Vasudev Niwas | © 2023 All rights reserved | Developed by Digital Canvas
सगुण निर्गुण
कृतज्ञ-कृतघ्न
“मानवजन्म परोपकारासाठी आहे” असें शास्त्रकार सांगतात. उपकारांची जाणीव ज्याला असते तो ‘कृतज्ञ,’ ज्याला उपकारांची जाणीव नसते तो ‘कृतघ्न’ होय. तसेंच भूक लागल्यावर खाणे ही प्रकृति, घासातला घास दुसऱ्याला देणे ही संस्कृती, दुसऱ्याचे ओरबाडून घेणे ही विकृति. हे लक्षात घेऊन “‘ओरबाडणारा हा जवळचाच असतो’, त्यापासून सावध राहावे” असे संत सांगतात.
‘परोपकार पुण्यप्रद आहे आणि परपीडा पाप आहे’ हे उदाहरणांतून क्रमशः पाहूं. पाण्याचा थेंब स्वाती नक्षत्रांत शिंपल्यांत पडला तर त्याचा मोती होतो, त्याला सौंदर्य व मूल्य प्राप्त होतें. सहवासाच्या लाभाचे असे वर्णन असल्याने ‘सज्जन परोपकारी मनुष्याचाच’ सहवास प्रत्येकाने करावा. श्रीसमर्थ रामदासस्वामी म्हणतात “मनुष्य विविध दागिने अंगावर घालून शरीराला शोभा आणतो. परंतु परोपकारानेच त्याची शोभा वाढते.” जसे फळांमुळें झाडे वाकलेली असतात, ढग पाण्याने जमिनीकडे झुकतात तसे परोपकारी मनुष्य ऐश्वर्याने नम्र असतो. जशा नद्या स्वतःचे पाणी पीत नाहीत, झाडे स्वतःची फळें खात नाहीत, मेघ शेतातील पीक खात नाहीत, तसा परोपकारी मनुष्य आपले सर्व वैभव इतरांसाठी वापरतो. मलयपर्वतावरील चंदनाच्या झाडांच्या सहवासाने कडू झाडांनाही चंदनाचा सुगंध येतो. तसें परोपकारी मनुष्याच्या सहवासाने इतर लोकही परोपकारी बनण्यास तत्पर होतात.
महाभारतातील बोधप्रद प्रसंग पाहूं. श्रेष्ठ द्रोणाचार्य कौरव-पांडवांचे गुरु होते. सर्व विद्या पारंगत झाल्यावर श्रीगुरूंना दक्षिणा काय द्यायची असा प्रश्न निर्माण झाला. द्रोणाचार्य म्हणतात, “माझा अपमान करणाऱ्या राजा द्रुपदाला शासन करा हीच माझी गुरुदक्षिणा.” परंतु स्वबळाच्या अभिमानामुळें दुर्योधन सर्व श्रेयासाठी पांडवांची मदत नाकारतो. राजा द्रुपदाकडून दुर्योधन पराभूत होऊन बंदी बनतो. धर्मराज, राजा द्रुपदाचा पराभव करून, दुर्योधनाची सुटका करतो. ‘अपकार करणाऱ्यावर सज्जन लोक कसा उपकार करतात’ हें धर्मराजाच्या कृतीने लक्षात येते.
कवी भर्तृहरि म्हणतात, “स्वतःचा स्वार्थ सोडून दुसऱ्याचे हित करणारे सज्जन परोपकारी, श्रेष्ठ’ समजलेले आहेत. परंतु कारण नसताना दुसऱ्याच्या हिताचा नाश करून आनंद मानणारे अधमातले अधम आहेत.”
तात्पर्य, संतश्रेष्ठ श्रीरामदासस्वामींच्या ओवीतून पाहूं-
‘आपुल्या पुरुषार्थ वैभवे| इतरांस सुखी करावे|
परंतु कष्टी (दुःखी) करावे| ही राक्षसी क्रिया||’
……………………..
अहंकाराचा वारा न लागो >>
<< खगेंद्र अर्थात् गरुड