tembe-swami-round
swami-loknath-terth-round
श्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे

सगुण निर्गुण

श्रीसमश्लोकी गुरुचरित्र

वारकरीसंप्रदायात संतश्रीमाऊलींची श्रीज्ञानेश्वरी आणि समर्थसंप्रदायात संतश्रीरामदास स्वामींचा दासबोध वंदनीय आहे. याचप्रमाणे दत्तसंप्रदायात श्रीसरस्वती गंगाधरविरचित ‘श्रीगुरुचरित्राला’ महत्त्वाचे स्थान आहे. या ग्रंथात श्रीदत्तप्रभु व श्रीदत्तावतारांची चरित्रे, उपासना, भक्ति, आचारधर्म असें विषय आहेत.

श्रीदत्तप्रभूंचा तिसरा अवतार म्हणून श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामिमहाराज हें सर्वश्रुत आहे. श्रीस्वामिमहाराजांचा मुक्काम गंगातिरी ब्रह्मावर्त येथे असताना प्लेगने संपूर्ण गाव ओस पडले. एवढ्यात श्रीस्वामिमहाराजांना श्रीदत्तप्रभूंची आज्ञा झाली, “श्रीगुरुचरित्राचे संस्कृत भाषांतर करा.” मराठी श्रीगुरुचरित्र प्रसिद्ध असूनही श्रीदत्तप्रभूंनी स्वत:चे चरित्र लिहिण्याची आज्ञा श्रीस्वामिमहाराजांना करावी हें विलक्षण आहे. श्रीस्वामिमहाराजांनी श्रीदत्तप्रभूंची आज्ञा शिरसावंद्य मानली आणि चैतन्यानेच चैतन्याची केलेली स्तुति अर्थात् ‘श्रीसमश्लोकी गुरुचरित्र’ निर्माण झाले. संस्कृत ग्रंथांचे मराठी भाषांतर करणें सोपे आहे. परंतु मराठी ग्रंथांचे संस्कृत भाषांतर करणें दुर्मिळ आहे. श्रीसमश्लोकीद्वारे श्रीस्वामिमहाराजांनी ‘गुरुतत्त्व हेंच ईश्वरी तत्त्व आहे’ हा संदेश दिला आणि श्रीगुरुदत्तयोगाची स्थापना केली.

मराठी श्रीगुरुचरित्रातील प्रत्येक ओवीचे जसेच्या तसें संस्कृत श्लोकात भाषांतर म्हणजे समश्लोकी होय. तसेंच वेदातील मंत्रांच्या एकत्रित रचनेला ‘संहिता’ म्हणतात. श्रीसमश्लोकीतील प्रत्येक श्लोक मंत्रात्मक असल्याने श्रीसमश्लोकी-श्रीगुरुसंहिता वेदतुल्य आहे.   

या प्रासादिक ग्रंथातील श्रीसद्गुरुकृपेचा महिमा घडलेल्या प्रसंगातून पाहूं. एक शेतकरी श्रीगुरुंना नित्य अभिवादन करीत असें. एकदा त्याने श्रीगुरुंना प्रार्थना केली, “आपली अमृतदृष्टि शेतावर पडावी.” हिरवेगार शेत पाहून श्रीगुरु म्हणाले, “सर्व पीक कापून टाक.” तो सर्वांना समजावतो, “श्रीगुरुवाक्य कामधेनु आहे. श्रीसद्गुरु शिवस्वरूपच आहेत अशी माझी धारणा आहे. माझे कल्याणच होणार आहे.” असा विश्वास ठेवून तो शेतातील उभे पीक कापून टाकतो. अचानक पाऊसामुळें सर्वांचे पीक वाहून जाते. परंतु शेतकऱ्याकडे शतपटीने पीक येते. तो आपल्यापुरते धान्य ठेवून उरलेले धान्य ग्रामाधिकारी व नुकसान झालेल्यांमध्ये वाटून टाकतो. श्रीसद्गुरुकृपेमुळें त्याला अखंड ऐश्वर्य व श्रीगुरुभक्ति प्राप्त होते. हें श्रीगुरुंच्या आज्ञापालनाचे फलित आहे. सारांश, श्रीगुरुचरित्र अमृतानुभूति देणारे आहे हेंच खरे.

तात्पर्य,

‘वाचिता सप्तके दोन |
‘समश्लोकी गुरुकथा’ ||
अलभ्य तेहि ये हाती |
चिंता का करशी वृथा ||’

…………………….

समश्लोकी गुरुचरित्र  >>

<< कृष्णंवंदे जगद्गुरुं