Vasudev Niwas | © 2023 All rights reserved | Developed by Digital Canvas
सगुण निर्गुण
अपेक्षा-उपेक्षा
मार्कंडेय पुराणामध्ये ‘श्रीदेवीमाहात्म्यात’ ‘पशुपक्ष्यांना आणि मानवांना पिल्लांचे व मुलांचे प्रेमाने संगोपन करण्याचे ज्ञान उपजतच असतें’ असा उल्लेख आहे. परंतु मनुष्य उपकारबुद्धीने “मुलें मोठी झाली कीं माझी सेवा करतील” अशा परतफेडीची अपेक्षा करतो. मुलांकडून अपेक्षित ती परतफेड झाली नाहीं कीं मनुष्य “माझी उपेक्षा झालीं” असें म्हणत निराश होतो.
संतचरित्रामधून ‘अपेक्षा-उपेक्षाबाबत’ घडलेला प्रसंग पाहूं. एकदा लोकांनी उपहास केल्याने श्रीज्ञानेश्वरमाऊली रागावून घराचे दार लावून बसलें. मुक्ताबाईंनी विचारले, “ज्ञानोबा, काय झालें?” परंतु माऊली कांहींच बोलले नाहींत. सर्व प्रकार लक्षात येऊन मुक्ताबाई समजावतात “संतांच्या ठिकाणी अपमान सहन करण्याची क्षमता असतें. त्यांनी दयाळू आणि क्षमाशील असावें. कठोर शब्द ऐकूनही संत आपली शांत स्थिती कधीही ढळू देत नाहींत.”
मुक्ताबाई पुढें म्हणतात, “आपलीच जीभ आपल्याच दातांनी चावली तर आपण बत्तिशी पाडणार कां ज्ञानोबा? नाहीं. तुम्ही थोर संत आहात. तुमचे हृदय करुणेने भरलेले आहे. समाजोद्धाराचे महान कार्य तुमच्याहातून होणार आहे. आता बाहेर या.” अत्यंत प्रेमाने केलेला हा उपदेश ऐकून, माऊली शांत झालें व बाहेर येऊन मुक्ताबाईंचे कौतुक केले. समाजापासून कोणतीही अपेक्षा ठेऊ नये हेंच खरें.
एकदा ब्रह्मश्री दत्तमहाराजांना एक वयस्क गृहस्थ भेटण्यास येतात. तें म्हणतात, “महाराज, मी दुःखी आहे. घरात कोणी विचारत नाहीं, केवळ उपेक्षाच होते.” यावर श्रीदत्तमहाराज म्हणाले, “अपेक्षा केली की उपेक्षा होते. म्हणून प्रत्येक गोष्टीची उपेक्षा करा म्हणजे अपेक्षापूर्ती होईल. हें सूत्र तुम्हीं लक्षात ठेवा. श्रीमद्भागवतातील भिक्षुगीत हा एक अध्याय आहे. तों उद्बोधक आहे.” कसें तें सोदाहरण सांगतात. “प्रखर उन्हात वळवाचा पाऊस पडला कीं हवा थंड होते. तसें संसारात उपेक्षिलेल्या माणसांना भिक्षुगीताच्या चिंतनाने आनंद मिळतो. या भिक्षुगीतातील एक सद्गृहस्थ स्वानुभवावरून लोकांना सांगतो, “हें लोकहो, आपल्या देवाला, दैवाला, नातेवाईकांना, कोणालाही दोष देऊं नका. सर्व दोष आपलाच असतो. हें लक्षात ठेवून कोणाकडूनही अपेक्षा न ठेवता यशस्वी जीवन जगा.”
संतश्रेष्ठ मुक्ताबाईंच्या अभंगातून तात्पर्य पाहूं-
“योगी पावन मनाचा|
साहे अपराध जनाचा|
विश्वरागे झाले वन्ही|
संती सुखे व्हावे पाणी||”
……………………..