस्वामिमहाराजांची संस्कृत व मराठीतून लोकमंगल, लोकवर्धक, लोककल्याणकारी विपुल ग्रंथसंपदा म्हणजे भारतीय तत्त्वज्ञान व साहित्यातील मौलिक योगदान होय. “ऋतंभरा तत्र प्रज्ञा” या योगसूत्राप्रमाणे आत्माभिमुखी बुद्धीतूनच सर्व शास्त्रे आपोआप अवतरतात याचे प्रत्यक्ष दर्शन श्रीस्वामिमहाराजांच्या वाङ्यातून होते. भारतातील विविध विद्यापीठांमधून श्रीस्वामिमहाराजांच्या वाङ्मयावर अनेकांनी ‘विद्यावाचस्पती (पीएच.डी)’ पदवी मिळवली आहे. हें वाङ्मयाचे रहस्य आहे.
भगवंत संतरूपात समाज मार्गदर्शनासाठी अवतरतात हें सत्य आहे. आजच्या काळात ‘आचार: प्रभवो धर्म:|’ ‘आचाराचे महत्त्व’ भगवंतांनी श्रीस्वामिमहाराजरूपात सांगितले. ‘श्रीक्षेत्रमाणगाव निर्मला नदी’ ते ‘श्रीक्षेत्रगरुडेश्वर नर्मदा नदी’ असा श्रीस्वामिमहाराजांचा चैतन्यमय जीवन प्रवास असून ‘श्रीगुरुदेवचरित्रातून’ प्रत्येकाने परमानंदाची अनुभूति घ्यावी.
श्रीदत्तप्रभु श्रीस्वामिमहाराजांशी प्रत्यक्ष बोलत व मार्गदर्शन करीत असल्याचा चिखलद्यातील (गुजरात) ‘नरकचतुर्दशी’निमित्त ‘श्रीदत्तप्रभूंचा अभ्यंगस्नानाचा’ रोमहर्षक प्रसंग असा. नरकचतुर्दशीच्या आदल्या दिवशी श्रींस्वामिमहाराजांना श्रीदत्तप्रभूंचा दृष्टांत झाला, “उद्या दिवाळी, आम्हांस अभ्यंगस्नान घालावें.” श्रीस्वामिमहाराज कळवळून म्हणतात,”आम्ही संन्यासी असल्याने अग्निस्पर्श नाहीं, गरम पाणी कोठून आणावे? सुगंधी तेलही नाहीं. त्यामुळें अभ्यंगस्नान कसें घालूं देवा?” नरकचतुर्दशीला श्रीस्वामिमहाराजांनी श्रीदत्तप्रभूंच्या मूर्तीला रोजच्याप्रमाणे स्नान घालून भस्म लावले. मंगलस्नान न घातल्यामुळें श्रीदत्तमूर्ती रागावून नर्मदेच्या पाण्यात जाऊन बसली. हें श्रीस्वामिमहाराजांना माहीत नव्हते. श्रीस्वामिमहाराज नैवेद्य घेऊन आले तर त्याजागी मूर्ती नव्हती. श्रीस्वामिमहाराजांना धस्स झालें. इतक्यांत मोठ्या आवाजात श्रीदत्तप्रभु म्हणाले, “आज मला मंगलस्नान घातल्यावाचून नैवेद्य काय दाखवता? मी इकडे नर्मदेत बसलो आहे. मला नैवेद्य नको काही नको.” श्रीदत्तप्रभूंची वाणी ऐकताच श्रीस्वामिमहाराज धावत नर्मदेकाठी आले. त्यांना पाण्यात लख्ख प्रकाश दिसला. त्या ठिकाणी त्यांनी बुडी मारून श्रीदत्तमूर्ती प्रेमाने जवळ घेतली आणि वर आले. श्रीस्वामिमहाराजांना नदीकाठी पाहून गावातील लोक जमले. श्रीस्वामिमहाराजांनी श्रीदत्तप्रभूंची इच्छा सर्वांना सांगितली. त्याप्रमाणे सर्वांनी गरम पाणी, सुगंधी तेल आणले. श्रीस्वामिमहाराजांनी अत्यंत प्रेमार्द्र चित्ताने श्रीदत्तप्रभूंची महापूजा केली. आरती व मंत्रपुष्प यानंतर सद्गदित कंठाने श्रीदत्तप्रभूंच्या लीलेचे श्रीस्वामिमहाराजांनी वर्णन केले-
‘मित्र मित्र जरि भांडती|
तरी पुनः एक होती||
देवभक्तांचे भांडणे|
पराभक्तीचे ते ठाणे||’
……………………..