Vasudev Niwas | © 2023 All rights reserved | Developed by Digital Canvas
सगुण निर्गुण
गुण
गुणा: पूजास्थानम्|’ असें महाकवि कालिदासांनी वर्णन केलेले आहे. याचा अर्थ असा-‘गुणांचीच पूजा होते. त्यात लहान-मोठा, स्त्री-पुरुष, भेद नसतो.’
संतश्रेष्ठांनी विचार मांडला, ‘प्रत्येक झाडाच्या पानात, फळात, फुलात जसें औषधीगुण असतात तसेंच प्रत्येक मानवात सद्गुण कां बरें नसणार? असतातच’. हें सद्गुण सज्जनसहवासाने आपोआप विकसित होतात. मग ‘कस्तुरीच्या सुगंधाचे ठिकाण जसें सांगावे लागत नाहीं, तसें सद्गुणांची प्रसिद्धी करावी लागत नाहीं.
सद्गुणांच्या वृद्धीसाठी सत्संगाची आवश्यकता आहे. संतांच्या सहवासाने मानवाची दृष्टी पारदर्शक होते. त्यामुळें जसें चंद्राच्या किरणांने त्याच्यावरील डाग दिसत नाहीं तसें ‘सद्गुणी व्यक्तीतील गुणच दिसतात. या सद्गुणवृद्धीने मानवाला आनंदाची प्राप्ती होते.
सज्जनांचे हृदय प्रेमाने परिपूर्ण असते. तें दुसऱ्यांना आत्मरूप मानतात. संत भरभरून कौतुक करून दुसऱ्यांना संतुष्ट मनाने प्रोत्साहन देतात. हाहीं संतांचा स्वभाव आहे. याबाबत एक प्रसंग असा. योगसाधनेमध्ये निपुण असलेल्या श्रीचांगदेवांना संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वरमहाराजांकडून उपदेश ग्रहण करण्याची इच्छा होती. त्यांनी माऊलींना पत्र लिहायला घेतले. परंतु, श्रीचांगदेवांना संभ्रम निर्माण झाला ‘श्रीज्ञानेश्वरांना नमस्कार लिहावा कीं आशीर्वाद’? कारण नमस्कारासाठी माऊलींचे वय लहान आणि ज्ञानी अशा संतश्रेष्ठ माऊलींना आशीर्वाद तरी कसा द्यावा! म्हणून श्रीचांगदेवांनी कोरेच पत्र पाठवलें. तें पत्र श्रीनिवृत्तिनाथांच्याकडे शिष्याने आणून दिलें. जवळच असलेल्या मुक्ताबाई पत्र पाहून म्हणाल्या “शेकडो वर्षे राहूनही चांगदेव अजूनही कोराच!” माऊलींनी पत्राचे उत्तर लिहिण्यास घेतले. श्रीचांगदेवांच्या पत्राचे समर्थन करीत माऊलींनी “आपले कल्याण असों” अशा शब्दांत उत्तराची सुरवात केली. “लहानांनी मोठ्यांचे व मोठ्यांनी लहानांचे कल्याण चिंतणे दोन्ही चांगलेच आहे” असा माऊलींनी श्रीचांगदेवांना प्रेमळ उपदेश केला. यामुळें श्रीचांगदेवांची ‘कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे’ अशी अवस्था झाली.
सारांश, ‘सत्वगुण’ हा ईश्वरीगुण आहे. जन्मलो म्हणून जगायचे असें न करता ‘दुसऱ्यांसाठी जगण्यात आनंद मानल्यामुळें’ समाज निर्मितीचे उत्तम कार्य होते. हें आपल्या कृतीतून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमाऊलींनी दाखवले आहे. म्हणून आजही शेकडो वर्षांनंतर ‘माऊली माऊली’ हाच गजर आसमंतात दुमदुमत आहे. अशा संतांना समाज कधीही विसरत नाहीं.
तात्पर्य, माऊलींच्या उपदेशातून पाहूं-
‘अवघाचि संसार सुखाचा करीन|
आनंदे भरीन तिन्ही लोक||’
……………………..