सगुण निर्गुण
सिद्धी नकोच
‘सिद्धी’ म्हणजे ‘दैवी शक्ति’ होय. “त्या मानसिक व शारीरिक शक्तिंचा विकास आहेत” असें शास्त्रकार सांगतात. ‘सिद्धी’ आठ प्रकारच्या आहेत. देव, ऋषि, मुनी, संत यांना ‘सिद्धीप्राप्ती’ होते. त्यांनी ‘सिद्धींचे’ प्रदर्शन न करता त्याचा वापर लोककल्याणाकरिता केला.
संत ‘सिद्धींना’ व्यर्थ मानतात. ‘सिद्धीप्राप्तीचा’ आनंद क्षणिक असतो. त्या साधना व उपासनेमध्ये बाधक आहेत. म्हणून संतांनी आपल्या चरित्रातून “सिद्धी नकोच” संदेश दिला आहे. हें क्रमश: पाहू. श्रीरामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंदांना ‘सिद्धी’ देण्यास तयार होते. विवेकानंदांनी विचारले, “परमेश्वरप्राप्ती होईल कां?” श्रीरामकृष्णांनी “नाहीं” म्हणताच विवेकानंदांनी सर्व ‘सिद्धी’ नाकारल्या.
तसेंच श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामिमहाराजांचे पंचमहाभूतांवर प्रभुत्व होते. इंदौरचे पंडित विनायकशास्त्री दैवी चमत्कार करून दाखवित असत. इंदौरला आलें असतां श्रीस्वामिमहाराजांना हें समजले. एकें दिवशी विनायकशास्त्री व इतर मंडळी श्रीस्वामिमहाराजांच्या सान्निध्यात बसली असतांना, श्रीस्वामिमहाराज हातात भस्माची डबी धरून विनायकशास्त्रींना म्हणाले, “ही डबी चालवून दाखवा पाहूं.” विनायकशास्त्री “महाराज, हात ढिला सोडा नाहींतर झटका बसेल” असें म्हणत प्रयोग करूं लागले. परंतु डबी थोडीसुद्धा हलली नाहीं. अनन्यभावाने विनायकशास्त्रीं श्रीस्वामिमहाराजांना शरण गेले. “कधीही सिद्धींचा वापर न करण्याची” प्रतिज्ञा घेऊन तें योगसाधनेमध्यें रममाण झालें.
त्याचबरोबर श्रीवासुदेव निवास, पुणे या ‘चैतन्य शक्तिपीठाचे’ संस्थापक योगिराज श्रीगुळवणीमहाराजांच्या दर्शनाला आलेल्या एका गृहस्थाने, “मी पेढा आणून दाखवतो” असें म्हटले. हात फिरवून तो म्हणाला, “हें घ्या पेढे.” श्रीगुळवणीमहाराजांनी “हें चोरलेले पेढे आहेत की नाहीं?” असा प्रतिप्रश्न करताच तो गृहस्थ खाली मान घालून तेथून निघून गेला. ‘सिद्धी प्रदर्शन लोकांच्या आकर्षणासाठी आहेत, परमार्थासाठी नाहीं’ हाच संदेश त्यांनी जगासमोर ठेवला.
तसेंच शक्तिपात योगाचे ‘चैतन्य चक्रवर्ती सम्राट’ असलेले श्रीलोकनाथतीर्थ स्वामिमहाराजांनी योगतपस्वी श्रीकाकामहाराजांना “सिद्धी हव्या कां?” असें विचारले. श्रीकाकामहाराज म्हणाले, “आपला आशीर्वादच हवा आहे.” या आशीर्वादाच्या बळावर श्रीकाकामहाराजांनी ‘महायोग सर्वांसाठी’ या संकल्पनेतून ‘महायोगाला’ वैश्विकस्वरूप देण्याचे महान कार्य केले.
नामसाधना, योगसाधना यातच खरां आनंद व ईश्वरप्राप्ती आहे. हें तात्पर्य संतश्रेष्ठ श्रीतुकाराममहाराजांच्या अभंगातून पाहू-
“जगरूढीसाठी घातलें दुकान|
जातो नारायण अंतरोनि||
तुका म्हणे हा हो प्रपंच गाढा|
थोरली ते पीडा रिद्धीसिद्धी||”
……………………..