Vasudev Niwas | © 2023 All rights reserved | Developed by Digital Canvas
सगुण निर्गुण
उदयोSस्तु|
भारतीय संस्कृतिमध्ये उत्सवाचे विशेष महत्व आहे. मनुष्य हा उत्सवप्रिय आहे. उत्सव म्हणजे ‘मानवाला आनंद व मनप्रसन्नता देणारा’ होय.
भारतीय उत्सव निसर्गाशी संलग्न आहेत. त्यामुळें मानवाला आरोग्य, समृद्धि प्राप्ती होते. अशा उत्सवांमध्ये आश्विन महिन्यातील ‘शारदीय नवरात्र महोत्सव’ अर्थात् शक्तिशाली चंडीदेवतेची उपासना सर्वश्रेष्ठ आहे. व्यक्ती, समाज, राष्ट्र सामर्थ्यसंपन्नतेसाठी शक्तिशाली देवतेची उपासना आवश्यक आहे. वेदासंहित पुराणांमध्ये शक्तीच्या उपासनेला महत्व दिले आहे. म्हणून आश्विन शुद्ध प्रतिपदा तें नवमी, असें या महोत्सवाचे स्वरूप आहे. या नवरात्रात जया, विजया, अजिता, अपराजिता अशा देवतांचे अस्तित्व असते. देवीमाहात्म्य ग्रंथात आदिशक्तीने, ‘महाकाली-महालक्ष्मी-महासरस्वती’ हें अवतार धारण करून वाईट प्रवृत्ती नष्ट केल्याचे वर्णन आहे. पहिल्या दिवशी घटस्थापना व अखंड नंदादीप या नवरात्रीचे अंग आहे. तसेंच कुमारिका पूजन, सरस्वती पूजनही सांगितले आहे. अगस्ती ऋषींनी प्रभू श्रीरामचंद्रांना ‘नवरात्र महोत्सवा’ची उपासना करण्याचा उपदेश केला. प्रभूंचा आदर्श ठेवून सर्वांनी ‘नवरात्र महोत्सव’ सहकुटुंब उत्साहाने साजरा करावा असें शास्त्रकार सांगतात.
भारतामध्ये या महोत्सवानंतर ‘विजया दशमी’ महोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. प्रभूरामचंद्रांनी रावणावर विजय मिळवण्याकरिता व छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूवर विजय मिळवण्याकरिता याच दिवशी प्रस्थान केले. हा दिवस “विजयाचे” प्रतीक आहे. याचे महत्व घडलेल्या प्रसंगातून पाहूं. रघुकुलातील सर्वश्रेष्ठ दानशूर रघूराजाने संपत्तिदान केल्यामुळें त्याचा खजिना रिकामा झाला. अशा कठीण प्रसंगी वरतंतू ऋषिंचा शिष्य कौत्साने मोठी गुरुदक्षिणा मागितली. तेवढी संपत्ति जवळ नसल्यामुळें रघुराजाने कुबेराला संपत्ति मागितली. रघुराजाचे सामर्थ्य कुबेराला माहीत होते. संपत्ति न दिल्यास युद्धात पराभव होईल या भीतीने कुबेराने शमी वृक्षावर सोन्याचा वर्षाव केला. रघुराजाने ही संपत्ति कौत्साला दिली. कौत्स गुरुकुलाकडे निघून गेला. शमी वृक्षाची ‘वैभवाचे प्रतीक’ म्हणून पूजा करतात. तसेंच महाभारतामध्ये पांडवांनी आपली दिव्य अस्त्रे ह्या वृक्षावर लपवून ठेवली होती म्हणूनही त्याचे महत्व आहे. सोन्याचे प्रतीक म्हणून शमीवृक्षाच्या पूजनानंतर शमीची किंवा आपट्याची पाने एकमेकांना देतात. ‘वैभवाच्या सुखाचा आनंद सर्वांनी मिळून घेऊंया’ असा उदात्त भाव यात आहे.
तात्पर्य, सर्व प्राप्तीसाठी “उदो देवी तुझा” असा जयजयकार करूंया.
……………………..